आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडूतही काँग्रेसमध्ये बंड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अखिल भारतीय स्तरावरचा काँग्रेस पक्ष तामिळनाडूत गेली ४८ वर्षे सत्तेपासून दूर आहे. १९५४ ते ६३ या काळात कामराज यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सत्ता होती. पण नंतर तामिळनाडूचे राजकारण अण्णादुराई, एम. जी रामचंद्रन, एन.टी. रामाराव, करुणानिधी, जयललिता या बिगर काँग्रेसवादी नेत्यांच्या अवतीभोवती फिरत गेले. महत्त्वाचे म्हणजे या सर्व नेत्यांचे राजकारण व्यक्तिकेंद्री होते व त्यात अस्मितेला चुचकारण्याचा भाग होता. १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या देशव्यापी मुळांना धक्का लागण्यास सुरुवात झाली. त्यात काँग्रेसच्या हातातून नऊ राज्ये गेली. त्यामध्ये तामिळनाडू हे राज्य होते. त्या वेळी सी. राजगोपालाचारी हे या राज्यातील एकमेव बडे राजकीय नेतृत्व होते, पण त्यांनीही पक्षाशी हरकत घेत स्वतःची स्वतंत्र पार्टी स्थापन केली होती.

ही पार्टीही नंतर लयास गेली. पण या राज्यात काँग्रेसही पुढे कशीबशी तग धरून होती. असे असूनही या एवढ्या प्रदीर्घ काळात काँग्रेस पक्षाचा एकही नेता तामिळी जनतेवर मोहिनी घालेल असा जन्मास आला नाही. १९९६ मध्ये काँग्रेसचे एक बडे नेते जी. के. मुपनार यांनी पक्षाशी हरकत घेत स्वतःची तामिळ मनिला काँग्रेस स्थापन केली. या काँग्रेसमध्ये त्या वेळी पी. चिदंबरम यांच्यासारखे नेते गेले होते. २००४ मध्ये काँग्रेसप्रणीत यूपीए सरकार सत्तेत आल्यानंतर तामिळ मनिला काँग्रेस या मूळ पक्षात विलीन झाली व चिदंबरमही स्वगृही परत आले. आता थोडीशी शिल्लक असलेल्या काँग्रेसमध्येही फूट पडली असून जी. के. मुपनार यांचे पुत्र जी. के. वासन यांनी स्वतःचा वेगळा पक्ष काढण्याची घोषणा केली आहे. वासन यांनी आपल्या बंडखोरीला काँग्रेसचे नेतृत्व जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तामिळनाडूमध्ये काँग्रेस वाढावी असा कोणताही प्रयत्न दिल्लीतून केला गेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तामिळनाडूमधील ५९ जिल्ह्यांपैकी ३० जिल्ह्यांचे अध्यक्ष आपल्या मागे असल्याचा वासन यांचा दावा आहे व ही फूट उभी असल्याचे वासन यांचे म्हणणे आहे. वासन यांचा दावा किती खरा आहे ते काही दिवसांत लक्षात येईल, पण काँग्रेसच्या देशव्यापी आधाराला लागलेली घरघर पक्षाच्या दृष्टीने चिंताजनक आहे.