आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Convesion And Modi Government By Aakar Patel

धर्मांतराचा वाद आणि प्रतिवाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तत्कालीन यूपीए सरकारप्रमाणे मोदी सरकारलाही लोकसभेत बहुमत असले, तरी वारंवार मोदी सरकार गोत्यात येत आहे. या अवस्थेमुळेच लोकसभेची कार्यक्षमता कमी होत आहे.
याला नरेंद्र मोदींच्या कंपूतील लोकांची वक्तव्ये आणि कृती दोन्ही जबाबदार आहेत. त्यातील एका मंत्रिमहोदयांबद्दल मी मागच्या लेखात लिहिले होते. गेल्या आठवड्यात दोन गोष्टींमुळे अडचण निर्माण झाली. पहिली गोष्ट म्हणजे गांधींचा खून करणा-या नथुराम गोडसेचा उदो उदो करणारे भाजप खासदारांचे अनावश्यक स्टेटमेंट. हा साधू खासदार ज्याने नेता व्हायचे ठरवले आहे, तो म्हणाला की, बंदूक चालवण्यात हुशार असलेली एक व्यक्ती ज्याने नि:शस्त्र वृद्ध माणसावर गोळी चालवली तो देशभक्त होता. माझ्या मते, हे विधान निरर्थक आहे. कारण प्रत्येकाला माहीत आहे की हा संघाचा दृष्टिकोन आहे. अशा विधानांमुळे संसदेचे कामकाज थांबू शकते याची तुम्हाला कल्पना होती, तर मग असे वक्तव्य जाहीररीत्या करायची काय गरज होती? या वक्तव्यामुळे खरोखरीच संसदेचे कामकाज ठप्प झाले.

वादग्रस्त वक्तव्ये करणा-या आपल्या एका मंत्र्याने त्याचे शब्द मागे घ्यावेत, असे मोदींनी ठामपणे सांगितले. तथापि, दुस-या एका अशाच वादग्रस्त घटनेत सरकारने शरणागती पत्करली असल्याचे दिसले नाही. हे प्रकरण धर्मांतराविषयी होते. हा असा मुद्दा आहे ज्याने भारतीय जनता पक्षाला नेहमी त्रासले आहे. अनेकदा हिंदूंचे इस्लाममध्ये धर्मांतर किंवा ख्रिश्चन धर्मात सामील होणे याबद्दल कायम भाजपला चिंता वाटत असते. मात्र, धर्मांतराचे प्रमाण सध्या जरी खूप कमी आहे आणि अशी धर्मांतरे श्रद्धेमुळे नाही, तर लग्नांमुळे होतात. गेल्या आठवड्यात दुसरे पारडे जड झाले होते. कारण मुघल राजधानी असलेल्या आग्-यामध्ये मुस्लिम लोकांचे धर्मांतर झाले होते.
बीबीसीच्या अहवालानुसार साधारण २५० लोकांनी हवनात सहभाग घेतला. ज्यांचे धर्मांतर झाले, त्यातील अनेक नागरिक हे गरीब असून कचरा उचलण्याचे काम करणारे होते. त्यातील अनेकांनी सांगितले की या कार्यक्रमास उपस्थित राहिल्यास रेशन कार्ड आणि इतर मूलभूत गरजा भागवण्याचे स्थानिक हिंदू कार्यकर्त्याने कबूल केले होते.

सलिना नावाच्या एका मुलीने सांगितले की, तो धर्मांतराचा विधी होता याची तिला कल्पनाच नव्हती. "विधी चालू असताना अचानक आम्हाला धर्मगुरू करत आहेत तसेच करायला सांगण्यात आले. एका मुस्लिम माणसाला तर देवाची मूर्ती हातात धरण्यास सांगण्यात आले.'
"विधी आटोपल्यावर स्थानिक कार्यकर्त्याने आम्हाला सांगितले की, आम्ही सगळे हिंदू झालो आहोत. आम्हाला याचा विरोध करायचा होता; पण आम्हाला रेशन कार्ड आणि इतर गोष्टी मिळणार आहेत म्हणून शांत राहण्यास सांगण्यात आले.' दुसरी एक जण - मुमताज मात्र म्हणाली की कुणीही आमच्यावर जबरदस्ती करून कार्यक्रमाला बसवले नाही. इथे सारे स्वखुशीने गेले होते.

माझ्यासाठी हा काही मोठा मुद्दा नाही; पण उर्दू प्रसारमाध्यमे यावर चिडली. "इन्किलाब' नावाचा सगळ्यात जुना आणि नावाजलेला उर्दू पेपर आहे त्याने ‘झूठ, धोखा और बदतरीन फिरकापरस्ती’(खोटेपणा, फसवणूक आणि धर्मवाद) या मथळ्याचे संपादकीय छापले.
अचानक विरोधक संसदेत आक्रमक झाले. या धर्मांतरामुळे आपणही त्रासून गेल्याचे व हे प्रकार थांबले पाहिजेत, असे उत्तर भाजपनेही संसदेत दिले. मात्र, ही चर्चा भरकटत गेली; पण विरोधक हा मुद्दा जितका ताणून धरतील, तितकेच भाजपला आपले मूळ वक्तव्य अधिक जोरकसपणे मांडण्यास बळ मिळत जाईल. भाजपने अशी भूमिका जाहीर केली की, सगळी धर्मांतरे वाईट आहेत आणि यावर राज्याचे नियंत्रण हवे, अगदी धर्मस्वातंत्र्यावर गदा आली तरीही.
भाजपच्या या भूमिकेवर विरोधकांनी अधिक रान पेटवणे शहाणपणाचे ठरणार नव्हते. माझे विश्व हिंदू परिषदेतील मित्र अशोक चौगुले यांनी महात्मा गांधींनी धर्मांतराच्या मुद्द्यावर पूर्वी केलेल्या काही वक्तव्यांची यादीच मला पाठवली. ज्यात खालील वक्तव्यसुद्धा होते.

महात्मा गांधी म्हणतात, 'एखाद्याने दुस-याचे केलेले धर्मांतर यावर माझा विश्वास नाही. माझा प्रयत्न ती व्यक्ती ज्या धर्मातील आहे त्या धर्माचे परिपूर्ण पालन तिने करावे यावर राहील. त्याजोगे सर्वच धर्मांतील सत्याचा आदर होईल आणि त्यावरील श्रद्धाही दृढ होईल. यातून पुन्हा असे सूचित करायचे आहे की खरी सहिष्णुता आणि दैवी प्रकाश सर्वच धर्मांच्या माध्यमातून स्वीकारणे श्रेयस्कर आहे आणि मानवी देह हा जरी असा प्रकाश स्वीकारण्यासाठी अपुरा असला, तरीही या अपुरेपणाने का होईना सर्व धर्मांची शिकवण सलोख्याने स्वीकारली पाहिजे.'

धर्मांतराविषयी बोलताना महात्मा गांधी अजून एके ठिकाणी म्हणाले की, ज्यांनी धर्मांतर केले आहे त्यांनी ते संपूर्णपणे स्वीकारायला हवे. ते म्हणतात : 'चुकीच्या हेतूने केलेली एक कृतीदेखील पूर्ण धर्म शिकवणीला विषाच्या थेंबाप्रमाणे बाधक ठरू शकते. सारे काही बिघडवू शकते. त्यामुळेच मी धार्मिक उपदेश देणार नाही. गुलाबाला काही जगाला उपदेश करायची गरज नाही. त्याचा सुवास आपोआप पसरतो. हा सुवास हाच त्याचा संदेश आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक आयुष्याचा सुगंध हा गुलाबापेक्षा सुंदर आणि सूक्ष्म असतो.'
भारतीय संविधानाने धर्मांतराविषयीचा वाद कायद्याने निकालात काढला आहे. कलम २५ने सर्व भारतीयांना आपल्याला हवा तो धर्म स्वीकारण्याची, त्याची शिकवण अमलात आणण्याची, त्याचा प्रसार करण्याची संपूर्ण मुभा दिली आहे.
आपल्या उपखंडात भारत हाच इतका उदार धर्मविषयक कायदा करणारा देश आहे आणि ही गोष्ट सरकारवर हल्ले चढवताना विरोधकांनी लक्षात घ्यायला हवी. पुन्हा अशी स्थिती निर्माण होता कामा नये, ज्यामुळे कायद्याची पुस्तके उघडायला लागून सर्व घटनेचा अन्वयार्थ शोधत बसावे लागेल.

सारे काही राजकारणासाठी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या मे महिन्यामध्ये केंद्रात सरकार स्थापन केले. त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये काही राज्यांमध्ये विधानसभांच्या पोटनिवडणुका झाल्या. त्यामध्ये उत्तर प्रदेशचाही समावेश होता. मुस्लिम युवक हिंदू मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी लग्न करतात व त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडतात, असा आरोप करत संघ परिवाराच्या काही लोकांनी उत्तर प्रदेशमध्ये या निवडणुकांच्या आधी जोरदार प्रचार सुरू केला. मुस्लिम युवकांकडून हिंदू धर्मातील मुलींना फसवण्याच्या कथित घटनांना संघ परिवाराने 'लव्ह जिहाद' असे नाव दिले होते. लव्ह जिहादचे प्रकरण जोरकसपणे लावून धरल्यानंतरही उत्तर प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकांत भाजपला हवे तसे यश मिळू शकले नव्हते. आग्रा येथे रा. स्व. संघ परिवाराने काही मुस्लिमांचे धर्मांतर केले. त्या घटनेचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरही पडसाद उमटले. ख्रिसमसच्या पहिल्या दिवशी म्हणजे २५ डिसेंबर रोजी धर्मांतराचे काही सोहळे आयोजण्याचे प्रयत्न संघ परिवाराकडून सुरू होते. त्या सोहळ्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेवरून आम्ही हा कार्यक्रम स्थगित केला आहे, असे संघाच्या स्थानिक नेत्यांनी जाहीर केले आहे! बळजोरीने किंवा आमिष दाखवून जी धर्मांतरे केली जातात, त्या प्रकारांना आळा घालण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने अशा धर्मांतरांच्या विरोधात १० जुलै २०१३ रोजी एक कायदा अमलात आणला. ज्यांना आपला धर्म बदलायचा आहे, त्या व्यक्तींची धर्मंातरासाठी रीतसर परवानगी घेणे या कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. बळजोरीने धर्मांतर करण्याच्या विरोधात एकट्या मध्य प्रदेशनेच नव्हे, तर ओडिशा, गुजरात, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आदी राज्यांनीही असा कायदा केला आहे. याच कायद्याचा फॉर्म्युला डोळ्यासमोर ठेवून भाजपने राष्ट्रीय स्तरावरही धर्मांतराविरोधातच कायदा करण्याची भाषा संसदेत केली आहे.