आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिथरलेल्या जनमतामुळे ट्रम्प यांची सरशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा पराभव करून रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकी राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत विजयी झाले. आक्रस्ताळ्या ट्रम्प यांच्या मनात भारत, चीनविषयी प्रेम नाही. याचे भान ठेवूनच यापुढे भारताने अमेरिकेशी संवाद साधला पाहिजे.

“A vote for Trump is not a vote for Trump. It is the biggest middlefinger vote you can give in your life.” हे उद््गार आहेत प्रसिद्ध चित्रपट निर्माते मायकल मूर यांचे! हे मत शंभर टक्के सत्य आहे. सर्व प्रस्थापित संस्था ट्रम्प यांच्या मागे हात धुवून लागल्या असताना ते विजयी झाले, हा आधुनिक इतिहासातला एक मोठा चमत्कार मानावा लागेल.

जनता बिथरली की ती काय करू शकते याचा हा उत्तम नमुना आहे. ब्रिटनमध्ये ब्रेक्झिट झाले आणि अमेरिकेत ट्रम्पविजय. बहुद्देशीय उद्योगधंदे, वॉल स्ट्रीट, आपल्या ज्ञानाचे द्वारपाल असलेल्या गुगल, फेसबुकसारखा सोशल मीडिया, चाचणी पोल घेणाऱ्या संस्था आणि मिलिटरीसुद्धा हिलरी क्लिंटन यंत्रणेच्या खिशात होती. सर्व प्रसारमाध्यमे जणू काही क्लिंटन यांची भाट बनल्यासारखी वागत होती.

सर्वात कहर म्हणजे क्लिंटन आणि ट्रम्प यांच्या टीव्हीवरील डिबेटमध्ये क्लिंटन यांना आधीच प्रश्न पुरवले गेल्याचे प्रकाशात आले आहे. एवढेच काय, पण ट्रम्प यांना अडचणीत आणणारे कोणते प्रश्न विचारायचे, हे क्लिंटन समर्थकांकडून मागवून घेतले गेले. हे सर्व उघडकीस आणणाऱ्या विकिलीक्स या कागदपत्रे चोरून प्रसिद्ध करणाऱ्या संस्थेचे सर्वेसर्वा ज्युलियन असांज यांचे क्लिंटन यांचा पराभव करण्यात मोठे योगदान आहे. हा माणूस सध्या जिवाच्या भीतीने इक्वेडोर या देशाच्या लंडनमधील राजदूतावासात लपून बसला आहे.
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक समजण्यासाठी तेथील राजकीय प्रणाली आणि निवडणूक प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे. इथे महत्त्वाचे असे दोनच पक्ष आहेत. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक. मध्यमवर्ग विशेषत: गोरा—हा मुख्यत: हा रिपब्लिकन पक्षात आहे. आता मध्यमवर्ग म्हटला म्हणजे त्यात चांगल्या-वाईट गोष्टी आल्या. देश आणि धर्म याबद्दल अभिमान वा दुराभिमान, राखीव जागांना विरोध, अमेरिकेने जगभर अरेरावी करावी या आक्रमक मतांचा समावेश होतो. त्यांना आपल्या बाजूने अधिक बोलते करायची रणनीती डोनाल्ड ट्रम्प यांनी आखली व यशस्वीही केली.

अल्पसंख्याक वर्ग डेमोक्रॅटिक पक्षाचा समर्थक आहेत. कॉलेज कॅम्पसच्या आसपासचा युद्धविरोधी तरुण वर्ग त्या पक्षात आहे. कामगार संघटना जोरात होत्या तेव्हा त्यांचा डेमोक्रॅटिक पक्षाला आधार होता. बिल क्लिंटनच्या काळापासून हा पक्ष काही बाबतींत संपूर्ण बदलला आहे. वॉल स्ट्रीटच्या बँका आणि मल्टिकॉर्पोरेशन यांच्या आहारी गेला आहे. साहजिकच तो पक्ष कामगार वर्गापासून दूर गेला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वरताण युद्धखोर झाला आहे. त्यामुळे पुरोगामी वर्गाला हिलरी क्लिंटनचा ितरस्कार वाटतो. २००८ मध्ये पुरोगामींनी तिला पाडण्यासाठी ओबामांचा हिरिरीने प्रचार केला आणि २०१६ मध्ये सँडर्सचा.

२००८ मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे बराक ओबामा यांचा राष्ट्रीय स्तरावरील नेता म्हणून उदय झाला. त्या वेळी डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या हिलरी क्लिंटन यांच्यावर चिडलेल्या पुरोगाम्यांनी ओबामा यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाचा उमेदवार केले. या काळात अमेरिकेचा चेहरामोहरा बदलला होता. गोऱ्या मध्यमवर्गाची संख्या ८२ टक्क्यांवरून घसरत ७० टक्क्यांवर आली होती. ओबामा निवडून आले, पण त्यामुळे गोऱ्या मध्यमवर्गात ‘उपऱ्यांविरुद्ध’ असंतोष खदखदत राहिला. आताच्या निवडणुकीत परके आणि मुख्यत: मेक्सिकन यांना अमेरिकेत आश्रय देणे हा मोठा प्रश्न होता.

ओबामा २००८ मध्ये निवडून येण्यास दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या “आशा आणि परिवर्तन’ या घोषणेला तरुणवर्ग भुलला. त्याच वर्षी वॉल स्ट्रीटवर खेळल्या गेलेल्या आर्थिक खेळींनी अमेरिकेला मोठा धक्का दिला. त्यामुळे आर्थिक मंदी आली. तिथली घाण ओबामा साफ करतील अशी तरुणवर्गाला आशा होती. ओबामा मात्र स्वत: असे कधीही म्हणाले नव्हते. निवडून आल्यावर त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातल्या महत्त्वाच्या जागा वॉल स्ट्रीटच्याच निकटवर्तीयांना दिल्या. त्यानंतर २०१२च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतही ओबामाच निवडून आले होते. २०१६च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत हिलरींचा ओबामांनी हिरिरीने प्रचार केला. ओबामांनी काही दिवसांपूर्वी ‘आशा आणि परिवर्तन’ या गोष्टींसाठी हिलरी क्लिंटन यांना मत देण्याचे आवाहन अमेरिकी जनतेला केले होते. ही लोकांची एकप्रकारे क्रूर चेष्टाच म्हणायची.

असल्या दुटप्पी वर्तनाने अमेरिकन जनता चिडली नसती तरच आश्चर्य होते. आणखीही कारणे आहेत. प्रथम म्हणजे अमेरिकेचा वैभवाचा रथ चिखलात अडकून पडला आहे, अशी भावना सर्वत्र निर्माण झाली आहे. मध्यमवर्गाचा ऱ्हास होत आहे. सामान्य लोकांचे पगार गेली वीस वर्षे एकतर उशिरा मिळतात किंवा काहींचे बुडाले आहेत. तर वरच्या वर्गातल्या लोकांचे उत्पन्न आकाशाला भिडत आहे.

दुसरे कारण म्हणजे मुसलमानी जगतात वर्षानुवर्षे चाललेली युद्धे संपायची चिन्हे दिसत नाहीत. व्हिएतनाममध्ये अमेरिकन जसे हजारांनी मृत्युमुखी पडत होते तसे या युद्धांत होताना िदसत नाही, ही जरी जमेची बाजू असली तरी युद्धांचा खर्च काही हजार अब्ज डॉलर्स झाला आहे आणि अमेरिकेसारख्या महासत्तेला या युद्धांत म्हणावे तसे यश येत नाही.
तिसरे कारण म्हणजे पारंपरिक प्रसारमाध्यमांवरचा अविश्वास. प्रसारमाध्यमे पद्धतशीर खोटे बोलतात, असा अमेरिकेतील जवळजवळ ९० टक्के लोकांचा समज झालेला आहे. त्याशिवाय आता इंटरनेटमुळे बातम्या मिळवण्याचे दुसरे माध्यम लोकांना मिळाले आहे. चौथे कारण म्हणजे लोकांचा राजकारण्यांवरचा विश्वास पार ढळून गेला आहे. अमेरिकन संसदेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या आज दहा टक्क्यांपर्यंत घसरत आली आहे.

पाचवं कारण म्हणजे राजकारण हे पैशांचे नाटक आहे, हे लोकांना कळून चुकले आहे. या निवडणुकांसाठी क्लिंटनने एवढे मोठे पैशाचे जाळे टाकले होते की कोणा नवख्या तरुण माणसाला रिंगणात पाऊल टाकणे अशक्य होते. बर्नी सँडर्स (हाही ७२ वर्षांचा उमेदवार) याने लोकांच्या वर्गणीवर तिला सामना दिला; पण त्यालाही प्रसारमाध्यमे आणि कपटनीतीने खाली बसवला. रिपब्लिकन पक्षात काही तरुण होतकरू उमेदवार होते. पण त्यांचा क्लिंटनसमोर निभाव लागणार नाही असा ‘सिक्स्थ सेन्स’ रिपब्लिकन मतदारांना असला पाहिजे. शिवाय ट्रम्प हा कुणाच्या पैशाला मिंधा राहणारा माणूस नव्हे, हे उघडउघड दिसत होते. ट्रम्प असो वा हिलरी हे वृद्ध उमेदवार होते. ओबामा ४७व्या वर्षी राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले होते; पण रिपब्लिकन व डेमोक्रॅटिक या दोन्ही पक्षांना तरुण उमेदवार मिळू नयेत हेदेखील दुर्दैव म्हणावे लागेल.

भारतीय उपखंड हा अमेरिकेच्या मुख्य रंगमंचावर केव्हाच नव्हता. पाकिस्तानला पुरेपूर वापरून घेतल्यानंतर अमेरिका त्याला हळूहळू झिडकारायच्या मागे आहे. ती प्रक्रिया चालू राहीलच. (आपले नशीब, पं. जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत भारताला अमेरिकेच्या दावणीला बांधले नाही.) ट्रम्प यांना रशियाच्या मदतीने दहशतवाद्यांचा निःपात करायचा आहे. मात्र, काश्मीर शंभर टक्के भारताचा आहे असे ना ट्रम्प म्हणतात, ना पुतीन. (पुतीन म्हणजे सोव्हिएत रशिया नाही.) एकाचा दहशतवादी हा दुसऱ्यासाठी स्वातंत्र्यसैनिक असतो. तेव्हा काश्मीर प्रश्नावर अमेरिका भारताची पाठराखण मनापासून करेल, असा भरवसा देता येत नाही. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले ही घटना भारतासाठी लाभदायक आहे, या भ्रमात कोणीही राहू नये.
- डॉ. मोहन द्रविड
आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक
mohan.drawid@gmail.com
बातम्या आणखी आहेत...