आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Congress Performance In Maharashtra Assembly Election By Akar Patel

महाराष्‍ट्रात कॉंग्रेस पराभवाच्या वाटेवर !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरेंद्र मोदी यांनी सार्वत्रिक निवडणुकीत दिलेले वचन म्हणजे ‘काँग्रेसमुक्त भारत’ याचा अर्थ तो पक्ष संपल्यावर केवळ ते समाधानी होतील. केंद्रात काँग्रेसची सत्ता नाही आणि मोदींच्या निर्णायक विजयामुळे लोकसभेतली काँग्रेसची ताकद जवळपास संपलीच, त्यांना १० टक्के जागासुद्धा मिळाल्या नाहीत.

तथापि, ११ राज्यांमध्ये अजूनही काँग्रेसचे सरकार आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम आणि उत्तराखंड अशी ही राज्ये आहेत. गेल्या वर्षी दिल्ली, राजस्थान आणि आंध्र प्रदेश या राज्यांत काँग्रेसचा पराभव झाला.
काँग्रेसच्या हातात असलेल्या राज्यांपैकी पाच राज्ये ईशान्येकडील राज्ये आहेत, ज्यापैकी अनेक प्रदेश हे कमी लोकसंख्येचे प्रदेश आहेत. हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्र आणि केरळ ही महत्त्वाची राज्ये आहेत. यापैकी महाराष्ट्र आणि हरियाणा इथे काही दिवसांत निवडणूक होणार आहे.
महाराष्ट्रात मोदी अंदाजे दोन डझन सभांमध्ये सहभागी झाले आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी मात्र दोनच ठिकाणी भाषण केले आहे. टीव्ही चॅनल्सनी केलेल्या ओपिनियन पोलने (निवडणूकपूर्व सर्वेक्षणाने) कोण जिंकणार याचे स्पष्ट चित्र उभे राहत नाही; पण सर्वानुमते काँग्रेस हरणार आहे, असे दिसत आहे. इंडिया टीव्हीचा व्होटर ट्रॅकिंग पोल असे दर्शवतो की, विधानसभा निवडणुकीत भाजप २८८ पैकी ९३ जागा जिंकणारा एकमेव पक्ष असेल, त्याखालोखाल शिवसेनेला ५९ जागा मिळतील. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ४७ जागा जिंकता येतील आणि त्याखालोखाल काँग्रेसला ४० जागा मिळवता येतील.
एबीपी न्यूज आणि निल्सन यांनी केलेले अजून एक सर्वेक्षण आहे. ज्यात भाजपला ११२ जागा, शिवसेनेला ६२ जागा, एनसीपीला ३८ आणि काँग्रेसला ४५ जागा जिंकता येतील, असे म्हटले आहे.

मिंट या वृत्तपत्राने आपल्या बातमीत म्हटले आहे की, ‘निवडणूकपूर्व सर्वेक्षण दर्शवते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेमुळे राज्य विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजप एक मोठा पक्ष बनेल. असे असले तरी स्पष्ट बहुमत मिळवण्यात हा पक्ष कमी पडेल.’

झी टीव्हीने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार भाजप एक मोठा पक्ष म्हणून उदयाला येईल. त्याखालोखाल काँग्रेस आणि मग शिवसेना असतील. या अंदाजावर माझा अधिक विश्वास आहे आणि तो का हे मी ओघात स्पष्ट करीन. चॅनल्सनी केलेले विश्लेषण असे होते की, ‘भाजपला ९० जागा मिळतील, त्याखालोखाल काँग्रेसला ७२ आणि शिवसेनेला ६१ जागा मिळतील, असा कयास आहे. एनसीपी ३८ जागा जिंकेल, असा अंदाज आहे. याचा अर्थ जेव्हा युती तुटते तेव्हा मतदार युतीतील अशा प्रबळ पक्षाला पाठिंबा देतात ज्याचा राष्ट्रीय स्तरावर जोर आहे. राज्यात शिवसेना ही भाजपपेक्षा शक्तिशाली आहे, असा जरी शिवसेनेचा दावा असला तरी मोदी करिष्मा पक्षाला पुढे नेईल. कारण आज तरी मोदींनी दिलेल्या आव्हानाचा सामना उद्धव ठाकरे करू शकत नाहीत.’

हरियाणाच्या ९० सदस्यीय विधानसभेविषयीच्या एका निवडणूकपूर्व सर्वेक्षणात असा दावा करण्यात आला आहे की, भाजप ३३ जागा जिंकणारा एक मोठा पक्ष म्हणून इथे उदयाला येईल. गेली १० वर्षे सत्तेवर असलेला काँग्रेस पक्ष १६ जागा पदरात पाडून घेईल आणि तिस-या स्थानावर असेल. हे शक्य आहे तसेच भाजपला बहुमत मिळण्याचीही शक्यता आहे. कारण काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत हरियाणातील १० जागांपैकी ७ जागा मिळवण्यात भाजपला यश आले. जागांच्या गणितात काहीही फरक असले तरी या दोन राज्यांतील पराभव काँग्रेससाठी मोठा फटका असणार आहे. फक्त पक्षाच्या जागाच यापुढे कमी होत जातील एवढेच नाही, तर महाराष्ट्रात जर पक्ष हरला तर पक्षाला निधी मिळण्याचे दरवाजेही बंद होतील.

काँग्रेस पक्ष केवळ एकदाच १९९५ मध्ये महाराष्ट्रात हरला होता. देशात जर कुठे काँग्रेसला व्यवस्थित फंड मिळत असेल आणि अनुभवी नेत्यांची फौज जर कुठे असेल तर ती महाराष्ट्रात आहे. जर मोदी आले आणि त्यांनी या सगळ्यांचा राज्यातही धुव्वा उडवला तर गांधींसाठी ही खूप लाजिरवाणी बाब असेल. विशेषतः राहुलसाठी, जो या सा-या आघाताकडे कॅज्युअली बघत आहे, खरं तर ही पक्षासाठी हानिकारक बाब आहे. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील दोन ज्येष्ठ नेते गेल्या काही वर्षांत गमावले आहेत, अशा दोन व्यक्ती, ज्यांनी राज्यात पक्ष उभा केला. पहिली व्यक्ती म्हणजे प्रमोद महाजन. त्यांच्या भावाने गोळी झाडून त्यांचा खून केला आणि दुसरे गोपीनाथ मुंडे. महाजन यांचे मेव्हणे गोपीनाथ मुंडे, ज्यांचा मृत्यू या वर्षी एका अपघातात झाला. असे मोठे नुकसान होऊनही भाजपने पक्ष उभारणी कायम ठेवली आणि आक्रमकपणा चालू ठेवला. गेली २५ वर्षे शिवसेनेसोबत असलेली युती तोडण्याच्या घटनेवरून राज्यातील पक्षाच्या मजबुतीचा आणि आत्मविश्वासाचा पूर्ण अंदाज येतो.

माझे भाकीत असे आहे की, युती तुटणे हे शिवसेनेसाठी घातक ठरणार आहे. तो पक्ष राज्यात यापुढे महत्त्वाचा राहणार नाही. ठाकरे आणि भाजप यांनी दोन दशके विचित्र रचना केली होती, ज्याला निरीक्षकांच्या मते काही अर्थ नव्हता. भाजप महाराष्ट्रात लोकसभेच्या अधिक जागांवर लढणार आणि शिवसेना विधानसभेच्या जास्त जागा उभ्या करणार, असे होते. तरीही भाजपला प्रत्येक १० जागांपैकी ४.५ जागा जिंकत, तर सेनेला दहापैकी ३ जागा मिळत. यावरून कोणता पक्ष प्रबळ होता हे स्पष्ट होते; पण बाळासाहेब ठाकरे यांचा करिष्मा आणि प्रमोद महाजन यांचा राज्यापेक्षा दिल्लीत फोकस असणे यामुळे भाजपने किंमत देऊन सेनेची भरभराट झाली. हे संपले आहे.
शिवसेना हा राजकीय पक्ष या अर्थाने परंपरागत पक्ष नाही, कारण साधा जाहीरनामा करण्यातही या पक्षाला स्वारस्य नाही. विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया देण्याचे काम तो करतो आणि या पक्षाचे नेतृत्व पाकिस्तानी क्रिकेट संघाची भारत भेट अशा असंबद्ध गोष्टींबाबत सक्रिय आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (ज्याचे केंद्र महाराष्ट्रात आहे) यांच्या पाठिंब्याशिवाय सेना संपुष्टात येईल.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर गांधी कुटुंबीयांनी मोदींशी झगडण्यासाठी जी व्यूहरचना (जी काही आता आहे) केली आहे तिला अधिक छिद्रे पडतील. आजवर तरी त्यांनी ख-या लढ्यासाठी आवश्यक हिंमत दाखवलेली नाही. तसेच मोदींकडे जी भूक आहे तीही त्यांच्याकडे नाही. जेव्हा महाराष्ट्रात आणि हरियाणात काँग्रेस पक्ष पराभूत होईल तेव्हा पंतप्रधानांनी काँग्रेसमुक्त भारताच्या दिशेने दोन पावले पुढे टाकलेली असतील.