आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांतिकारी विचारांचा साहित्यिक योद्धा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी नवकथा, कादंबरी, समीक्षा, निबंध, आठवणी, मुलाखती, आत्मकथा, भाषांतर, संपादन अशा विविधांगी लेखनातून आपली वेगळी ओळख देणारे राजेंद्र यादव. हिंदी नवकथेचे जनक. ‘हंस’ मासिकाचे संपादक, वादग्रस्त समीक्षक व निबंधकार. स्त्री विमर्श आणि दलित विमर्शाचे खंदे पुरस्कर्ते. अधू दृष्टी पण कुशाग्र बुद्धीचे वरदान लाभलेले राजेंद्र यादव यांचे परंपरेशी वैर होते, खरं!

हिंदी साहित्यात यादवांचे पदार्पण झाले, ते ‘प्रतिहिंसा’ कथेने. ती ‘कर्मयोगी’मध्ये प्रकाशित झाली होती. पण राजेंद्र यादव यांना हिंदी वाचक ओळखू लागला तो दोन कारणांनी. एक त्यांनी मोहन राकेश व कमलेश्वर या दोन कथाकार मित्रांच्या खांद्याला खांदा लावून चालवलेल्या ‘नई कहानी’ आंदोलनामुळे आणि नंतर ‘सारा आकाश’ या कादंबरीच्या लक्षावधी प्रतींच्या तडाखेबंद विक्रीमुळे. बासू चटर्जी यांनी समांतर फिल्म चळवळीच्या काळात या कादंबरीवर याच नावाने चित्रपट काढला नि ही कादंबरी जगातल्या अनेक भाषात भाषांतरित झाली. राजेंद्र यादव हिंदी कथा साहित्याचे प्रवक्ते बनले ते ‘हंस’ मासिकाच्या यशस्वी संपादनामुळे. ‘दलित विमर्श’ आणि ‘स्त्री विमर्श’ या दोन विचार प्रवाहांना हिंदीत स्थिर करण्याचं श्रेय जाते, ते राजेंद्र यादव यांच्या भविष्यलक्ष्यी कथा प्रकाशनांमुळे.

प्रेमचंद, जैनेंद्र, यशपाल यांच्या काळातली हिंदी कथा विकसित होत असली, तरी ती शिल्पाच्या बंदिस्त चौकटीत अडकून राहिली होती. हिंदी नवकाव्यामुळे हिंदी कविता छंदातून मुक्त झाली, तशी हिंदी कथा शिल्प, शैलीच्या पारंपरिक चौकटीतून मुक्त करणे काळाची गरज होती. हे काम मोहन राकेश, कमलेश्वर, राजेंद्र यादव या त्रिकुटाने केले. त्यांचे हे प्रयत्न ‘नई कहानी’ आंदोलन नावाने हिंदी साहित्य इतिहासात नोंदले गेले. ‘नई कहानी’नं कथेत अबोध मनास महत्त्व दिलं. त्यामुळे हिंदी कथा अंतर्मनाचं द्वंद्व चित्रित करू लागली. तिने नव्या नागरी जीवनाचे प्रश्न मांडले. वैयक्तिकतेस प्राधान्य दिले. कथा बौद्धिक आवाहन करू लागली. या कथेने जात, धर्म, राष्ट्र अशा भिंती पाडल्या. ती वैश्विक व आधुनिक बनली. हे सारे राजेंद्र यादवांसारख्या बिनीच्या कथाकारामुळे शक्य झाले.
पुढे राजेंद्र यादव यांनी प्रेमचंदांनी स्थापन केलेल्या व 1930 ते 1953 पर्यंत चालून बंद पडलेल्या ‘हंस’ मासिकाचं पुन:प्रकाशन 1986 ला सुरू केलं. प्रेमचंदांनी ‘हंस’ स्थापन केलं, तेव्हा त्याच्या संपादक मंडळात म. गांधी, कन्हैयालाल मुन्शीसारखे दिग्गज होते. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले, तर या मासिकाच्या मराठी विभागाचे संपादक, सल्लागार वि. स. खांडेकर होते. या मासिकानं हिंदी कथा प्रागतिक केली. यादवांनी ‘हंस’च्या माध्यमातून दलित कथा विशेषत्वाने प्रकाशित करून नवा कथाप्रवाह विकसित केला. तीच गोष्ट स्त्रीवादी कथेची. अनेक महिला कथाकारांना ‘हंस’नी प्रकाशात आणलं. ‘स्त्री मुक्ती ही तिच्या देहमुक्तीनेच शक्य आहे’, या यादवांच्या क्रांतिकारी विचारामुळे ते प्रस्थापितांच्या टीकेचे लक्ष्य बनले, पण यादव यांनी त्याची पर्वा केली नाही. ते आतून बाहेरून नवे विचार, संस्कृतीचे खुले समर्थक होते. अलीकडे त्यांच्या उदारवादी व्यवहार, विचारांमुळेही ते पुरोगाम्यांच्या रडारवर होते. एकेकाळी प्रस्थापित, उजव्यांविरोधी विशेषत: हिंदुत्ववादी भगव्या ब्रिगेडवर हल्ला करणारे यादव गेले काही दिवस आपल्या कार्यक्रमांना डाव्यांबरोबर उजव्यांनाही आमंत्रित करीत. ते म्हणत की, खरी लोकशाही विचारांच्या बंदिस्त विभाजनाने कधीच विकसित होणार नाही.
हिंदी साहित्यात ‘देवताओं की मूर्तियाँ’(1951) ते ‘है यह जो आतिश गालिब’(2008) पर्यंतच्या यादव यांच्या 15 कथासंग्रहातून शहरी मध्यमवर्गाच्या संवेदना चित्रित झाल्या, पण महत्त्व व्यक्ती चिकित्सेस. ‘अभिमन्यू की आत्मकथा’सारखी कथा वाचली की, परंपरा-नवता, कल्पना, वास्तव शिल्प-शैली यांचं द्वंद्व नि समन्वयन यादव यांनी बेमालूमपणे रेखाटल्याचे दिसते. यादवांनी असेच प्रयोग आपल्या कादंबरी लेखनातून केले. ‘प्रेत बोलते हैं’(1951)च्या लेखनाने सुरू झालेला कादंबरी प्रवास ‘एक था शैलेंद्र’(2007) पर्यंत चालू होता. पैकी ‘सारा आकाश’ बहुचर्चित राहिली. पण ‘कुलटा’ (1958), ‘अनदेखे अनजान पूल’ (1963), ‘मंत्र-विद्ध’(1967) या कादंब-याही वाचनीय ठरल्या. विशेषत: तरुण व नववाचकांची त्यांना विशेष प्रसिद्धी, समर्थन लाभलं ते त्यातील खुल्या यौन चित्रणाने व दृष्टीने. कथाकार मन्नू भंडारी या हिंदीतील प्रसिद्ध सोज्वळ महिला कथाकार त्यांच्या पत्नी. त्यांच्या बरोबरीने यादवांनी ‘एक इंच मुस्कान’ कादंबरी लिहून संयुक्त लेखनाचा आगळा प्रयोग केला.
यादव कविताही लिहीत हे फार कमी लोक जाणतात. ‘आवाज तेरी है’(1960) काव्यसंग्रहात त्या वाचावयास मिळतात. यादवांनी विपुल कथालेखन तसं कथा समीक्षाही केली. त्यांनी अनेक ग्रंथांचं संपादन केलं. ‘वह सुबह कभी तो आयेगी’ (2008) हे अलीकडचं त्यांचं वैचारिक लेखांचं संपादन. त्यांनी काम्यू, स्टाइनबेक, लर्मन्तोव आदींच्या विश्वविख्यात कादंब-यांची हिंदी भाषांतरे केली. इव्हान तुर्गनेव्ह हा रशियन कादंबरीकार त्यांचा आवडता. त्यांच्या ‘टक्कर’, ‘प्रथम प्रेम’, ‘वसंत प्लावन’ ही कादंबरी भाषांतरे त्यांच्या प्रेमाबद्दलच्या आस्थेची प्रतीके होत.
यादव यांचा साहित्य कृतींमागील विचारधारा शोधण्याचा व्यासंग उपजत होता. साहित्यातील ‘वाद-विचार’ हे यादवांचं अभ्यास क्षेत्र होतं. वास्तववाद, प्रगतिवाद, प्रयोगवाद, अस्तित्ववाद, आधुनिक वाद इतकेच काय, उत्तर आधुनिकतावादावरही त्यांची मतं परखड होती. ‘दुनिया में कोई विचार अंतिम नहीं होता’ हे तर यादव पूर्वीपासूनच सांगत आलेत. जागतिकीकरणात बाजार व तंत्रज्ञान माणसास खिंडीत गाठत आहे, याबद्दल ते सचिंत होते. ‘मेरी तेरी उसकी बात’ या ‘हंस’च्या अलीकडच्या संपादकीयातून ही काळजी त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली असली तरी घड्याळाचे काटे उलटे फिरवू पाहणा-या ‘नमोनम:’ प्रवृत्तीचे ते कट्टर विरोधकच होते. विचार व विकास रोखणा-या कोणत्याही मूलतत्त्ववादी विचारसरणीचा नि:पात हे त्याचं अघोषित धोरण होतं.
दिल्लीत गेल्यानंतर राजेंद्र यादव यांना त्यांच्या 2/36, अन्सारी मार्ग या ‘हंस’, ‘अक्षर’च्या कार्यालयात भेटण्याचा गेल्या अनेक वर्षांचा माझा प्रघात. ते नित्य नवलेखकांच्या गराड्यात असत. भेटण्या, बोलण्यात कोणतीच औपचारिकता नसायची. चर्चेत आपपर भेद नसायचा. वादात वार ठरलेले. दोन द्यायची, तसेच दोन घेण्याची, पण तयारी असायची. अलीकडे कटकटी कमी करायच्या नादात ते होते. दैनिक भास्करच्या नोएडा प्रेसमधून हल्ली ‘हंस’ निघायचं. कथाकार संजीवच बरचसं पाहायचे. त्यांच्याबरोबरीचा टपरीवरचा चहा पीत हिंदी साहित्यातलं नवं वर्तमान समजायचं. आता संजीव यांनी ‘हंस’ सोडलं नि राजेंद्र यादवांनी जगच. आता परत गेलो की अन्सारी मार्ग ओकाबोकाच भासणार.