आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंता अस्तित्वाची हवी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेसमध्ये विविध पदे अडवून बसलेल्या ढुढ्ढाचार्यांना लवकरच नारळ देऊन हा पक्ष तरुण, तडफदार युवकांचा केला जाणार असल्याचे मत माजी केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांनी व्यक्त केले आहे. रमेश हे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटचे व थिंक टँकमध्ये गणले जातात. पूर्वी २०१४ च्या लोकसभा व नंतर काही राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या प्रमाणात पराभव पत्करावा लागल्यानंतर रमेश यांनी याच स्वरुपाचे विधान केले होते, पण प्रत्यक्षात काँग्रेसला संघटनात्मक पातळीवर फार मोठे बदल करता आले नाही. राहुल गांधी लवकरच काँग्रेसचे अध्यक्ष होणार अशीही वृत्ते येत होती. पण तसे काहीच घडले नाही. आता पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत काँग्रेसमध्ये जनरेशन शिफ्ट होईल, असे रमेश ठामपणे सांगतात. ही जनरेशन शिफ्ट म्हणजे साठी-सत्तरी पलीकडले नेते मार्गदर्शक म्हणून पक्षात राहतील व चाळिशी-पन्नाशीचे नेते पक्ष चालवतील. प्रत्यक्षात काँग्रेसमध्ये तरुण तुर्क किती आहेत याचा शोध घ्यावा लागेल. देशात हिंदुत्ववादाचे उग्र राजकारण सुरू असताना सेक्युलर विचारसरणीची नेहमी तळी उचलणाऱ्या काँग्रेसचे रस्त्यावर असो वा मीडियामध्ये कोणत्याही स्वरुपाचे अस्तित्व लोकांना दिसत नाही. अशा स्वरुपात जनरेशन शिफ्टचे राजकारण करण्याची ताकद काँग्रेसमध्ये खरोखरीच आहे का याबाबत रमेश यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. काँग्रेसमध्ये जनरेशन शिफ्टचे राजकारण म्हणजे विविध महामंडळांची अनिर्बंधपणे सत्ता उपभोगलेले व सरंजामशाही-घराणेशाहीच्या पलीकडे राजकारणाचा विचार न करणाऱ्या शेकडो नेत्यांना पक्षातून दूर लोटणे असे आहे. तेवढी राजकीय किंमत किंवा नेतृत्वाचा दरारा काँग्रेस दाखवू शकेल का हा कळीचा मुद्दा आहे पक्षाला खरी गरज असते विचारांची, भूमिकांची. काँग्रेस त्याच्या मूळ विचारधारेपासून भरकटल्याने या पक्षाची पीछेहाट होताना दिसत आहे. त्यावर अधिक चिंतन करण्याची काँग्रेसला गरज आहे.