आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मकांडी लोकांच्या धर्मभावना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय संस्कृतीमध्ये आध्यात्मिक उंची गाठणारे अनेक संत-महंत होऊन गेले. त्यांनी ईश्वराविषयी केलेले चिंतन व जपलेले समाजभान याचा जनजागृती होण्यासाठी खूप मोठा उपयोग झाला. ज्या संतांनी बंडखोर विचार मांडले, त्यांचे उद्दिष्ट समाजात दुही माजावी, असे अजिबात नव्हते. त्यांनी स्वत:ची ओळख कधीही संत म्हणून करून दिली नाही, तर तो बहुमान जनसामान्यांनी त्यांना दिला होता. अर्थात, हा सगळा भूतकाळ झाला. सध्याचे संत-महंत कोणातरी राजकीय पक्षासाठी बोलत असतात आणि सनातन धर्माची मूल्ये जपण्याच्या नावाखाली कर्मकांडांचा पुरस्कार करत असतात. या बोलभांड संतांनी गेल्या काही महिन्यांपासून शिर्डीच्या साईबाबांवर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. शिर्डीचे साईबाबा हे गुरू आणि देवही नसल्यामुळे त्यांच्या मूर्ती हिंदू मंदिरांतून हटवण्यात याव्यात, असा ठराव अलाहाबादमध्ये पार पडलेल्या धर्मसंसदेत रविवारी मंजूर करण्यात आला. साईबाबांच्या मूर्ती मंदिरांमध्ये ठेवल्या, तर त्यामुळे धार्मिक स्थळांना दुष्प्रभावित करणा-या गोष्टींची झळ लागू शकते, असे अजब तर्कट या कर्मकांडी लोकांनी लढवले आहे.
ज्या हिंदू धर्मातील मूल्यांविषयी आजचे शंकराचार्य अभिमानाने बोलत असतात, त्यापैकी एकाही शंकराचार्याने हिंदू धर्माला काळिमा फासणारी जातीयतेची प्रथा नष्ट करण्यासाठी कोणतीही चळवळ हाती घेतल्याचे कधीही दिसलेले नाही. शिर्डीच्या साईबाबांनी आपण स्वत: कोणत्या धर्माचे आहोत, याला फारशी किंमत न देता मानवतेची मूल्ये आपल्या कृतीतून जपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच त्यांना संत म्हणून लाखो भाविकांनी पूजले. असे भाग्य सध्या जे साधू-संत म्हणून मिरवत आहेत अशा किती जणांना लाभले आहे याचा त्या लोकांनीच विचार करण्याची वेळ आली आहे. ज्या हिंदू मंदिरांत साईबाबांच्या मूर्ती असतील त्या तेथून काढून टाकाव्यात, असे सांगणा-या शंकराचार्यांनी हिंदू मंदिरे असोत वा अन्य धर्मीयांची प्रार्थनास्थळे; तेथे जे आर्थिक गैरव्यवस्थापन चालते, भाविकांची लुबाडणूक होते त्याबद्दल कधी चकार शब्द तरी काढला आहे का? या कथित संत-महंतांच्या धार्मिक भावना फारच नाजूक आहेत. त्या 'पीके' चित्रपटामुळे दुखावतात आणि साईबाबांमुळेही... या बाबा-बुवांनी आता स्वत:चीच चिकित्सा करून घ्यायला हवी!