आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Congress Politics By Atish Nagpure, Divya Marathi

काँग्रेसला पापक्षालनाची संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘तोडे नहीं, जोडे’, ‘मैं नहीं, हम’, ‘कट्टर सोच नहीं, युवा जोश...’ सध्या देशभर सुरू असलेल्या काँग्रेसच्या निवडणूक कॅम्पेनमधील ही काही स्लोगन्स. कधी नव्हे ते काँग्रेसने यंदा आपल्या निवडणूक प्रचारात मूलभूत मुद्द्यांना इतक्या ठळकपणे स्पर्श केला आहे. नरेंद्र मोदी हेच काँग्रेसच्या या प्रचारनीतीमागचं कारण आहे, हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. पण 64 वर्षांच्या लोकशाहीनंतरही ही वेळ का यावी, याचा विचार काँग्रेस आणि प्रत्येक सुज्ञ नागरिकाने केला पाहिजे. गेल्या 64 वर्षांतील मोठा काळ या देशात काँग्रेसचीच सत्ता होती. पण विचार कुणाचा पसरला, सिद्धांत कोणते लोकप्रिय झाले, हे असे का घडले, काँग्रेसच आपल्या तत्त्वांशी प्रामाणिक राहिली नाही का, आज केवळ सत्ता गमावण्याच्या भीतीपोटी काँग्रेसला या तत्त्वांचे स्मरण झाले आहे का, की काँग्रेसच्या तरुण नेतृत्वाची या मूल्यांवर प्रामाणिक निष्ठा आहे, असे बरेच प्रश्न आज उपस्थित झाले आहेत.


स्वातंत्र्याच्या आधीपासूनच देशात संघविचार वेगाने पसरत होता. उत्तरोत्तर हा विचार जनसंघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांसारखे मुखवटे धारण करून पुढे आला. त्यात भर घातली ती शिवसेना, हिंदू रक्षा समितीसारख्या संघटनांनी. तिला प्रत्युत्तर म्हणून मुस्लिम लीग, सिमी यांसारख्या संघटनांचा प्रभाव वाढत गेला. दंग्यांचं प्रत्युत्तर बॉम्बस्फोटांनी दिलं जाऊ लागलं. राष्‍ट्रीय पटलावर मोदींचा उदय, हे या द्वेषमूलक तत्त्वांनी गाठलेले टोक म्हणता येईल. यामुळे हादरलेल्या काँग्रेसने आज ‘तोडो नहीं, जोडो’चा नारा दिला आहे. पण 60 वर्षे आणि त्यातही विशेष गेली 30 वर्षं हे सर्व घडत असताना काँग्रेस काय करत होती? काँग्रेस आणि डॉ. बाबासाहेबांमुळे देशाला संपन्न अशी घटना मिळाली असली तरी तिचा विचार जनमानसात रुजवण्यात काँग्रेस किती यशस्वी ठरली? हा समाज घटनेशी एकरूप होण्यासाठी काँग्रेसने काय केलं, की सत्तेच्या चढाओढीत काँग्रेसचं याकडे दुर्लक्ष झालं?


कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना, भाजप यांसारखी काँग्रेसला केडरची संस्कृती नाही. सत्तेच्या आशेने वेगवेगळ्या विचारांचे लोक काँग्रेसचा भाग बनले. त्यामुळे काँग्रेसचा मूळ विचार कार्यकर्त्यांपर्यंत कधी झिरपू शकला नाही. किंबहुना काँग्रेसचा विचार काय आहे, हे पक्षाच्या ब-याच कार्यकर्त्यांना माहीत नसण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसची विचारसरणी आणि नेते-कार्यकर्ते यांचं वर्तन यामध्ये अनेकदा अंतर्विरोध दिसून येतो. महाराष्‍ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सत्यसाईबाबांना ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी पाचारण करणं, त्यांनी स्वत:च्या नावापुढे राव लावणं, महाराष्‍ट्रात जादूटोणाविरोधी विधेयक संमत करण्यासाठी 16 वर्षं लावणं, मुझफ्फरनगर दंगलीत काँग्रेस आमदारांनी चिथावणीखोर भाषणं करणं, देशाच्या विविध राज्यांत-जिल्ह्यांत- तालुक्यांत-खेड्यांत नेत्यांनी सोयीने जातीचं राजकारण करणं, अशा घटनांमधून काँग्रेसमधील पोकळपणा स्पष्ट होतो. आज विविध राज्यांमध्ये काँग्रेस कमकुवत झालेली आहे. एकेकाळी काँग्रेस त्या ठिकाणी सर्वसमावेशक राजकारण करण्यात अपयशी ठरली, हेदेखील त्यामागील एक कारण आहे. उत्तर प्रदेश, बिहार ही त्याची ठळक उदाहरणं असली तरी महाराष्‍ट्रातही हा फॅक्टर दुर्लक्षिता येणार नाही. महाराष्‍ट्रातील ‘मराठा लॉबी’मुळे सुशीलकुमार शिंदेंचं मुख्यमंत्रिपद गेलं, ही घटना फार जुनी नाही. त्यांनी यासंबंधीची आपली खदखद बोलून दाखवली. त्यामुळे विरोधकांवर हल्ला करताना काँग्रेसचीही बाजू लंगडी पडत असून देशापुढील विकृतीचा मुकाबला करणं पक्षाला जड जातंय.


गेल्या तीन दशकांत जग खूप बदललं. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे माणसं जवळ आली. सर्व भेद संपले आहेत, असा आभास निर्माण झाला. हे आभासी चित्रच काही जण खरं समजू लागले. पण या चित्रात रमणा-यांचा प्रत्येक पावलावर भ्रमनिरास होऊ लागला. जागतिकीकरणामुळे भौतिकदृष्ट्या जग जवळ आलं, तरी नाना त-हेच्या भेदाच्या भिंती पडल्या नव्हत्या. किंबहुना त्या अधिकच बळकट झाल्या होत्या. हा तोच काळ होता, जेव्हा देशभर प्रादेशिक अस्मितांचे भांडवल करणारे, विशिष्ट जातसमूहांचे हितसंबंध जपण्याचा दावा करणारे, धर्मांधतेचे विष कालवणारे सत्तेच्या केंद्रस्थानी येऊ लागले होते आणि काँग्रेस दुबळी होऊ लागली होती. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेली पहिली पिढी आणि लढ्याच्या सुरस कथा ऐकलेली दुसरी पिढी तोवर अस्तंगत झालेली. स्वातंत्र्यलढा, नीतिमत्ता यांविषयीचा ‘रोमँटिसिझम’ संपलेला होता. त्याचीच जागा पुढील काळात घेतली ती हव्यास आणि धर्मांधतेने!


काँग्रेसने धर्मांधतेचा मुकाबला धर्मनिरपेक्षतेने, विकृतीचा मुकाबला विवेकाने आणि असत्याचा मुकाबला सत्याने केला नाही, तर ‘फोडा आणि राज्य करा’, ‘शत्रूचा शत्रू तो मित्र’, ‘सत्तेसाठी वाट्टेल ते’ हे धोरण राबवलं. सत्तेसाठी काँग्रेसने कधी विरोधी पक्षाला फोडलं, तर शिवसेनेला छुपा पाठिंबा दिला. नंतर तीच शिवसेना अक्राळविक्राळ रूप धारण करून काँग्रेसला आव्हान देऊ लागली. बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वामुळे भाजपलाही येथे रुजता आलं. या पुरोगामी भूमीत बघता बघता हा पक्ष कसा पसरला हे काँग्रेसलाही कळलं नाही. काँग्रेसची नीती बदललेली नाही. आज युतीला शह देण्यासाठी काँग्रेस मनसेला मोठं करतेय. मनसे ही सेना-भाजपसारखीच संघटना आहे. या घातक राजकारणामुळे व्यथित होणारे काँग्रेसमध्ये खरंच किती जण आहेत? हा प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण की, काँग्रेसचा विचार हा त्या पक्षातच किती रुजलाय हा महत्त्वाचा मुद्दा आहे.


लोकशाही अर्थात सत्तेचं विकेंद्रीकरण, धर्मनिरपेक्षता हे मुद्दे घेऊन यंदा काँग्रेस निवडणुकीत उतरली आहे. ही निवडणूक म्हणजे काँग्रेसला पापक्षालनाची संधी आहे. काँग्रेसने आपल्या ऐतिहासिक चुका दुरुस्त करण्याची हीच योग्य वेळ आहे. आपल्या विरोधातील पक्षांतर्गत कटकारस्थानांना शह देण्यासाठी स्व. इंदिरा गांधी यांनी काँग्रेसमधील लोकशाहीचा बळी दिला होता. शाहबानो खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलण्याची घोडचूक राजीव गांधी यांनी केली होती. हेही नसे थोडके म्हणून की काय, त्यांनी बाबरी मशिदीचं कुलूप उघडून धर्मांधांना रान मोकळ करून दिलं होतं. मोदींचा उदय हा त्याचाच परिपाक आहे. आज आजी आणि वडिलांची चूक दुरुस्त करण्याची जबाबदारी राहुल यांच्या तरुण खांद्यांवर आहे. याहीपुढे जाऊन काही विचार देशात रुजवण्याचं शिवधनुष्य राहुल यांना पेलायचं आहे. येथील तरुणांच्या मनाला विद्वेषाचा विचार शिवणार नाही, कोणत्याही विखारी प्रचाराला ते बळी पडणार नाहीत, यासाठी राहुल गांधींना काम करायचे आहे. इतक्या सुपीक विचारांची भूमी तयार करण्याचं लक्ष्य राहुल यांनी ठेवलं पाहिजे.


a5nagpure@gmail.com