आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यासोनी प्रकटलेले 'गोनीदां'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गो. नी. दांडेकर आिण त्यांची कन्या वीणा देव. - Divya Marathi
गो. नी. दांडेकर आिण त्यांची कन्या वीणा देव.
एखाद्या लेखकाचं मोठेपण, श्रेष्ठत्व नेमकं कशावर जोखलं जातं, या प्रश्नाची अनेक उत्तरं देता येतात. विशेषत: सध्याच्या काळात एखादं पुस्तक हमखास खपाऊ, विकाऊ बनवणं, हा ‘मार्केट ट्रेंड’ बनला आहे. पण सुमारे पन्नास वर्षांपूर्वींच्या लेखनाबाबत हे सारं गैरलागू आहे. त्या काळातल्या गो. नी. दांडेकर नावाच्या ऋषितुल्य लेखकाच्या साहित्याचं मोठेपण त्या लेखनाची ‘विदग्धता’ या एकाच निकषावर ठरवता येतं. असं तावून सुलाखून उजळलेलं विपुल आणि वैविध्यपूर्ण लेखनसंचित गोनीदांनी त्यांच्या समकालीन आणि पुढील पिढ्यांच्या ओंजळीत ठेवलं.

भारतीय उपनिषदांच्या तत्त्वज्ञानी परंपरेत गुरू-शिष्यांच्या संवादात गुरू आपल्या शिष्याला ‘चरैव इति’ असा आदेश देतात. तो आदेश गोनीदांनी तंतोतंत आचरणात आणलेला दिसतो. शिष्याच्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी गुरूंजवळ ‘चरैव’ हा एकच शब्द असतो. म्हणजे ‘तू सतत फिरत राहा’ असे गुरूंचे शिष्यांना सांगणे होते. फिरल्याने, प्रवासाने माणूस अनेकार्थांनी संपन्न होत जातो, शिकत जातो आणि फिरत राहिल्यानेच त्याला ‘माणूसपण’ सापडत जाते. कशासाठी, कुणासाठी जगायचे, कसे जगायचे, काय जपायचे, काय टाकून द्यायचे, यांचा उलगडा फिरण्यातून होत जातो, हा गुरूंचा उपदेश होता. गोनीदांच्या आयुष्याची धारा पाहिली तर त्यांच्या आयुष्यातला बहुतांश काळ त्यांनी हा ‘चरैव इति’ मंत्र अनुसरलेला दिसतो.

वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी गोनीदांनी देशसेवेसाठी गृहत्याग केला. शाळा इयत्ता सातवीतच सोडून दिली. त्या काळात पुणे, मुंबई, नाशिक, नगर अशी भ्रमंती कोवळ्या वयात केली. हा पहिला प्रवास त्यांना खूप शिकवणारा ठरला असणार. कारण त्यानंतर ते गाडगेबाबांच्या सहवासात आले. त्यांच्या कार्याचा एक भाग बनले. गाडगेबाबांचे पत्रलेखक झाले. त्यांच्याबरोबर पुन्हा सगळीकडे भटकले. हा सारा प्रवास त्यांनी शब्दरूप करून ठेवला आहे. तळागाळातल्या प्रत्येक घटकाची सुख-दु:खे, व्यथा-वेदना, ताणे-बाणे त्यांनी जवळून अनुभवले. अश्रूंची भाषा त्यांना समजली. हास्याचे मुखवटेही जाणून घेता आले. गाडगेबाबांच्या सहवासातून आयुष्य नेमके कशासाठी आहे, याची जाणीव झाली आणि जगण्यातला एक नवा अध्याय गोनीदांच्या आयुष्यात जोडला गेला.

संतसाहित्याची महत्ता जाणवल्यावर ते मुळातून समजून घेण्यासाठी गोनीदा वारकरी शिक्षण संस्थेत अभ्यासासाठी दाखल झाले. त्यानंतर प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचे अवगाहन करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली आणि ते महामहोपाध्याय श्रीधरशास्त्री पाठक यांच्याकडे गेले. वेदोपनिषदांसह सर्व प्राचीन वाङ््मयाचा त्यांनी अभ्यास केला आणि गुरूंच्या आदेशानुसार त्यांनी नर्मदा परिक्रमेचे प्रस्थान ठेवले. त्यांची ही सारी भटकंती त्यांच्या ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’, ‘स्मरणगाथा’ मधून नंतर वाचकांसमोर आली आणि एक अनोखे विश्व मराठी साहित्यात खुले झाले.

मधला एक काळ गोनीदांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणूनही व्यतीत केला. गोळवलकर गुरुजींचा सहवास त्यांना लाभला होता. पं. सातवळेकरांच्या ‘पुरुषार्थ आणि वैदिक धर्म’ या मासिकाचे ते काही काळ सहसंपादकही होते. या निमित्ताने पत्रकारितेचा स्पर्शही गोनीदांना झाला होता. दरम्यान, तळेगाव दाभाडेच्या निसर्गरम्य परिसरात गोनीदांनी आपले घरकुल थाटले आणि पूर्णवेळ लेखनकार्य करण्याचा निर्णय घेतला. बालकुमारांसाठी संस्कारसंपन्न लेखनाची गरज त्यांना जाणवली होती. त्यामुळे गोनीदांनी सात्त्विक आणि संस्कारक्षम असे लेखनही केले. ‘बिंदूची कथा’ पासून सुरू झालेले गोनीदांचे लेखन त्यानंतरच्या काळात कादंबरी, कथा, ललित, गद्यचरित्र, आत्मचरित्र, नाटक, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक, संगीतिका...अशा अनेक वाटांनी बहरत गेले. तब्बल १०४ पुस्तकांचे लेखन गोनीदांनी केले. ही संख्या आजही आश्चर्यचकित करणारी आहे. त्यांच्या ‘स्मरणगाथे’ला साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन गौरवले आणि अकोल्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ते विराजमान झाले, तेही या ‘उत्तम-उदात्ता’च्या ओढीनेच...

गोनीदांच्या कादंब-यांचे मराठी साहित्यात एक विशेष स्थान आहे आणि कायम राहील. त्यांनी भटकंतीत अनुभवलेली तळागाळातील माणसेच त्यांच्या अनेक साहित्यकृतींचे नायक-नायिका ठरलेले दिसतात. अनेकदा समाजाच्या मुख्य धारेपासून दूरवरची पण माणूसपणाने काठोकाठ भरलेली ही माणसेच जीवनाचे मर्म सांगून जातात. मग तो पवनाकाठचा धोंडी असो किंवा शितू, पडघवलीमधले अस्सल कोकणी अर्क असोत..भारतीय परंपरेतली ज्ञानसंस्कृती, आचार-विचार, वातावरण, भाषा, जडणघडण..यांचे नेमके दर्शन गोनीदांची लेखणी मोगरा फुलला, मृण्मयी, देवकीनंदन गोपाला, जैत रे जैत, हे तो श्रींची इच्छा, कुणा एकाची भ्रमणगाथा, स्मरणगाथा अशा साहित्यकृतींतून घडवत जाते. गोनीदांचे दुर्गप्रेम, दुर्गभ्रमंती, दुर्गछायाचित्रण आणि त्याविषयीचे लेखन हाही एक वेगळा पैलू आहे. ‘अभ्यासोनी प्रकट व्हावे’ या समर्थउक्तीचा प्रत्यय त्यांच्या या लेखनात दिसतो. शिवाय स्वत:पुरते हे ज्ञान मर्यादित न ठेवता, समविचारी मंडळींसोबत ते वाटून घेण्याची हौस गोनीदांना आहे. त्यामुळे रायगडाचे अभ्यासक आणि छायाचित्रकार रवींद्र लोहोकरे गोनीदांना ‘मृण्मयी पुरस्कारा’चे खरे मानकरी वाटतात. ही सजगता गोनीदांनी पुरस्कार देताना आवर्जून जपलेली दिसते. सोनोपंत दांडेकर अध्यासन, वारकरी शिक्षण संस्था, गाडगेबाबा आश्रमशाळा, भूकंपग्रस्त यांच्यासाठी वेळोवेळी त्यांनी पुरस्कार न देता रक्कम थेट पाठवण्याचा निर्णय घेतलेला दिसतो.

गोनीदांनी मराठी साहित्यात फारसा प्रचलित नसलेला संगीतिका हा लेखनप्रकारही उत्तम रीतीने हाताळलेला दिसतो. ‘राधामाई’, ‘यशोधरा’ आणि ‘मंदोदरी’ अशा तीन संगीतिका गोनीदांनी लिहिल्या. आता गोनीदांच्या जन्मशताब्दी वर्षात या मूळ संगीतिकांचे प्रयोग करण्याचा मानस त्यांच्या कन्या डॉ. वीणा देव यांनीही नुकताच व्यक्त केला आहे. तो अर्थातच स्वागतार्ह आहे. एकूणच गोनीदांच्या आजपासून प्रारंभ होणा-या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या साहित्यकृती, दुर्मिळ लेखनाचे पुनर्प्रकाशन, प्रदर्शने, अभिवाचने, माहितीपटाची निर्मिती, दुर्गयात्रा, दुर्गसंमेलन अशा विविध उपक्रमांनी साजरे करण्याचा विचार गोनीदाप्रेमी करत आहेत. या निमित्ताने ‘चरैव’ हा संदेश शिरोधार्य मानून आयुष्यभर ‘अजून चालतोचि वाट’ म्हणत भटकलेल्या गोनीदांच्या स्मृती आणि त्यामागचा संदेश नव्याने धारदार होत राहील, यात शंका नाही.