आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचारामुळे विविध देशांत राजकीय अस्थिरता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जनतेच्या पैशांचा गैरवापर कोण करतो? - Divya Marathi
जनतेच्या पैशांचा गैरवापर कोण करतो?
गेल्या वर्षभरात जागतिक पातळीवर भ्रष्टाचार ही एक मोठी समस्या बनली असून यामुळे अनेक देशांतील सरकारे संकटात सापडल्याचे चित्र आहे. ताजे उदाहरण दक्षिण कोरियाचे आहे. येथील संसदेने महिला राष्ट्रपती पार्क ग्यून यांच्याविरोधात महाभियोग चालवून मतदान घेतले आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. त्यांची जवळची मैत्रीण, सल्लागार चोई सून सिल यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने त्यांच्या सार्वजनिक सभांमधील भाषणे बदलली. एवढेच नाही तर राष्ट्राध्यक्षांच्या काही निर्णयांमध्येही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. या संबंधांचा दुरुपयोग करत त्यांनी मोठ्या उद्योजकांकडून कोट्यवधींची रक्कम लाटल्याचेही आरोप आहेत. संगनमताने केलेला हा मोठा घोटाळा असल्याने राष्ट्राध्यक्षांनाच पदावरून हटवण्याची मागणी होत आहे.

अन्य देशांतही अशीच स्थिती
ब्राझीलमध्ये ‘कार वॉश स्कँडल’मुळे देशभरात गोंधळ माजला असून सरकारमधील सर्वच थरांतील लोक यात अडकले आहेत. परिणामी माजी राष्ट्राध्यक्षा डिलमा रुसौफ यांच्याविरोधात ऑगस्ट महिन्यात महाभियोग चालवण्यात आला.

दक्षिण आफ्रिकेतही साधारण अशीच स्थिती आहे. तेथील राष्ट्राध्यक्ष जेकब जुमा यांनी जनतेच्या पैशांचा दुरुपयोग केल्याचा आरोप असून त्यांना पदावरून हटवण्याची मागणी जोर धरत आहे.

ग्वाटेमालामध्ये २०१५ मध्ये सरकार पडले. संयुक्त राष्ट्राच्या तपासात राष्ट्राध्यक्ष ओत्तो परेज मोलिना आणि महिला उपराष्ट्राध्यक्ष रोक्साना बल्देती हे लाचखोरीत सहभागी असल्याचे उघड झाले. देशाच्या उच्चपदस्थ व्यक्तींच्या भ्रष्ट वर्तणुकीमुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघाले.

अर्जेंटिनाच्या माजी राष्ट्राध्यक्ष क्रिस्टिना फर्नांडिस आणि त्यांच्या पक्षातील चार वरिष्ठ नेते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरले.

व्हेनेझुएलामध्ये निकोलस मादूर यांचे सरकार ७२० टक्के महागाई दरातही हँडगन, शॉटगन, रायफली गोळा करून नष्ट करत आहे. संतप्त लोक आपल्याला सत्तेवरून पायउतार करतील, अशी भीती सरकारला आहे. काही वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिकेतील देशांत समाजवादी देश म्हणून ख्याती असलेला हा देश आज सर्वाधिक भ्रष्टाचार असलेल्या २० देशांच्या यादीत आठव्या स्थानावर आहे.

घोटाळ्यांची ही मालिका पाहिल्यास विविध देशांच्या प्रमुख नेत्यांनाच भ्रष्टाचाराचा आजार झाल्याचे दिसून येते.
बोस्टन विद्यापीठातील बिहेविअरल इकॉनॉमिक्सचे प्रोफेसर रेमंड फिसमॅन हे सिस्टिमॅटिक करप्शन या विषयावर अभ्यास करत आहेत. ते म्हणतात, भ्रष्टाचार झपाट्याने व्यापक स्तरावर पसरत असेल तेव्हा अशी स्थिती निर्माण होते. काही काळानंतर तो देशाच्या आर्थिक आणि राजकीय जीवनाचा अविभाज्य भाग बनतो. सरकारी प्रणालीत एकदा त्याचा शिरकाव झाला की काही वेळातच संपूर्ण प्रणालीला विळखा बसतो. प्रामाणिक माणसेही गैरवर्तणूक करू लागतात. जास्तीत जास्त लोक भ्रष्टाचारात सहभागी असल्यास गुन्हा करण्यासाठी साथीदारही सहजपणे मिळतात.

तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही वर्षांत विविध सरकारचे घोटाळे उघड होणे, ही चांगली बाब आहे. यावरून आरोप करणारे पक्ष व संस्थांना भ्रष्टाचाराची साखळी ओळखून त्याविरोधात आवाज उठवण्यात यश मिळत आहे. यामुळे मोठमोठे नेते व अधिकाऱ्यांविरोधात कारवाई होत आहे. एकूणच नेता निवडून देण्यात आणि भ्रष्ट नेत्याला खुर्चीवरून खेचण्यातही संबंधित देशांतील नागरिकांची महत्त्वाची भूमिका असते, हेच खरे.
प्रामाणिक लोक जास्त, तिथे लाच देण्याची जोखीम
प्रोफेसर फिसमॅन म्हणतात, संतुलनाची पारख ही भ्रष्टाचार ओळखण्याची कसोटी आहे. दोषपूर्ण व्यवस्थेत सगळेच नाटक करत असतात. भ्रष्टाचार हे एका व्यक्तीचे काम नाही. मोठमोठ्या योजनांचे कंत्राट मिळवण्यासाठी लाच कुठे द्यायची, याची सर्वप्रथम माहिती काढली जाते. संबंधित व्यक्तीच्या आजूबाजूला किती जण असतात, त्यापैकी किती जण भ्रष्टाचारात सहभागी आहेत, हे पाहिले जाते. अशा स्थितीत जास्तीत जास्त लोक प्रामाणिक असतील तर लाच देणे जोखमीचे काम असते. म्हणजेच तेथे प्रामाणिकपणाचे योग्य संतुलन आहे. याउलट संबंधित व्यक्तीच्या चहुबाजूंना लाचखोर लोक असतील तर योजनेच्या निधीची समीकरणेच बदलतात. अशा स्थितीत प्रामाणिकपणाला फार किंमत राहत नाही. अनेक जण पुढे जाण्यासाठी प्रामाणिक माणसांना मार्गातून हटवण्याचा प्रयत्न करतात.
अमांडा टॉब, आंतरराष्ट्रीय घटनांच्या विश्लेषक
© The New York Times
बातम्या आणखी आहेत...