आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारंगखेड्याच्या घोडेबाजाराला चढतोय पुष्करच्या उंटांचा साज!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सारंगखेडा (ता. शहादा) हे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर तापी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले गाव. तरबेज घोड्यांच्या बाजारासाठी सारंगखेडा ओळखले जाते. देशभरातून येणाऱ्या घोड्यांची येथे खरेदी-विक्री होते. जमाना मर्सिडीझ, आॅडीचा असला तरी घोड्याची सर त्यांना येऊच शकत नाही. एक लाखापासून कोटी रुपयांपर्यंत घोडे विकले गेल्याचा इतिहास आहे. बॉलीवूड स्टार्स, उद्योजक, व्यापारी यांनी येथे येऊन घोडे खरेदी केले आहेत. अलीकडे घोडे खरेदी करणाऱ्यांची संख्या रोडावली असली तरी घाेडेप्रेमींची संख्या मात्र वाढतच चालली आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी पर्यटक, यात्रेकरूंचे आकर्षण ठरेल असे नवनवीन घोडा-घोडी येथे येतच असतात. दरवर्षी दत्त जयंतीला सारंगखेडा यात्रोत्सवाला सुरुवात होते. येथे एकमुखी दत्ताचे मंदिर आहे. देशभरातील महानुभाव पंथाच्या भाविकांसह नागरिकही दत्तदर्शन आणि यात्रेचा आनंद मिळवण्यासाठी येतात. सुमारे पंधरा दिवस हा यात्रोत्सव सुरू असतो. पंधरा दिवसांत लाखो भाविक येथे भेट देतात. संसारोपयोगी साहित्यापासून शेतीची अवजारे खरेदी करण्यासाठी नागरिक हजेरी लावतात. बदलत्या जमान्यात गावोगावचा यात्रोत्सव केवळ नावाला उरला आहे; पण सारंगखेडा त्याला अपवाद ठरत आहे. स्थानिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नेते जयपालसिंह रावल (मुन्ना दादा) यांनी पुढाकार घेऊन या यात्रोत्सवाचे स्वरूप बदलविण्याचा यशस्वी प्रयत्न चालविला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी या यात्रोत्सवात राजस्थान राज्यातील पुष्कर येथील उंट मेळा आणि उत्सव या धर्तीवर हा बदल करण्याचा निश्चय केला आहे. पुष्कर येथे दरवर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात म्हणजे कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमा असे पाच दिवस हा उत्सव चालतो. या उत्सवाचे ब्रँडिंग एवढे झाले आहे की देश-विदेशातील पर्यटक येथे हजेरी लावतात. येथेही उंटांना सजवून आणले जाते. संगीताच्या तालावर नृत्य, स्पर्धा, शर्यती घेतल्या जातात. उंटांची खरेदी-विक्रीही केली जाते. विशेष म्हणजे, येथे पुष्कर सरोवर आहे. तेथेही पर्यटक भेट देतात. अलीकडे स्थानिक पुष्कर क्लब विरुद्ध विदेशी पर्यटकांमध्ये क्रिकेटचा सामनाही रंगतो. तो पाहण्यासाठीही गर्दी होते. महोत्सवाच्या समारोपातच पुढील वर्षाच्या तारखाही जाहीर केल्या जातात.

त्यामुळे विदेशी पर्यटकांना बुकिंगसाठी सोईचे होते. पाच दिवसांच्या या महोत्सवानिमित्त राजस्थान सरकारने पर्यटन विकासाची संधी साधून अनेक स्पॉट विकसित केले आहेत. हा महोत्सव राजस्थान सरकारसाठी मोठे उत्पन्न मिळवून देतो. नेमक्या याच धर्तीवर जयपालसिंह रावल यांनी सारंगखेडा यात्रेसोबत घोडेबाजार आणि सांस्कृतिक व क्रीडा प्रकारातील वेगवेगळ्या भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने सारंगखेडा आणि सातपुड्यातील तोरणमाळ, दक्षिण काशी म्हणून ओळख असलेले प्रकाशा तीर्थक्षेत्र या स्थळांना पर्यटन विकासाच्या नकाशावर आणण्याचा निर्धार केला आहे. या वर्षी पर्यटन परिषदेचे आयोजनही करण्यात आले आहे.

या परिषदेला देशभरातील दीडशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सारंगखेड्यासोबतच खान्देशातील पर्यटनस्थळांबाबतही येथे चर्चा करण्यात येणार आहे. राज्याचे पर्यटन विकासमंत्री हे सारंगखेड्याजवळील दोंडाईचा येथील रहिवासी आणि नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे विकासाला चालना देणे अधिक सोपे होणार आहे. मंत्री रावल हे पहिल्यांदा शहादा याच विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. त्यामुळे त्यांनीही सारंगखेडा आणि सोबतच तोरणमाळ, प्रकाशा या क्षेत्रांचा विकास करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. यंदापासून सारंगखेडा यात्रोत्सवाला पुष्करचा साज चढतोय. त्याच्या फक्त ब्रँडिंगची आता आवश्यकता आहे. राज्याचे पर्यटन विकास महामंडळ आणि राज्य सरकारने जर मनावर घेतले, तर सारंगखेडाही पुष्करसारखे देश-विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र होईल.
त्र्यंबक कापडे
- निवासी संपादक, जळगाव
बातम्या आणखी आहेत...