आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Dalit Leaders Politics By Arvind Joshi, Divya Marathi

दलित नेत्यांची सोयीस्कर ‘जवळीक’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारमध्ये रामविलास पासवान यांनी भाजपशी जवळीक साधण्याचे संकेत दिले. महाराष्‍ट्रात रामदास आठवले यांनी भाजपशी महायुती केलेलीच आहे. त्याशिवाय नामवंत दलित नेते उदित राज यांनी तर भाजपत प्रवेश केला आहेच. यानिमित्ताने काही वृत्तवाहिन्यांवर जी चर्चा ऐकायला मिळते ती ऐकल्यानंतर बरेच नवे प्रश्न मनात येतात; पण आपण त्या वृत्तवाहिन्यांच्या चर्चेच्या मध्ये बोलू शकत नाही. त्यामुळे आपल्या मनातले प्रश्न आपल्या मनातच राहतात. या चर्चेत सहभागी होणारे विचारवंत, पत्रकार, स्तंभलेखक आणि राजकीय निरीक्षक ज्या थापा मारतात किंवा वैचारिक अभिनिवेशापोटी लोकांच्या मनात आपल्या प्रतिस्पर्ध्याविषयी विशेषत: भारतीय जनता पक्षाविषयी गैरसमज निर्माण करतात. ते गैरसमज तसेच रूढ होत जातात. त्यामुळे काही वेळा काही गोष्टींचा खुलासा करावासा वाटतो.
रामविलास पासवान यांची भाजपशी मैत्री वाढते आहे. यावर एका वृत्तवाहिनीने चर्चा घडवली. त्यामुळे समाजवादी आणि साम्यवादी मंडळी अस्वस्थ झाल्याचे लक्षात आले.

रामविलास पासवान हे काही भाजपच्या जवळ पहिल्यांदा आलेले नाहीत. 1९९८ ते 2002 या काळात वाजपेयींच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. विशेष म्हणजे दलित नेत्यांच्या जवळिकीने अस्वस्थ झालेल्या समाजवादी मंडळींनी स्वत:च यापूर्वी भाजपशी कधी ना कधी संगनमत केलेले आहे. नितीशकुमार आतापर्यंत भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रिपद उपभोगत होते; पण आज डावे नेते विचारवंत अस्वस्थ होत असल्याचे दाखवत आहेत. कारण दलित आणि मुस्लिम भाजपच्या कदापिही जवळ येऊ शकत नाहीत हा त्यांचा लाडका सिद्धांत आज खोटा पडत आहे. दलित आणि मुस्लिमांनी भाजपच्या जवळ येऊ नये म्हणून आजवर त्यांनी केलेले सारे खरे-खोटे युक्तिवाद आज लुळेपांगळे झाले आहेत.


अशा चर्चा सुरू झाल्या की, चातुर्वर्ण्याचा उल्लेख हमखास होतो; परंतु राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करणारी आहे असे व्यवहारात कधी आढळत नाही. कधीतरी मागे एकदा संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला होता, असे या लोकांचे म्हणणे असते. हे प्रकरण नेमके काय आहे याचा नेमकेपणाने कधीच उलगडा केला जात नाही. मात्र, ते जणू सर्वमान्य असे सत्य आहे असेच गृहीत धरून पुढची चर्चा होते. वास्तविक राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाची मार्क्सवाद्यांसारखी कसलीही विचाराची संहिता नाही. गोळवलकर गुरुजींचे मत तसे असेल, पण स्वयंसेवकांना ते मान्य आहेच असे नाही. उलट त्यांच्यानंतर सरसंघचालक झालेल्या बाळासाहेब देवरस यांची मते त्यांच्यापेक्षा फार वेगळी होती. या वादात न पडता राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप हे चातुर्वर्ण्यवादी आहेत याचा व्यवहारामध्ये कुठे तरी अनुभव येतो का? आणि येत असल्यास तो कसा? हा प्रश्न पडतो. मात्र, याचा खुलासा कोणी केलेला नाही.


मुस्लिमांविषयीसुद्धा असेच बोलले जाते. भारतीय जनता पक्ष आणि संघ या संघटना मुस्लिमांच्या विरोधात नाहीत. त्या मुस्लिमांच्या तुष्टीकरणाच्या विरोधात आहेत. आपल्या देशातल्या सामाजिक, राजकीय व्यवहारामध्ये मुस्लिमांचे वेगळेपण हेतुत: जपले जाते याला भाजपचा विरोध आहे. मी काही भाजपचा कार्यकर्ताही नाही, परंतु मी पत्रकार म्हणून जे काही पाहिले आणि ऐकले आहे त्यावरून माझे मत असे झाले आहे.


एका चर्चेमध्ये मला मोठी विचित्र गोष्ट ऐकायला मिळाली होती की, भाजप म्हणजे फॅसिस्ट शक्ती, म्हणजे हिटलर. आता या गोष्टी समाजवादी आणि साम्यवादी यांच्या बाबतीत लागू करायच्या झाल्या तर स्टॅलिनने घडवलेली हत्याकांडे आणि चीनमधील साम्यवाद्यांनी बीजिंगच्या तियानमेन चौकात लोकशाहीची मागणी करणा-या विद्यार्थ्यांवर चालवलेल्या रणगाड्यांचे उदाहरण द्यावे लागेल. समाजवादी आणि साम्यवादी असे असतात, असे म्हणावे लागेल. अर्थात तसे म्हणणे चुकीचे आहे; पण संघावरही तसा आरोप करणे आणि मुस्लिमांना तशी भीती दाखवणेही चुकीचे आहे.


संघ आणि भाजपला धर्मांध आणि विभाजनवादी असे संबोधले जाते. बाकीचे सारे म्हणजे सेक्युलर. हे स्वत:ला सेक्युलर म्हणवणारे काँग्रेसवाले केरळात मुस्लिम लीगशी युती करतात. ती कशी चालते? काँग्रेसच्या हाती सर्वंकष सत्ता असताना त्यांनी समान नागरी कायदा केला नाही आणि हिंदू -मुस्लिम यांच्यात कायमचीच दरी निर्माण केली आहे.


मागे समाजवादी मंडळी रा. स्व. संघाच्या कार्यशैलीला हरकत घेताना, संघात एकचालकानुवर्ती कारभार असतो, असे म्हणत असत. संघात लोकशाही नाही. एक कोणी तरी आदेश देतो आणि बाकीचे सारे त्याचे पालन करतात, असे त्यांचे म्हणणे. आता आपल्या देशात लालूप्रसाद यादव, नितीशकुमार, मुलायमसिंह यादव हे सारे समाजवादी नेते आपले आपले पक्ष चालवतात त्या पक्षांत लोकशाही आहे का ? त्यांचा कारभार तर एकचालकानुवर्तीच असतो. त्याचे काय?