आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय भाषांना साद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्वदच्या दशकात व्यापार, माहिती व संवादाचे माध्यम असलेल्या इंटरनेटवर इंग्रजी भाषेचा वरचष्मा होता. पण माहिती तंत्रज्ञान क्रांतीने जग जसे जवळ येऊ लागले, तसे इंग्रजी ही जागतिकीकरणाची एकमेव भाषा होऊ शकत नाही हे लक्षात येऊ लागले. कारण इंग्रजी बोलणारा भाषिक समूह हा जगाच्या एकूण भाषिक समूहामध्ये फार थोडा आहे. इंग्रजी न बोलणा-या अनेक देशांमध्ये २१ व्या शतकातही स्थानिक भाषा-बोलींच्या माध्यमातून सामाजिक-आर्थिक व्यवहार होत आहेत. महत्त्वाचे म्हणजे इंटरनेटचा प्रसार हा सर्व भाषांना सामावून घेतल्यानेच अधिक होऊ शकतो हे गुगलसारख्या इंटरनेट सेवा देणा-या कंपन्याही समजू लागल्या आणि त्या दृष्टीने त्या कंपनीने आपले प्रयत्न सुरू केले. हाच प्रयत्न फेसबुक या सोशल मीडियातील अग्रेसर कंपनीलाही करावा लागला. आता या दोन कंपन्यांनी भारतीय भाषांना इंटरनेटवर अधिकाधिक सामावून घेण्यासाठी कंबर कसली आहे. गुगलला भारतातील भाषिक व्यवहार इंटरनेटवर आणायचा असून फेसबुकला इंटरनेटचा प्रसार संपूर्ण भारतात करायचा आहे. त्या दृष्टीने गुगलने हिंदी भाषेत आपले सर्च इंजिन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्च इंजिनचा २०१७ पर्यंत देशातील सुमारे ५० कोटी हिंदी भाषिक फायदा घेऊ शकतील. युरोपमधील इस्टोनियासारख्या एक कोटी ३० लाख लोकसंख्या असलेल्या देशाची विकिपीडियावर सुमारे ४४ हजार माहितीपर पाने आहेत. पण सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात हिंदी भाषेची केवळ ४४ हजार पाने आहेत. ही तफावत गुगलने लक्षात घेतली आहे. इंटरनेट येऊन आता २० वर्षे होत असताना हिंदी भाषा व अन्य भाषांतील साहित्य-आर्थिक व्यवहार इंटरनेटच्या कक्षेत आणण्याचे प्रयत्न केले गेलेले नाहीत. त्यामुळे देशातील हजारो प्रकाशन संस्था, वर्तमानपत्रे व व्यापारी कंपन्या इंटरनेटच्या कक्षेबाहेर आहेत. या सर्वांना भाषेच्या माध्यमातून जोडण्याचे गुगलचे प्रयत्न आहेत. फेसबुकलाही भारतातील भाषिकांना स्वत:ची सेवा द्यायची आहे. त्या दृष्टीने ते स्वत:ची इंटरनेट सेवा सुरू करत असून ६० टक्के ग्रामीण भारत फेसबुकमार्फत इंटरनेटवर येणार आहे. एकंदरीत अमेरिकी कंपन्यांनाच इंग्रजीचा अट्टहास व्यर्थ असल्याचे लक्षात येऊ लागले आहे, हे महत्त्वाचे आहे.