आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेजबाबदार ट्रम्प (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाती अमर्याद सत्ता एकवटलेली असल्याने अमेरिकेचा अध्यक्ष हा सर्वशक्तिमान समजला जातो. पण हाती अमर्याद सत्ता असली तरी अध्यक्षाच्या अधिकार क्षेत्रावर अंतर्गत सुरक्षा पाहणारी एफबीआय यंत्रणा, गुप्तहेर संघटना सीआयए, संसद व मीडिया यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दबाव असतो. तरीही अध्यक्ष एखाद्या यंत्रणेला बेदखल करणारे, त्या यंत्रणेला अंधारात ठेवणारे, अमेरिकेच्या हिताला बाधा येऊ शकणारे आततायी निर्णय घेऊ शकतो. अमेरिकेच्या इतिहासात या यंत्रणा एकमेकांविरोधात काम करतानाही दिसून आल्या आहेत. जॉन एफ. केनेडी यांची हत्या अमेरिकेचे हितसंबंध धोक्यात येत असल्याचे पाहून सीआयएने घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला गेला होता आणि या संशयाला पुष्टी देणारे साहित्य, चित्रपट अमेरिकेत प्रसिद्ध झालेले आहे.

रिचर्ड निक्सन यांना भोवलेले वॉटरगेट प्रकरण वॉशिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्राने उघडकीस आणले होते. आता डोनाल्ड ट्रम्प अमेरिकी व्यवस्थांच्या दबावाखाली येताना दिसत आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाचे वादळी १०० दिवस सरले असून त्यांच्या वर्तनामुळे व त्यांची राजकीय समज एकूणच कमी असल्याने कदाचित येत्या काही महिन्यांत ते महाभियोगाला सामोरे जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकाने एक बातमी प्रसिद्ध केली होती, या बातमीत ट्रम्प यांनी रशियाच्या संरक्षणमंत्र्यांना इसिसच्या संदर्भात अत्यंत गोपनीय माहिती पुरवल्याचा खुलासा केला होता. या बातमीवरून व्हाइट हाऊस प्रशासन अडचणीत आले. ट्रम्प यांच्या प्रसिद्धिप्रमुखांना बातमीचा प्रतिवाद करताना नाकीनऊ आले. त्या पुढच्या घटना इतक्या वेगाने घडल्या की अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेने ट्रम्प यांचे रशियाशी असलेले व्यावसायिक संबंध, निवडणुकांदरम्यान त्यांनी रशियाची घेतलेली कथित मदत यांची चौकशी करण्यासाठी एफबीआयचे माजी अध्यक्ष रॉबर्ट म्युलर यांची नेमणूक केली. काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी एफबीआयचे प्रमुख जेम्स कोमे यांना कोणतीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी पदावरून बरखास्त केले होते.

ट्रम्प यांनी अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारात रशियाची मदत घेतली असून सोशल मीडियात रशियाच्या कंपन्यांकडून खोट्या माहितीचा प्रचार केला होता, अशा आरोपांची चौकशी कोमे करत होते. त्याशिवाय रिपब्लिकन नेत्या हिलरी क्लिंटन यांनी आपल्या व्यक्तिगत ईमेल अकाउंटवरून परराष्ट्रमंत्री असताना केलेल्या कथित पत्रव्यवहाराची ते चौकशी करत होते. हिलरी यांनी अशा पत्रव्यवहारातून देशाशी गद्दारी केल्याने आपण अध्यक्ष झाल्यास हिलरी यांची रवानगी तुरुंगात करू, असे आश्वासन ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात अमेरिकी जनतेला दिले होते. प्रत्यक्षात जे या प्रकरणाची चौकशी करत होते, त्यांचीच पदावरून हकालपट्टी केल्याने ट्रम्प यांच्या एकूणच निर्णयाबद्दल संशयास जागा निर्माण झाली आहे. त्यात वॉशिंग्टन पोस्टच्या बातमीमुळे अमेरिकेचे गुप्तहेर खाते अमेरिकेची मित्रराष्ट्रे व अन्य आंतरराष्ट्रीय गुप्तहेर संघटना यांच्यामध्ये अविश्वासाचे संबंध निर्माण झाले.

त्याचे गंभीर पडसाद अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर होऊ शकतात. आजच्या घडीला अमेरिकेचा पश्चिम आशियातील हस्तक्षेप हा इसिसच्या मुद्द्यावरून आहे. इसिसच्या विरोधात व बाजूने असे अनेक देश काम करत असल्याने गोपनीय माहितीच्या पळवाटा अनेक आहेत. जर इसिससारख्या कुख्यात संघटनेबद्दलची माहिती रशियापर्यंत अमेरिकेच्या अध्यक्षाकडून सहजपणे जात असेल तर ते अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय हितसंबंधांना हानीकारक तर आहेच, पण अमेरिकेला त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या ज्या गुप्तहेर संघटना विविध माध्यमांतून माहिती पुरवत असतात त्यांनी ट्रम्प यांच्या अशा वर्तनाचा धसका घेतला आहे. भविष्यात ही माहिती ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचवायची की नाही, अशा संभ्रमावस्थेत या गुप्तहेर संघटना आल्या आहेत.
 
ट्रम्प यांचे बेजबाबदार वर्तन व व्यवस्थांविरोधात घेतलेला पवित्रा यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा तोल बिघडू शकतो व त्याचा फायदा इसिसच नव्हे, तर रशिया, चीन, पाकिस्तान या देशांकडून घेतला जाऊ शकतो. आजच्या घडीला दहशतवाद ही आंतरराष्ट्रीय समस्या आहे, असे सर्व देशांकडून विविध शिखर संमेलनांतून सांगितले जात असले तरी दहशतवाद पसरवणे व त्याला बळ देणे हा विरोधकांवर राजकीय कुरघोडी करण्याचा एक भाग असतो. जे शांततेची भाषा करत असतात तेच छुप्या पद्धतीने दहशतवादी संघटनांना पोसत असतात. अमेरिकेच्या अध्यक्षाला स्वत:च्या मर्जीने वागता येत नाही, तर त्याला अमेरिकेचे हितसंबंध पाहून अमेरिकेच्या व्यवस्थांनी आखून दिलेल्या मर्यादेत काम करावे लागते. ट्रम्प हे व्यावसायिक आहेत. त्यांना राजकारणाचे धडे अवगत करण्यासाठी स्वत:ला वेळ द्यावा लागेल. नाही तर महाभियोगाची कुऱ्हाड पडण्यास वेळ लागणार नाही.
बातम्या आणखी आहेत...