आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमांची ऐशीतैशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांना न जुमानणे, न्यायालयाचे निर्णय थेट झुगारणे, एकमेकांवर राजकीय कुरघोडी करणे आणि हे सर्व समाजाला कळेल असा बीभत्स गोंगाट करणे, अशी सध्या आपली राजकीय संस्कृती झाली आहे. सोमवारी मुंबई व ठाण्यात सर्व नियम धाब्यावर बसून दांडगाईत साजरी करण्यात आलेली दहीहंडी आपल्या समाजाचे वेगाने होणारे पतन तर आहेच पण सरकार नामक यंत्रणाही अशा हुल्लडबाजीसमोर कसे नमते घेते याचे ज्वलंत उदाहरण आहे.
एरवी शेतकरी, शोषित, कष्टकरांच्या आंदोलनांना न्यायालय व कायदा सुव्यवस्थेची भीती दाखवत सरकार त्यांचे आवाज दडपत असताना कानाचे पडदे फाटणारी गाणी मात्र दिवसभर सुखेनैव सुरू होती. न्यायालयाने पाच थरांचा आदेश दिला होता, बालगोविंदांवर निर्बंध घातले होते, तरीही राजकीय कृपाशीर्वादाचा लाभ झालेली दहीहंडी मंडळे कायद्याला धाब्यावर बसवण्यात मश्गूल होती. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड, मनसेचे आमदार राम कदम यांच्या चेह-यावर तर एक सामाजिक कार्य आपल्याकडून उत्तमरीत्या पार पाडले जात असल्याचा आविर्भाव होता. पोलिस खातेही सगळा सांस्कृतिक हैदोस मूकपणे पाहत होते.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी कायदा हातात घेणा-यांवर कारवाई करण्याच्या घोषणा दिल्या होत्या. पण हे मंत्रिमहोदय प्रत्यक्षात वेळ आली तेव्हा आपली राजकीय कोंडी होऊ नये म्हणून मूग गिळून गप्प होते. युती असो वा आघाडी असो, एकाही जबाबदार नेत्याला प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन न्यायालयाचा आदर राखा, सामाजिक शांतता राखा असे आवाहन करावेसे वाटले नाही. मराठी वृत्तवाहिन्यांनी तर हा धुडगूस घराघरांत नेहमीप्रमाणे नेला. न्यायालयाच्या बडग्यावर तावातावाने चर्चा करताना वृत्तवाहिन्यांचा आव समाजाचे आपणच हित करत असल्यासारखा होता पण जेव्हा थरावर थर रचले जाऊ लागले, डीजेंचा दणदणाट वाढू लागला, नटनट्यांची नाचगाणी सुरू झाली, उनाड पोरांची हुल्लडबाजी सुरू झाली तसे या जल्लोषात या वृत्तवाहिन्याही बुडून गेल्या. आता गणेशोत्सव फार दूर नाही. नियमांची ऐशीतैशी याही उत्सवात एक नव्हे तर तब्बल दहा दिवस अनुभवायला मिळणार आहे.