आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Damodar Savarkar, Divya Marathi, Nehru Family

स्वातंत्र्यवीरांची स्थानबद्धता संपली!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वातंत्र्यलढ्यातील अन्य नेत्यांच्या कामगिरीचे दर्शन शासकीय कार्यक्रमांतून घडवण्यावर काँग्रेसचे सरकार असताना अघोषित बंदीच होती. महात्मा गांधी व नेहरू घराण्यांपलीकडे भारतीय स्वातंत्र्यासाठी कोणीही खस्ता खाल्ल्या नाहीत, असा प्रचार जाणीवपूर्वक सहा दशके सुरू होता. स्वातंत्र्यलढ्यातील काही प्रवाहांची विचारधारा काँग्रेसशी जुळणारी नसली तरी स्वातंत्र्यलढ्यावरील त्यांची निष्ठा बावनकशी होती. तथापि, गांधी-नेहरू ब्रँडची मोहिनी जपण्यासाठी अन्य सर्वांवर बहिष्कार पडला.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यातील ठळक नाव. गांधी हत्येत सामील असल्याचा त्यांच्यावरील ठपका न्यायालयाने दूर केल्यानंतरही त्यांच्याविरुद्धचा विखारी प्रचार संपला नाही. सावरकरांच्या काही विचारांबद्दल मतभेद असू शकतात, पण भारतीय स्वातंत्र्याबद्दलच्या त्यांच्या निष्ठेवर शंका उपस्थित करण्यापर्यंत मणिशंकर अय्यरसारख्या दीडदमडीच्या काँग्रेसी पुढा-याची मजल गेली. गांधी घराण्यातील एकाही नेत्याने त्याबद्दल अय्यरांचे कान उपटले नाहीत. सावरकर हिंदुत्ववादी असले तरी प्रखर विज्ञानवादीही होते. कृतिशील विचारवंत होते. जातिभेद नष्ट करण्यासाठी त्यांनी सहभोजनाचे कार्यक्रम राबवले अन् तेही महात्मा गांधींनी ही चळवळ हाती घेण्यापूर्वी. भाषाशुद्धीसारखे उपक्रम राबवले. हिंदूच्या मानसिक बेड्या तोडण्यासाठी लेखणी झिजवली. बलिष्ठ व अद्ययावत भारत हा त्यांचा ध्यास होता.
विज्ञाननिष्ठ व्यवहारी तत्त्वज्ञान सांगणारे सावरकर देशासमोर आले नाहीत. एका अर्थाने ते स्वातंत्र्यानंतरही स्थानबद्धच राहिले. सावरकरांवरील हा अन्याय मोदी सरकारने दूर केला आहे. स्वातंत्र्यचळवळीचा आढावा घेणारा ‘रोड टु फ्रीडम’ हा माहितीपट स्वातंत्र्यदिनी दूरदर्शनवरून प्रसारित करण्यात आला. स्वातंत्र्यवीरांची देदीप्यमान कामगिरी त्रोटक स्वरूपात का असेना, या माहितीपटात ठळकपणे मांडली गेली. सावरकरांच्या क्रांतिकार्याला अखेर सरकार दरबारी स्थान मिळाले. अर्थात, सावरकरांचे गोडवे गाणारी संघ परिवारातील मंडळी ही त्यांच्या व्यवहारी, विशेषत: प्रखर विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनावर खुश नव्हती. स्वयंभू व्यक्तिमत्त्वाचे सावरकर कोणालाच झेपणारे नव्हते. मात्र सावरकरांबद्दल संघ परिवाराला आस्था होती त्यामुळे मोदी सरकारने त्यांचा गौरव केला. मात्र त्यांचा दृष्टिकोन आचरणात आणणे हे गोरक्षणाचे स्तोम माजवणा-या परिवाराला झेपणारे नाही.