आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Fuel By Prof. H.M. Desarda, Divya Marathi

इंधन वापरावर हवेत कठोर निर्बंध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वर्षी कच्च्या तेलाच्या आयातीसाठी भारताला दहा लाख कोटी रुपये मोजावे लागतील. हे परवडणारे नाही. याविषयी परकीय व्यापारातील तूट हा प्रश्न तर आहेच. मुख्य म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असून सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अजिबात परवडणारे नाही. तात्पर्य, सामाजिक-आर्थिक-पर्यावरणीय आधारित ऊर्जा, वाहतूक, शेती व औद्योगिक उत्पादन पद्धती देशाच्या व जगाच्या हिताची नाही याबाबत तिळमात्र शंका नसावी.

आजमितीला आपली शेती व औद्योगिक उत्पादन मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते, अन्य रसायने, प्लास्टिक, विजेवर आधारित आहे. हरितक्रांती नावाची शेती व आधुनिक कृषी उद्योग प्रक्रियासुद्धा पेट्रोलियम पदार्थांच्या वापराखेरीज चालूच शकत नाही अशी आजची स्थिती आहे. कहर म्हणजे चारचाकी वाहनाखेरीज आधुनिक जीवनशैलीची कल्पनाच करवत नाही. थोडक्यात, हा एक जबरदस्त तेल-वायू जिवाश्म इंधन (फोसिल फ्यूएल) विळखा होय.

मोटार वाहनाचा सुळसुळाट : 20 व्या शतकाच्या उत्तरार्धात व्यक्तिगत मोटारीचा जो बेछूट विस्तार झाला त्यामुळे एक अत्यंत घातक, प्रदूषणकारी मौलिक संसाधनाची बरबादी करणारी जीवनशैली सर्वत्र वेगाने फोफावली. जणू व्यक्तिगत मोटारीखेरीज कामावर जाणे, बाजार करणे, शाळा-महाविद्यालयात जाणे, सामाजिक संबंध राखणे, स्वातंत्र्य उपभोगणे अशक्य आहे. याबाबत उत्तर अमेरिकेची नक्कल करण्याचा सा-या जगातील महाजन-अभिजन वर्गाने चंग बांधला आहे. परिणामी सामाजिक-आर्थिक विकासाचा निकष म्हणजे गाडी-बंगला व समस्त आधुनिक यंत्र-संयंत्रे ही होत. अमेरिकेत गाडी नसेल तर तो पुरता पंगू! व्यक्तिगत मोटारीखेरीज जीवनाची कल्पनाच असंभव! म्हणूनच तेथील 30 कोटी लोकांकडे 31 कोटी वाहने व 28 कोटी बंदुका आहेत. भारतासह जगभरच्या राज्यकर्त्या वर्गाला युरोप-अमेरिकेचे अंधानुकरण करण्याचा अट्टहास आहे. हीच तेलकथा आणि व्यथा आहे.

स्वातंत्र्य चळवळीचे उद्दिष्ट स्वदेशी समाज व अर्थव्यवस्था निर्माण करणे हे होते. गांधीजींना राष्‍ट्रपिता म्हटल्यावर निसर्गाशी तादात्म्य राखणा-या जीवनशैलीचे मर्म व महत्त्व व्यक्ती, देश, समाज म्हणून आपणास कळेलच, असे मानणेही चुक ीचे नव्हते. तथापि, नेहरू व अन्य नेत्यांना पश्चिमेच्या औद्योगिकीकरण, यांत्रिकीकरण व शहरी जीवनशैलीचे विलक्षण आकर्षण राहिले. भिलाई व भाक्रा ही आधुनिक मंदिरे आहेत. हे त्यांचे प्रसिद्ध वचन होते. आधुनिक भारताच्या विकासाची गुरुकिल्ली मानली गेली. सुखासीन उच्चभ्रू जीवनशैली हे विकासाचे परिमाण व प्रारूप बनले. व्यक्तिगत मोटार वाहन, विमान प्रवास, शीतयंत्रे राजकीय, व्यावसायिक, औद्योगिक व आर्थिक विकासाचे गमक झाल्याने नेते, नोकरशहा, न्यायाधीश, शास्त्रज्ञ, वकील, डॉक्टर, प्राध्यापक आदी व्यावसायिक , उद्योजक, व्यवस्थापक, जमीनदार व एकंदर धनिक जातीवर्गाच्या रहनसहन चालीरीतीचा भाग बनून देशात किमान दहा टक्के लोकसंख्या आज या वस्तू व सेवांचे चाहते-उपभोक्ते आहे. किंबहुना या प्रकारचा चैनचंगळवादी भोग-उपभोग हीच त्यांची दृश्य ओळख आहे. किंबहुना त्यांच्या जीवनाची ती एकमेव प्रेरणा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

आधी राजीव गांधी व नंतर मनमोहनसिंग यांनी जाणवपूर्वक राबवलेले उदारीकरण-खासगीकरण- ऑटोमोबाइल उद्योगाला चालना मिळाली. यामुळे जगातील बहुसंख्य ऑटोमोबाइल कंपन्यांनी भारतात शिरकाव करून उत्पादन व विक्रीकरणाचा महाउद्योग उभा केला आहे. सध्या 2700 बहुराष्‍ट्रीय कंपन्या भारतात व्यापार-उद्योग करत आहेत. जगातील एकाहून एक आलिशान मोटारी भारताच्या रस्त्यावर भन्नाट वेगाने धावत आहेत. थोडक्यात, मोटार वाहने आमच्या अर्थव्यवस्थेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. केवळ श्रीमंतच नव्हे, तर मध्यम वर्ग मोटारीसाठी वेडापिसा झाला आहे. तर अशी आहे या मोटारीची सुरस व चमत्कारिक कथा.

अर्थात, कनिष्ठ मध्यम आणि मध्यम वर्गाला रोजीरोटी मिळवण्यासाठी जो प्रवास करावा लागतो तो या शहरीकरण आणि औद्योगिकीकरण प्रक्रियेचा मजबूर भुक्तभोगी आहे. नाइलाजाने त्याला तीनचाकी वाहने वापरावी लागतात. अमेरिकेत धुणीभांडी-साफसफाई करणा-या मोलकरणीकडेसुद्धा कार आहे, असे अनेक वर्षांपूर्वी कौतुकाने सांगितले जात होते. 1988 मध्ये मी जेव्हा कॅनडा-अमेरिकेत गेलो होतो तेव्हा याचे इंगित कळले. आठवडाभर वेगवेगळ्या ठिकाणी पाच-पन्नास किमी परिसरात तिला कामाला जावे लागते. त्यामुळे जुनी गाडी उधारीवर घेऊन 25 टक्के उत्पन्न गाडीवर खर्च करणेच तिला गरजेचे होते. आपल्या देशातील लहान-मोठ्या शहरात दिवसाकाठी 100 रुपये कमावणा-या घरकाम करणा-या बाईला अथवा मोलमजुरी करणा-या माणसाला 30 ते 40 रुपये रिक्षा, टेम्पो किंवा बसवर खर्च करावे लागतात. व्यक्तिगत वापराच्या मोटार वाहन उद्योगाचे प्रस्थ आज देशविघातक बनले आहे. याला आवर घातल्याखेरीज भारतीय रुपयाची घसरण व अर्थव्यवस्थेची विकृती थांबण्याची सुतराम शक्यता नाही. सध्याचे आर्थिक आरिष्ट आपत्ती न मानता इष्टापत्ती मानून तेल संकट या सापळ्यातून सुटका करणे हाच विश्वधर्म ठरेल.

रेल्वे विस्तार व सुधारणा : 125 कोटी लोकांच्या दळणवळण, वाहतूक व संचाराच्या स्वस्त, सुरक्षित व विश्वासार्ह सोयी-सुविधा आवश्यक आहेत. ब्रिटिशांनी या देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी येथील रेल्वे आणि टपाल सेवेचे जाळे उभे केले. त्यायोगे व्यापारउदिम वाढवला. माल व प्रवासी वाहतूक व्यवस्था उभारली. त्यासाठी 50 हजार किमीच्या रेल्वेलाइन्स टाकल्या. आम्ही त्याचा लाभ घेत दुहेरीकरण, रुंदीकरण, विद्युतीकरण केले. तथापि, गेल्या 66 वर्षांत त्याच्या निम्म्या लाइन्स टाकल्या गेलेल्या नाहीत. आणखी एक बाब म्हणजे दुचाकीपासून चारचाकीपर्यंत वाहनांची संख्या 20 कोटी इतकी असून त्याचे उत्पादन वेगाने वाढत आहे. इतके मोटारीचे वेड लागले आहे.

मोटार वाहन उद्योगाला चौफेर चालना देण्याचे धोरण चुकीचे असून याला सत्वर आळा धालून डिझेल-पेट्रोल-एलएनजीवर आधारित मोटार वाहन व्यवस्थेला पर्याय शोधणे आवश्यक आहे. यासाठी रेल्वेमार्गाची कार्यक्षमता वाढवणे गरजेचे आहे. रेल्वेच्या जाळ्याचा विस्तार करणे हा राष्‍ट्रीय महामार्ग तयार करण्यापेक्षा जास्त चांगला उपाय आहे. 200 किमीपर्यंतच्या स्थानिक लोकल गाड्या मोठ्या संख्येने वाढवल्या तर दुचाकी-रिक्षा व व्यक्तिगत कारचा उपयोग होण्याची गरज कमी होईल. पेट्रोलियम पदार्थांच्या अनिर्बंध वापरामुळे आपला देश सामाजिक आर्थिक-पर्यावरणीय अरिष्टांच्या विळख्यात सापडला आहे. त्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. यासाठी, व्यक्तिगत मोटारींचा वापर थांबवा. राष्‍ट्रपती, राज्यपाल व मुख्यमंत्र्यांसाठी एकच कार्यालयीन वाहन असावे. महत्त्वाच्या व्यक्तींसाठी असणा-या वाहनात काटकसर, सनदी अधिका-यांनी आवश्यकता नसेल तेव्हा सार्वजनिक वाहनांतून प्रवास करावा. वरिष्ठ पदावरील अधिका-यांच्या वाहनांवर निर्बंध, तीर्थयात्रेच्या ठिकाणी खासगी वाहनांना बंदी हेच तेलाच्या विळख्यातून बाहेर पडण्याचे प्रभावी उपाय आहेत. वसुंधरेच्या रक्षणासाठी, देशहितासाठी असा बदल स्वीकारणे गरजेचे आहे.