आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूरदर्शनचे ‘दूर’ दर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या 20 वर्षांत मनोरंजन, जीवनशैली, साहस, वन्यजीव, ज्ञान, क्रीडा, बातम्या अशा मानवी जीवनाशी निगडित विषयांचा वेध घेऊन खासगी उपग्रह वाहिन्यांनी चांगलीच प्रगती साधली आहे. या वाहिन्यांनी विविध विषयांच्या निवडीत दूरदर्शनसारख्या सरकारी माध्यमाला केव्हाच मागे टाकले आहे. तरीही दूरदर्शनवरील कार्यक्रमांचा दर्जेदारपणा, संयतपणा, साधेपणा, सामाजिक वास्तवाशी जवळीक साधण्याची त्यांची शैली, देशातल्या विविध संस्कृतींना दिले जाणारे प्राधान्य यामुळे ग्रामीण भागातील नव्हे, तर शहरी भागातील प्रेक्षक दूरदर्शनपासून फार लांब गेलेला नाही. 15 सप्टेंबर 1959 रोजी दूरदर्शन सुरू झाले असले, तरी 70 च्या दशकाअखेर टीव्ही घराघरांत पोहोचला नव्हता, पण इन्सॅट उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे व 1982मध्ये एशियाड स्पर्धेच्या निमित्ताने देशात विविध ठिकाणी दूरदर्शन केंद्रे स्थापन करण्यात येऊन हे जाळे विस्तारित करण्यात आले. त्यामुळे 80-90च्या दशकात दूरदर्शनवरील प्रेक्षकांची संख्या वाढली. ही संख्या वाढण्यामागे कार्यक्रमांचा दर्जा उच्च होता, शिवाय त्यामध्ये उदारीकरणामुळे बदलत जाणार्‍या भारतीय जीवनाला स्पर्श करण्याची जादू होती. आता उदारीकरणाची 20 वर्षे पुरी झाली आहेत व दूरदर्शनही 55 वर्षांचा झाला आहे.

या काळात जगभरात उपग्रह वाहिन्यांमध्ये कमालीची स्पर्धा निर्माण झाली असल्याने नवा प्रेक्षक मिळवण्यासाठी जगातील अनेक लोकप्रिय उपग्रह वाहिन्या अन्य देशांमध्ये शिरकाव करत आहेत. भारतातील मनोरंजन वगळता अन्य उपग्रह वाहिन्या परदेशात दिसत नाही. या पार्श्वभूमीवर युरोप, मध्य आशिया, अरब जगत व उत्तर आफ्रिकेतील प्रेक्षकांना व तेथे राहणार्‍या भारतीयांना भारतीय कार्यक्रम पाहता येतील, या हेतूने दूरदर्शनने एका जर्मन कंपनीशी करार केला आहे. या करारानुसार या विशाल भौगोलिक प्रदेशातल्या सुमारे 12 कोटी घरांमध्ये आता दूरदर्शनचे कार्यक्रम प्रसारित केले जाणार आहेत. याचा अर्थ भारत जगाविषयी काय बोलतोय, भारताच्या आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय जीवनात काय घडामोडी घडताहेत, जगभरात पसरलेल्या भारतीय माणसाचे जीवन नेमके कसे आहे याचे चित्रण दूरदर्शनच्या माध्यमातून या देशांमधील प्रेक्षकांना कळणार आहे. प्रसारभारतीच्या स्वायत्ततेवरून नेहमीच वाद होत असताना नव्या जगाशी जोडून घेण्याचा दूरदर्शनचा प्रयत्न खरोखरीच अभिनंदनीय आहे.