आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Fifa President Sepp Blatter Resignation By V.V.Karmarkar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खेळांचा राजा, पैशाचे खेळ!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंपण म्हणे शेत राखते, पण ती गोष्ट पुराणातली. पण म्हणतात ना, पुराणातली वांगी राहू द्या पुराणात… अन् या कलियुगात कुंपणच चक्क शेत खातंय की : केवळ यंदा नव्हे, तर गेली कित्येक दशकं. ऑलिम्पिक वा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजनाची संधी लाभावी, बांधकामांपासून नाना व्यवहारांची कंत्राटे देण्याचे अधिकार हाती एकवटावेत, यासाठी मतदारांना हरतऱ्हेने लाच देण्याचे किस्से सर्वांना माहीत आहेत. त्यांवरही कडी करणारा, फिफा उर्फ जागतिक फुटबॉल संघटनेतील ताजा घोटाळा. एक हजार कोटी रुपयांना भिडणारा! पण या घोटाळ्याच्या आणि त्यामागे दडलेल्या अनेक घोटाळ्यांच्या सफाईला आता चालना मिळेल, ती फिफाचे निगरगट्ट सर्वेसर्वा सेप ब्लॅटर यांच्या नाट्यपूर्ण राजीनाम्याने.
सेप ब्लॅटर हे आपणहून सत्ता सोडणा-यातले थोडेच आहेत? १९९८ मध्ये ते प्रथम अध्यक्षपदावर झेपावले, तेव्हा आफ्रिकी मतदारांना पन्नास हजार डॉलर्सची लाच त्यांच्यातर्फे दिली गेली होती. त्यानंतरच्या निवडणुकीआधी त्यांचे प्रमुख विश्वासू सहकारी, मिचेल झेन रुफीनेन यांनी कार्यकारिणी सदस्यांतर्फे ब्लॅटर यांच्या गैरव्यवहारांचे निवेदन स्वीस सरकारला दिले होतेच. गेल्या निवडणुकीच्या सुमारास, निवृत्तीचे फसवे आश्वासन ब्लॅटर यांनी युरोपियन संघटनेचे अध्यक्ष व महान फुटबॉलपटू मायकल प्लॅटिनी यांना देऊन टाकले होतेच! मग शेत खाऊन टाकणा-या या अजब कुंपणरूपी ब्लॅटरना ही उपरती कशाने झाली? आणि तीही निवडून आल्यानंतर तीन दिवसांत!
आशिया, आफ्रिका, यूएसए व कॅनडा सोडून अमेरिका, रशिया, फ्रान्स व इटली अशा २०९ पैकी सुमारे १३० देशांचा पाठिंबा येती चार वर्षे फिफाचा कारभार चालवण्यास अपुरा पडणार, ही जाणीव ब्लॅटर यांना कशामुळे झाली? व्हिसा, आदिदास, नाइकी आदी शक्तिमान पुरस्कर्ते विरोधात जाण्याची चिन्हे दिसू लागली होती. भांडवलदारी शक्तींपुढे ब्लॅटरना नमतं घ्यावं लागलं आहे, एरवी त्यांचे जीवन, त्यांचे हितसंबंध गुंतले होते फिफात. कारण फुटबॉलची गोष्टच न्यारी. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पंचखंडांतील सदस्यसंख्येपेक्षाही, फिफाची सदस्य संख्या किंचित जास्तच, दोनशे सहा सदस्य देशांची. फुटबॉल खेळांचा नुसता राजाच नव्हे, तर राजाधिराज, गतसाली विश्वचषकातून या शहेनशहाचे उत्पन्न किती असावे? चक्क ३१ हजार कोटी रुपयांचे! आणि त्यातून निव्वळ नफा? १७ हजार कोटी रुपयांचा! असे हे साम्राज्य उभारणारे व आता ओळीने पाचव्यांदा फिफाच्या अध्यक्षपदी निवडून आलेले सेप ब्लॅटर हे संघटनेचे सर्वेसर्वा. आणि सत्तेची सारी सूत्रं हाती आणण्यासाठी व ती मुठीत घट्ट राखून ठेवण्यासाठी अफाट लोकाश्रयातून खचाखच भरलेला खजिना ते मतदात्यांसाठी कसा वापरतात, ते बघा. सदस्य देशांच्या संघटनांना वार्षिक अनुदान अडीच लाख डॉलर्स, म्हणजेच एक कोटी साठ लाख रुपये आणि त्यात भरीस भर, गेल्या विश्वचषकाच्या नफ्यातून एकरकमी अनुदान पाच लाख डॉलर्स, वा तीन कोटी पंधरा लाख रुपये. जगातील पहिल्या दीडशे देशांत स्थान मिळवण्यासाठी धडपडणा-या भारतीय संघटनेचे बॉस प्रफुल्ल पटेल हे काय, शरद पवारसाहेबांप्रमाणे सेप ब्लॅटरपुढेही काय उगाचच नतमस्तक होतात?
हे झाले सर्वोच्च पातळीवरचे साटेलोटे. याचे साक्षीदार असलेली दुसरी-तिसरी फळी आपापल्या लाभार्थाच्या कामाला केव्हाच लागलेली. उदाहरणार्थ जॅक वॉरनर. उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका व कॅरेबियन बेटे (कॉनसॅसॅफ) या गटाचे एकवीस वर्षे अध्यक्ष व फिफाचे माजी उपाध्यक्ष. त्रिनिदाद-टोबॅगो, देशातील राष्ट्रीय सुरक्षा मंत्री. त्यांनी वैयक्तिकरीत्या कसा डल्ला मारला? फुटबॉलच्या विकासासाठी त्यांनी सुरू केले प्रशिक्षण केंद्र. त्यासाठी फिफाकडून रीतसर मिळवले जवळपास एकशे साठ कोटी रुपयांचे अनुदान. यात ग्यानबाची मेख अशी की, हे केंद्र त्यांनी उभारलं आपल्या मालकीच्या जमिनीवर, भूखंडावर. बहाणा सार्वजनिक कामाचा. प्रत्यक्षात ती बनली त्यांच्या खासगी मालकीची वास्तू!
वॉरनर यांच्यावर आणखीही स्पष्ट आरोप आहे, २००६ च्या विश्वचषकाची तिकिटं त्यांनी आपल्या अधिकारात हस्तगत केली व काळ्या बाजारात विकली. हा घोटाळा दहा लाख डॉलर्सचा वा सव्वासहा कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा. सेप ब्लॅटर यांना या गैरव्यवहाराची कल्पना दिली गेली. राजे ब्लॅटर यांनी त्यावर कोणती कारवाई केली? असं म्हणतात, त्यांनी ‘नाराजी’ व्यक्त केली! तेरी भी चूप, मेरी भी चूप!
लबाड लाभार्थींची, भ्रष्ट सत्ताधीशांची ही दुसरी फळी गेली तीन-चार दशके सक्रिय आहे. त्रिनिदादचे जॅक वॉरनर यांचं वय ७२. कॉनसॅसॅफ उर्फ, उत्तर व मध्य अमेरिका व कॅरेबियन बेटांच्या संघटनेत १९९० ते २०११ असे एकवीस वर्षे अध्यक्ष. पैशाच्या गैरव्यवहारांची चौकशी बंद करण्यासाठी त्यांनी जून २०११ मध्ये फुटबॉलमधील सारी अधिकारपदे सोडली (केवढा हा त्याग!) पण आता त्यांना सत्याला सामोरे जावेच लागेल. आता ते असाही त्रागा करत आहेत की, दहा लाख डॉलर्सची लाच मी घेतली असेल, तर ती लाच देणा-याला का पकडत नाही? मग वॉरनर रंगाचे, काळ्या-गो-याचे कार्ड काढतात. ‘फक्त काळ्यांवर कारवाई का होत्येय?’ असा कांगावा करतात.
हेन्री वेब हे केमन बेटांचे अध्यक्ष, तर ५८ वर्षीय कोस्टास टक्कास उपाध्यक्ष युजिनिओ फर्नांडिस हे दक्षिण अमेरिकी संघटनेचे अध्यक्ष उरुग्वेचे अध्यक्षपद त्यांनी आठ वर्षे उपभोगलेले. राफायल एसक्लिवेल वय वर्षे ६८. आणि गेली अठ्ठावीस वर्षे व्हेनेझुएलाचे अध्यक्षपद त्यांनी हातांबाहेर जाऊ दिलेलं नाही. निकोलस लिऑझ यांनी ८६ उन्हाळे-पावसाळे पचवलेले आहेत. पॅराग्वेचे ते माजी अध्यक्ष. एदुआर्दो ली कोस्टारिकाचे माजी अध्यक्ष. ज्युलियो रोचा यांनी वयाच्या पन्नाशीआधीच निकाराग्वेची अध्यक्षीय खुर्ची पकडून ठेवली ती दोन तपांसाठी. जोस मारिया मारीन तीन वर्षे ब्राझीलचे अध्यक्ष. तेही आता अमेरिकेत तुरुंगवास भोगत आहेत.
मुळात या सा-या अटकसत्राचे, या नाट्याचे प्रयोजन नेमके काय? याचं एक खरे कारण, कधीच छुपे राहिलेले नाही. २०१८ व २०२२ च्या फिफा विश्वचषक फुटबॉल संयोजनास इंग्लंड, अमेरिका (यूएसए) आसुसलेले होतं. पण अरब, आशियाई आणि अँग्लो-अमेरिका विरोधातील दक्षिण अमेरिकी व्होट बँक जोपासण्यासाठी, रशिया व कतार यांना ती यजमानपदे मिळवून देण्याची चाल सेप ब्लॅटर खेळले. लाच देऊन त्यांनी उभारलेली ही व्होट बँक, या चौकशीतून उद्ध्वस्त होणार काय, ते बघायचं.