आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइनवरची उन्मादी खरेदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही वर्षांपूर्वी बिग बझार या देशातील अग्रणी डिपार्टमेंटल स्टोअरने "सबसे सस्ते दिन' या घोषवाक्याद्वारे ग्राहकांना स्वस्त दरात वस्तू देण्याची घोषणा केली होती. या एकाच घोषणेने देशभरात बिग बझारच्या दुकानांबाहेर ग्राहकांच्या लांबलचक रांगा लागून चेंगराचेंगरी झाली होती. भारतासारख्या देशात कोणत्याही गोष्टीवरून उन्माद सहज पसरू शकतो, तसाच उन्माद त्या वेळी पसरला होता.

बाजारभावापेक्षा कितीतरी स्वस्त दरात वस्तू मिळत असल्याने अशी संधी भविष्यात कधीच मिळणार नाही, असा अप्रत्यक्ष फसवा संदेश पसरल्याने ग्राहक भुलले होते. मंगळवारी इंटरनेटवर असाच देशव्यापी उन्माद दिसला. फ्लिपकार्ट या देशातील बलाढ्य ई-कॉमर्स कंपनीने "बिग बिलियन डे' या घोषवाक्याद्वारे प्रत्येक वस्तूवर २० टक्क्यांपासून ९० टक्क्यांपर्यंत सूट देत असल्याची घोषणा केल्याने अक्षरश: लाखो नेटिझन फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर एकाचवेळी तुटून पडले. हे आक्रमण इतके जोरदार होते की, फ्लिपकार्टची वेबसाइट बंद पडली. लाखो ग्राहकांना वस्तूची किंमत चुकती करूनही त्यांच्या ऑर्डरवर शिक्कामोर्तब होत नव्हते. त्यामुळे नाराज झालेल्या ग्राहकांनी फेसबुक, ट्विटर, ब्लॉगिंग अशा सोशल मीडियातील माध्यमातून फ्लिपकार्टवर दुषणे झाडायला सुरुवात केली. ज्या वस्तू फ्लिपकार्टने जाहीर केल्या होत्या त्या वस्तू वेबसाइटवर नसल्याची तक्रार ग्राहक करत होते, तर काही ग्राहक वस्तूंवर दिली जाणारी सूट बनवाबनवी करणारी आहे, असा दावा करत होते. अर्थात, फ्लिपकार्टने दहा तासांत एक अब्ज रुपयांची विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते ते साध्य झाले, असा दावा केला आहेच; पण फ्लिपकार्टच्या या आक्रमक मार्केटिंगला उत्तर म्हणून स्नॅपडिल, अमेझॉन या ई-कॉमर्स कंपन्यांनाही या स्पर्धेत उडी घ्यावी लागली. स्नॅपडिलने एका मिनिटात सुमारे एक लाख वस्तूंची विक्री करून एक कोटी रुपयांचे उद्दिष्ट साध्य केल्याचे सांगितले आहे. या कंपन्यांनी कितीही दावे केले, तरी ग्राहकांमध्ये अशा घोषणांमुळे मोठ्या प्रमाणात पसरलेली नाराजीही नजरेआड करता येणार नाही. आता दिवाळी तोंडावर आल्यामुळे अशा घोषणांचा सुकाळ माजतच जाणार आहे; पण त्यामुळे वाढणारा उन्माद चिंताजनक आहे.