देशाच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी भाभा यांचा मुंबईतील मलबार हिल या आलिशान वस्तीत असलेला ‘मेहरांगीर’ हा बंगला बुधवारी झालेल्या लिलावात 372 कोटी रुपयांना विकला गेला. नॅशनल परफॉर्मिंग सेंटर ऑफ आटर्स (एनसीपीए) या विख्यात संस्थेच्या ताब्यात असलेला हा बंगला न विकता त्याचे रूपांतर डॉ. होमी भाभा यांच्या स्मारकरूपी संग्रहालयात करण्यात यावे, अशी भावनिक मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली.
देशाचा प्रत्येक क्षेत्रात उत्तम विकास व्हायला हवा, हे पं. नेहरूंचे स्वप्न होते. त्याचे मर्म ओळखून डॉ. होमी भाभा यांनी देशाच्या पंखांमध्ये अणुऊर्जेच्या क्षेत्रात स्वबळावर भरारी मारण्याचे सामर्थ्य प्राप्त करून दिले. हे ऐतिहासिक कार्य लक्षात घेऊनही डॉ. होमी भाभा यांच्या बंगल्याचे रूपांतर त्यांच्या स्मारकरूपी संग्रहालयात करण्याची झालेली मागणी ही भावनात्मक स्वरूपाची होती, असेच म्हणावे लागेल. आपल्या देशात महनीय व्यक्तींची स्मारके उदंड जाहली अशी स्थिती आहे. एखादा पुतळा किंवा स्मारक उभारणीपर्यंत कधी पुरेसा वा अपुरा निधीही जमविला जातो. मात्र, या स्मारकाची भविष्यात जी देखभाल करावी लागते त्यासाठी लागणा-या पैशांची तरतूद फारशी कधीच केली जात नाहीत. त्यामुळे महनीय व्यक्तींची स्मारके एकतर कमी निधीअभावी रखडतात किंवा ती पूर्ण झाल्यानंतर अपु-या निधीअभावी देखभालीत हेळसांड होऊन स्मारकांची दुर्दशा होते. अशी स्मारके सरतेशेवटी देखभालीसाठी सरकारच्या गळ्यात मारली जातात किंवा ती स्मारके सरकारलाच उभारावी लागतात. मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्र हे डॉ. होमी भाभा यांच्या महान कार्याचे फलित आहे. त्यासारखे प्रेरणास्थळ असताना भाभा यांचे स्मारक उभारण्याची गरज नाही. पाकिस्तानचे जनक महंमद अली जिना यांच्या मलबार हिल येथील जिना हाऊस ताब्यात घेण्यावरूनही असाच वाद काही वर्षांपूर्वी रंगला होता. हे सारे पाहता मलबार हिल ही ‘स्मृतिस्थळांची टेकडी’ म्हणून प्रसिद्ध पावण्यापासून सध्या तरी वाचली आहे!