आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On China By Prashant Dixit, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काळ, काम, वेगाचे चिनी गणित व मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटना 2007मधील. आयफोन बाजारात येण्याच्या काही आठवडे अलीकडील. स्टीव्ह जॉब्ज तणतणत ऑफिसमध्ये आला. खिशातील आयफोनचा प्रोटोटाइप टेबलावर फेकत तो ओरडला, चरे पडणारा डिस्प्ले मला नको. चरे न पडणारी काच मला आयफोनवर हवी.
बदल छोटासा पण खर्चिक होता. मुळात आयफोनच्या निर्मितीसाठी 8700 अभियंते व सुमारे दोन लाख असेंब्ली लाइन वर्कर्सची गरज होती. ही सर्व उभारणी करण्यासाठी अमेरिकेत किमान नऊ महिने लागले असते. त्यामध्ये आता काचेच्या डिस्प्लेची भर पडली.
नव्या उत्पादनासाठी स्वस्तात आणि वेगाने हे बदल घडवून आणणे एकाच ठिकाणी शक्य होते. अ‍ॅपलच्या व्यवस्थापकाने चीन गाठले. शॅन्झेनमधील फॅक्सकॉन सिटीमध्ये तो गेला. आपली गरज सांगितली. काचा आणणे, त्याची कापणी करणे, आयफोनचे सर्व पार्ट्स एकत्र आणून जुळणी करणे या सर्व कामाची कल्पना दिली.

फॉक्सकॉनने आव्हान स्वीकारले. काचा येताच फोरमनने आठ हजार कामगारांना मध्यरात्री उठवले. बिस्किटे, चहा देऊन कारखान्यात हजर केले. 12 तासांची शिफ्ट लगेच सुरू झाली. चौथ्या दिवसापासून या कारखान्यातून प्रतिदिवशी 10 हजार आयफोन्स तयार होऊ लागले. तीन महिन्यांत अ‍ॅपलने दहा लाख आयफोन विकले. गेल्या वर्षअखेरपर्यंत फॉक्सकॉनमधील फॅक्टरीत 20 कोटी आयफोन्स तयार झाले होते.

अमेरिकेत जे काम करण्यास नऊ महिने लागणार होते, तेच काम चीनने 15 दिवसांत करून दाखवले. तेही खूप स्वस्तात. अ‍ॅपल व चीन दोघांचीही तिजोरी फुगली.
स्किल, स्केल, स्पीड या नरेंद्र मोदींच्या मंत्राचे हे जिवंत उदाहरण.
कौशल्यपूर्ण आणि राक्षसी निर्मितीचे फॉक्सकॉन सिटी हे केंद्र आहे. चीनच्या आर्थिक शक्तीचा मुख्य स्रोत अशी केंद्रे आहेत. फॉक्सकॉनमध्ये साडेतीन ते चार लाख कामगार एकाच वेळी उपलब्ध होतात. 12 तासांची शिफ्ट कधीही सुरू करता येते. उत्पादनासाठी लागणारी पूरक सामग्री परिसरातच उपलब्ध असते. विशिष्ट बनावटीचा स्क्रू लागणार असेल तरी लगेच तयार करून मिळतो. जवळच्या बरॅक्समध्ये कामगार राहतात. तीन चौरस किलोमीटरमध्ये उभारलेल्या या औद्योगिक वसाहतीत अत्यावश्यक सर्व सोयी दिल्या जातात. टेरी गुओ या तैवानी उद्योजकाने 1974 मध्ये फॉक्सकॉनची कल्पना मांडली. चीनमध्ये त्याला सरकारकडून सर्व मदत मिळाली. आज चीनबरोबर ब्राझील, मलेशिया, युरोप, जपान, मेक्सिको या देशांत व चेन्नईमध्ये फॉक्सकॉनचे काम चालते. फॉक्सकॉनची वार्षिक उलाढाल 138 अब्ज डॉलर आहे. अ‍ॅपलसह ब्लॅकबेरी, सिस्को, एसर, अ‍ॅमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट, नोकिया, सोनी असे ग्राहक आहेत.
गेल्या काही दशकांत युरोप-अमेरिकेत कुशल कामगारांची संख्या कमी झाली. कल्याणकारी राजवटीमुळे कामगारांचे पगार भक्कम वाढले आणि सोयीसुविधांत खूप भर पडली. साहजिकच उत्पादन खर्च वाढला. युरोप-अमेरिकेची ही अडचण चीनने ओळखली. तेथील कंपन्यांना कुशल मनुष्यबळ स्वस्तात हवे होते आणि त्याचबरोबर वेगाने, पण राक्षसी प्रमाणात उत्पादन करणारी केंद्रे हवी होती. काळ, काम व वेग याचे गणित जमवणारी केंद्रे ही श्रीमंत राष्ट्रांची गरज होती. कल्पकता त्यांच्याकडे होती, पण प्रचंड संख्येचे उत्पादन वेगाने करणे त्यांना शक्य नव्हते. असे उत्पादन करणे ही शंभर वर्षांपूर्वी युरोप-अमेरिकेची खासियत होती. पण नंतर आलेल्या समृद्धीने समाजात सुस्तपणा आला. कल्पकता राहिली तरी श्रमसंस्कृती कमी झाली. चीनने हा बदल हेरला आणि योग्य त्या औद्योगिक सेवा, अल्पकिमतीत देऊ केल्या. यातून चीनचा प्रचंड फायदा झाला. काही कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या वर आले. श्रीमंत वर्गात जाणा-यांची संख्या लक्षावधींनी वाढली.
मात्र याची किंमतही चुकवावी लागली. फॉक्सकॉनसारख्या ठिकाणी राक्षसी उत्पादन होते. कामगारांना किमान वेतन मिळत असले तरी त्यांचे राहणीमान अत्यंत कष्टाचे असते.
कामगारांच्या सोयीसुविधांचे जागतिक निकष तेथे पाळले जात नाहीत, अशा तक्रारी वारंवार होतात. या औद्योगिक केंद्रातील परिसर स्वच्छ असतो, पण कारखान्यांत अतोनात प्रदूषण असते. अपघात नित्याचे असतात. कामाचा ताण खूप असतो. त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढते. उत्पादनाचा वेग वाढवण्यासाठी केलेले उपाय कामगारांच्या शरीरावर दूरगामी परिणाम करतात. आयफोनची काच स्वच्छ होण्यासाठी पूर्वी अल्कोहोल वापरले जात होते. पण एन-हेक्झेन या रसायनाचे बाष्पीभवन अल्कोहोलपेक्षा तिप्पट कमी वेळात होते असे आढळून आल्यावर त्या रसायनाचा उपयोग सुरू झाला. यामुळे कामगारांकडून एका तासात जास्त आयफोन धुतले जाऊ लागले. मात्र हे रसायन अतिशय धोकादायक आहे व त्याचे अत्यंत घातक दुष्परिणाम कामगारांना सतावू लागले.

कामगार याविरुद्ध आवाज उठवतात. औद्योगिक वसाहतींमध्ये दंगलीही होतात. पण चीनमधील कम्युनिस्ट सरकार या गोष्टी बाहेर येऊ देत नाही. कामगारांच्या असंतोषाचा उत्पादनावर परिणाम होणार नाही याची दक्षता घेतली जाते. कामगारांच्या अशा राहणीमानावर युरोप-अमेरिकेतील वृत्तपत्रांतून झोड उठवली गेल्यावर अ‍ॅपलसह काही कंपन्यांनी चीनवर दबाव आणला. त्यानंतर गेल्या दोन वर्षांत कामगारांसाठी जुजबी सुधारणा करण्यात आल्या.
फॉक्सकॉनची ही काळी बाजू. पण जगाला भुलवते ती वेग, कौशल्य व राक्षसी उत्पादन यांचा उत्तम मेळ घालणारी व्यवस्थापकीय बाजू. काळ, काम व वेग यांचे गणित जमवणा-या कार्यसंस्कृतीत चीनच्या आर्थिक यशाचे रहस्य आहे. मात्र त्यामध्ये मानवी हक्क, मानव विकास निर्देशांक अशा मूल्यांना अजिबात स्थान नाही.

कार्यक्षमता, दर्जा, स्वस्त उत्पादन याबरोबर वाढता नफा हे तेथे सर्वोच्च मूल्य आहे. जीवनाच्या अन्य अंगांना तेथे अजिबात महत्त्व नाही. माणसाची स्पर्धा यंत्राशी आहे.
वर्क हार्ड ऑन जॉब टुडे ऑर वर्क हार्ड टू फाइंड जॉब टुमॉरो, हे तेथील ब्रीदवाक्य.
स्किल, स्केल, स्पीडचा मंत्र चीनने प्रत्यक्षात आणला तो मानवी चेहरा बाजूला ठेवून. कामगारांचे कुटुंब काय म्हणते, जग काय टीका करते याकडे दुर्लक्ष करून, चीनला झटपट श्रीमंत व्हायचे आहे आणि खिसा फुगू लागल्याने स्वातंत्र्याचा संकोच करण्यास जनताही मुभा देत आहे.
मात्र मानवी चेहरा नाकारून होणारा औद्योगिक विकास आणि त्यातून येणारी एकांगी श्रीमंती ही भारतीय विचारधारेत बसणारी नाही. पाश्चात्त्य देशांतील उच्च मूल्ये भारताने स्वीकारली आहेत. ती मूल्ये राबवायची तर उत्पादन खर्चिक होते. नफ्याचे प्रमाण घटते. जागतिक स्पर्धेत टिकता येत नाही. विकासाचा दर गाठता येत नाही.
पण ती मूल्ये नाकारली तर जगण्याला काही अर्थ राहत नाही... हा पेच नरेंद्र मोदींच्या लक्षात आला आहे की नाही, याची कल्पना नाही.
prashant.dixit@dainikbhaskargroup.com