आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरी विकासाचा लेखाजोखा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या दोन शतकांनी विकासाला जगाने शहरांत आणून ठेवले आहे, एवढेच नव्हे तर शहरांत होते, तोच विकास असेही एक सूत्र बनवले आहे. त्यामुळेच जगभर आज शहरांतील आर्थिक आणि इतरही घडामोडींची ठळक दखल घेतली जाते आणि ग्रामीण भागातील विकासाकडे दुर्लक्ष केले जाते. असे का होते आहे, याचे कारण ब्रुकिंग इन्स्टिट्यूटने नुकताच जाहीर केलेला ‘ग्लोबल मेट्रो मॉनिटर मॅप’(२०१४) देतो. जगाचे आर्थिक व्यवहार नेमके कोणत्या महानगरांत वाढले, याचा अभ्यास ही संस्था करते. चीन आणि भारताच्या आर्थिक विकासाकडे जगाचे लक्ष लागले असले तरी अजूनही युरोप आणि अमेरिकेतील शहरेच जगावर राज्य करत आहेत, असा हा अहवाल सांगतो. अर्थात विकसनशील देशांतील शहरांचा वाटा वाढत चालला आहे, हेही त्यातून पुढे आले आहे. त्यामुळेच भारतीय शहरांचे स्थान सातत्याने सुधारते आहे. अहवालात प्रामुख्याने रोजगार आणि दरडोई उत्पन्नातील वाढीच्या निकषांना महत्त्व देण्यात आले आहे. जगभर शहरे का फुगत आहेत, याचे कारण रोजगार आणि वाढते उत्पन्न हेच राहिले आहे. त्यामुळे वाढत्या शहराविषयी काळजी करणा-या संस्था आणि सरकारांना या मुद्द्यावर लक्ष देणे क्रमप्राप्त आहे. या सगळ्या स्पर्धेत आपला देश कोठे आहे, याचा शोध घेतला तर असे लक्षात येते की, अशा पहिल्या १५ शहरांत एकाही भारतीय शहराचा समावेश नाही! जगातील अशा पहिल्या ३०० महानगरांत दिल्ली अठरावी आहे, तर कोलकाता ३२, मुंबई ५२, चेन्नई ५७, हैदराबाद ७६, तर बंगळुरू ८७ व्या स्थानावर आहे. पहिल्या शंभरात या भारतीय शहरांचा समावेश होतो. अर्थात, पहिल्या शंभर शहरांच्या यादीत चिनी शहरांनी बाजी मारली आहे, यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण गेली तीन दशके चीनने शहरी विकासाचा धडाका लावला आहे. पहिल्या २० मध्ये ११ आणि पहिल्या १० मध्ये चार चिनी शहरांनी स्थान मिळवले आहे! शहरीकरण रोखले पाहिजे, असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात जगभरातील धोरणे मात्र त्याच्या नेमकी उलटी आखली जातात. कारण या ३०० महानगरांत जगातील फक्त २० टक्केच लोक राहत असले तरी जगातील निम्मे उत्पादन या शहरांत होते, हेही या अहवालाने पुन्हा समोर आणले आहे. शहरांत पैसा का खेळतो, याचे थेट कारण त्यामुळे लक्षात येते.