आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटचे उलटे फेरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धोनीच्या बॅटलाही अनेक चेंडूंनी चकवले होते. बिचारा युवराज मात्र भारतीय क्रिकेट रसिकांच्या रोषाचा बळी ठरला. एका अपयशावरून युवराजला ‘बाद’ करण्याची चूक कुणी करू नये.
क्रिकेट हा खेळच असा आहे, तो एका रात्रीत हीरो बनवतो आणि काही क्षणातच खलनायक ठरवतो. भारताला 2011 चा विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजवणार्‍या युवराजसिंगचेच उदाहरण घ्या! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खराब खेळपट्टीवर त्याच्या फलंदाजीला पुन्हा एकदा बहर आला. अंतिम सामन्यात श्रीलंका गोलंदाजीची तो धुलाई करणार असेच अंदाज बांधले जात होते. त्या अपेक्षांना सुरुंग लावणारी 21 चेंडूतील 11 धावांची खेळी त्याच्या गतकर्तृत्वावर पाणी फिरवणारी ठरली. सचिन तेंडुलकरनेच निवृत्तीनंतर म्हटले होते की, ट्वेन्टी-20 क्रिकेट तर 3 चेंडूंत तुम्हाला हीरो करू शकतो. त्याच वाक्याची दुसरी बाजू अशी की, तीन चेंडू ऐन मोक्याच्या क्षणी नुसते एकही धाव न घेता तटवून काढल्यानंतर तुम्ही झीरो बनता. विचित्र योगायोगही पाहा. सुरुवातीच्या षटकांमधील असे अनेक चेंडू नुसते तटवले किंवा वाया गेले की कुणी फारसे बोलत नाही. मात्र षटके संपत आली की प्रत्येक चेंडूवर चौकार, षटकारांचा वर्षाव हवा असतो. प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या त्या ऐन मोक्याच्या क्षणी जशी गोलंदाजीची पिटाई होऊ शकते तशी ती अचूक टप्प्यावर पडून धावाही रोखू शकते. हे त्रिवार सत्य युवराजच्या घरावर दगडफेक करणार्‍यांनी व त्याच्यावर टीका करणार्‍यांनी लक्षात घेतले नाही. अखेरच्या 4 षटकांत श्रीलंकेच्या गोलंदाजांचे यॉर्कर अचूक टप्प्यावर पडले. त्यामुळे फक्त युवराजच नव्हे, तर ‘सेट’ झालेल्या कोहलीलाही शेवटच्या षटकांमध्ये मोठे फटके खेळता आले नाहीत. धोनीच्या बॅटलाही अनेक चेंडूंनी चकवले होते. बिचारा युवराज मात्र भारतीय क्रिकेट रसिकांच्या रोषाचा बळी ठरला. कर्करोगावर मात करून पुन्हा मैदानात उतरलेला युवराज जिद्दी आहे. सचिनने युवी 2015चा विश्वचषक खेळेल, अशी भविष्यवाणीही वर्तवली आहे. त्यामुळे एका अपयशावरून युवराजला ‘बाद’ करण्याची चूक कुणी करू नये.