आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य चळवळीचा शिलेदार हरपला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रख्यात साहित्यिक व साक्षेपी संपादक चंद्रकांत खोत यांचे लेखन आणि जगणे कुतूहल वाटण्याजोगे होते. नव्या पिढीला खोत यांचे लेखन किती परिचित आहे याचा अंदाज लावणे कठीण आहे. लघुनियतकालिक चळवळीतील चंद्रकांत खोतांचे योगदान, त्यांच्या आसक्तीपासून विरक्तीकडे जाणा-या कादंब-या, कविता, गीते हा लेखनप्रवास पाहता समग्र लेखन करणारा साहित्यिक तर मराठी साहित्याने गमावला आहेच, शिवाय मनस्वी आणि निमग्न जगणारा एक माणूसही गमावला आहे. त्यांनी काळाच्या पुढे जाऊन ‘उभयान्वयी अव्यय’सारख्या कादंब-यांमधून केलेले लेखन असो वा गजानन महाराज, धनकवडीचे शंकर महाराज, साईबाबा, नवनाथ महाराज, स्वामी समर्थ या आध्यात्मिक विभूतींवरील केलेले लेखन असो, त्यांच्या लेखनास विविधांगी पदर लाभल्याचे या साहित्यसंपदेतून वाचकास सहज लक्षात येते.
चंद्रकांत खोतांनी ‘बिंब प्रतिबिंब’, ‘दोन डोळे शेजारी’, ‘संन्याशाची सावली’या स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर लिहिलेल्या तीन कादंब-या त्यांना विवेकानंदांविषयी लागलेल्या ध्यासाची प्रचिती देतात. चंद्रकांत खोत यांना कवितासंग्रहासाठी राज्य शासनाचा पुरस्कार, जीवनगौरव पुरस्काराने गौरवले गेले. समकालाशी बंड करणारे त्यांचे उत्तरार्धातील लेखन विविध वाद निर्माण करणारे ठरले, पण तेच लेखन मराठी साहित्याला एक वेगळा प्रवाह देणारेही ठरले. वानप्रस्थाश्रमाकडे झुकताना त्यांनी निरासक्त जीवन स्वीकारले, त्यांचे बेघर असणे कित्येकांना हेलावून गेले. पण या सगळ्यापलीकडे चंद्रकांत खोत यांची अत्यंत महत्त्वाची कामगिरी म्हणजे दिवाळी अंकांचा चेहरा बदलण्याचा त्यांनी ‘अबकडई’ या स्वसंपादित दिवाळी अंकाच्या माध्यमातून केलेला प्रयत्न. साक्षेपी संपादक कसा असतो हे त्यांनी दिवाळी अंकाच्या संपादनातून दाखवून दिले. महाराष्ट्र सरकारने त्यांना घर देण्याची केलेली घोषणा निव्वळ घोषणाच ठरली. खोतांनी नवे वळण दिलेली दिवाळी अंकाची चळवळ, साहित्य चळवळ पुढे नावीन्य राखत चालवली तरच ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.