आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘फॅशन वीक’ चा वेगळा फंडा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

22 मार्चपासून मुंबईत ‘लॅक्मे फॅशन वीक’ला सुरुवात झाली. अन्न, वस्त्र, निवारा या तिन्ही प्राथमिक गरजा. त्यापैकी एक असलेल्या वस्त्रोद्योगाला भारतात प्राचीन काळापासून महत्त्व आहे. प्राचीन काळातील चित्रांमधून आपण भारतीय वस्त्रोद्योगात त्या काळी असलेली प्रगती पाहतो. आपल्या या इतिहासापासून प्रेरित होऊन अनेक फॅशन डिझायनर्स आपल्या कलेक्शनने जगाला मोहवून टाकत आहेत. भारतात आता फॅशन वीक्स आणि फॅशन शोचे पेवच फुटले आहे. वर्षात 52 आठवडेच असतात; परंतु सध्या भारतात त्या आठवड्यांच्या संख्येपेक्षाही ‘फॅशन वीक’ अधिक आयोजित केले जातात. मात्र, या सर्वांमध्ये आपला आगळा लौकिक निर्माण केला आहे लॅक्मे फॅशन वीकने. या वीकच्या निमित्ताने अनेक डिझायनर्स पुढे येत आहेत, मॉडेल्स व वस्त्रोद्योगाशी संबंधितांनाही संधी मिळत आहे. या क्षेत्रातील सारे दिग्गज मुंबईत या वीकच्या निमित्ताने एकवटले आहेत.
या वेळची ‘थीम’ आहे ‘सेव्ह अवर टायगर’. प्रत्येक डिझायनरने या विषयावरील आपल्या कल्पना सादर केल्या आहेत. त्यातील तीन सर्वोत्तम डिझायनर्सना पुरस्कारही देण्यात येणार आहे. या वीकच्या निमित्ताने सहभागी झालेल्या संबंधितांपैकी काहींचे प्रातिनिधिक मनोगतही बरेच काही सांगून जाते. नागपूरची डिझायनर श्रुती संचेती हिने स्वदेशी चळवळीवर आधारित आपल्या कलाकृती लॅक्मे फॅशन वीकमध्ये सादर केल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकांची जीवनशैली आणि त्या काळातील वस्त्रप्रावरणे यांपासून स्फूर्ती घेऊन संचेतीने डिझाइन्स तयार केल्या आहेत. त्यासाठी तिने ‘कॉटन’ आणि ‘लिनन’ यांचा अप्रतिम वापर केला आहे. महाराष्ट्राच्या पारंपरिक इंद्रायणी वीव्हर्स बोर्डवर निर्मिती केलेल्या कापडाचा कल्पकतेने वापर करण्यात आला आहे. विविधरंगी चौकटी, शेड्स आदींचा वापर करून त्या काळातील वस्त्रप्रावरणांवर असलेला ब्रिटिश प्रभाव परावर्तित होत आहे. मॅँड्रियन कॉलर आणि लांबलचक जॅकेट्स भारतीयांच्या परंपरावादाचे दर्शन घडवते. ग्रामीण भागातील कलाकार, कलावंतांनी या कलेक्शनचा वापर करून पारंपरिक कपडे विणण्याच्या भारतीय कलेला संजीवनी द्यावी, हा श्रुती संचेतीचा हेतू आहे.
डिझायनर गौरव शहा याने राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील कलांचा समन्वय करून आपल्या कलाकृती तयार केल्या आहेत. राजस्थानच्या कोटा फॅब्रिक्सवर मोगलकालीन चित्रांचा आधार घेत चिकनकारी एम्ब्रॉयडरीचा वापर करण्यात आला आहे. बेज, क्रीम, भडक लाल रंग आणि काळ्या रंगाचा प्रभाव असणार्‍या चोळी व स्कर्ट्स गौरव शहाच्या कलेक्शनचे आकर्षण असेल. फॅशन क्षेत्रावर महिलांचा अधिक प्रभाव आहे. देशातील सर्वोत्तम फॅशन डिझायनर्सच्या कलाकृतींच्या या मेळाव्यांमध्ये जगातील 75पेक्षा अधिक महिला मॉडेल्स सहभागी होणार आहेत. पुरुष मॉडेल्सची कमी संख्या प्रकर्षाने जाणवते. सुप्रसिद्ध पुरुष मॉडेल कबीर सिंग यांना मात्र तसे वाटत नाही. ते म्हणतात, ‘महिलांच्या संख्येइतकीच पुरुष मॉडेल्सची संख्या खूप आहे. मात्र, अधिक डिझायनर्स महिलांसाठीच कपडे तयार करतात. महिलांसाठीच्या कपड्यांचे मोठे मार्केट असलेला हा व्यवसाय आहे. त्यामुळे अधिक मागणी महिलांच्या कपड्यांनाच असते. फरिदाबादहून दिल्लीला आल्यानंतर कबीर सिंग यांनी स्वत:च्या देखण्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून न राहता एमबीएचा अभ्यासक्रम पूर्ण केला. मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले. स्वत:चा मार्शल आर्टचा क्लास सुरू केला. मॉडेलिंग क्षेत्रात कबीर यांना त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि सुंदर शरीरसंपदेमुळे चांगल्या ब्रॅँड्सकडून आॅफरही आल्या. त्यांनी डेबनहॅम्स, यामाहा, रेव्हलॉन, ली, व्हेरिट्टो, माँटे कार्लो आदी ब्रॅँडसाठी मॉडेल म्हणून काम केले. रिलायन्सची त्यांची जाहिरात अद्याप प्रसिद्ध व्हायची आहे. दाक्षिणात्य चित्रपटातही त्यांना एक आघाडीची भूमिका मिळाली आहे. एक यशस्वी मॉडेल असूनही त्यांचे पाय अद्याप जमिनीवर आहेत. मिलिंद सोमण हा त्यांचा आदर्श आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार शरीरसंपदा कायम टिकवणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे मिलिंद सोमण यांचे मला कौतुक वाटते. आजही त्यांनी आपली शरीरसंपदा पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. कबीर सिंग यांना कोणत्याही मॉडेलने मी ‘स्ट्रगलर’ आहे असे म्हटलेले रुचत नाही. त्यांचा प्रत्येक ज्युनियर मॉडेलला सल्ला असतो. स्वत:ला ‘स्ट्रगलर’ म्हणवून घेऊ नका, कमी लेखू नका, कारण ‘स्ट्रगलर’ हा शब्द तुमच्या डोक्यात कायमचा घर करून राहतो. स्वत:चे भवितव्य घडवण्यासाठी कबीर सिंग यांनी दिल्ली सोडून मुंबईची वाट धरली. प्रत्येकाचे दिवस येतात. तेव्हा नाउमेद न होता चांगल्या संधीची प्रतीक्षा करा, असा त्यांचा आपल्या सहकार्‍यांना सल्ला आहे. त्यांच्या मते पुरुष मॉडेल्सना वर्षातून दोन-तीन शो मिळतात. त्यामुळे मॉडेलिंगवर पूर्णपणे अवलंबून राहता कामा नये. अन्य क्षेत्रातील इतर गुण कला, कौशल्य, अभ्यास याचा विसर पडू देता कामा नये. कबीर सिंग यांच्या मते महिला मॉडेल्सपेक्षा पुरुषांना स्वत:च्या शरीरसंपदेची अधिक कटाक्षाने काळजी घ्यावी लागते. अधिक मेहनत करावी लागते. मी पोटावरचे ‘सिक्स अ‍ॅब्ज’ हे स्टेरॉइडने न आणता व्यायामाने आणले आहेत, असे कबीर सिंग अभिमानाने सांगतात.