आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Gudhipadava By Mukul Kanitkar, Divya Marathi, Scientific

गुढीपाडवा आणि वैज्ञानिक कालगणना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वाधिक विज्ञाननिष्ठ कालगणनेचे नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडवा. वर्षप्रतिपदा, नवसंवत्सर, संवत्सरी या नावांनीही हे भारतीय नवीन वर्ष साजरे करण्यात येते. युगाचा आदी अर्थात युगाचा प्रारंभ दिवस म्हणूनही युगादी किंवा उगादी म्हटले जाते. याच दिवशी ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली. सृजनाला सुरुवात झाली अन् वेळेलाही प्रारंभ झाला.


ही खूपच विज्ञाननिष्ठ संकल्पना आहे. कृष्णविवर (ब्लॅक होल) आणि भस्म तारकाच्या (सुपर नोवा) संशोधनातून आधुनिक खगोलशास्त्रज्ञांना आढळले की, तेथे वेळ थांबतो. वेळेचे हे आश्चर्यजनक वर्तन आधुनिक शास्त्रज्ञांसाठी एक कोडे बनून राहिले आहे. आज जे तारे आपण पाहतो ते आपल्यापासून अनेक प्रकाशवर्षे दूर आहेत. याचाच अर्थ असा की, त्या ता-यांचा जो प्रकाश आज आपण पाहतोय तो कितीतरी वर्षे आधी तेथून निघालेला होता. या दृष्टीने पाहिले तर काळाची संकल्पना समजून घेणे शास्त्रज्ञांसाठी आणखीनच किचकट बाब आहे. एकांतिक धर्मीय विचारधारेनुसार काळाची संकल्पना एकरेषीय आहे. म्हणजे अमुक हजार वर्षांपूर्वी काळाला सुरुवात झाली आणि अमुक वर्षांनी कयामतचा दिवस येणार. त्यानंतर विश्व नाश पावणार वगैरे... काळ हा भूतातून भविष्याकडे एका दिशेने प्रवाहित होतो, अशी धारणा ठेवून विचार करणा-यांना काळाचे बहुआयामी रूप समजणे शक्य नाही. हिंदू ऋषींनीच काळाला समग्रपणे समजून घेतले होते. काळ हा एकरेषीय नसून, चक्रीय असल्याचे आणि काळ हा अनादी, अनंत असल्याचे भारतीय मुनींना उमजले होते. त्यामुळेच त्यांनी चार युगांचे शास्त्रीय विवेचन केले होते.


आज आधुनिक भौतिक विज्ञान ज्या गोष्टी प्रयोगांतून समजून घेण्याच्या प्रयत्नात आहे, त्या गोष्टी भारतीयांनी अनुभवातून जाणल्या होत्या. काळाचे हे अनादी, अनंत रूप समजून घेऊनच काळाची अनुरूप जीवनशैली विकसित करण्यात आली. म्हणूनच हजारो वर्षांच्या परकीय आक्रमणानंतरही ही संस्कृती जिवंत आहे. संपूर्ण जगाला विश्वबंधुत्वाचा संदेश देत आहे. आजही आपल्या मंदिरांमध्ये दररोज 192 कोटी वर्षांच्या कालगणनेचे स्मरण केले जाते. सतयुगापासून कलियुग आणि पुन्हा सत्ययुग हे नैसर्गिक कालचक्र व्यवस्थित समजून घेतल्याने हिंदू जीवनाला धर्माच्या आधारे जगण्याची दिशा प्राप्त झाली. महाकालाच्या पूजनानेच येथे धर्मविज्ञान विकसित झाले. यातूनच समग्र आणि सर्वांगीण विकासाचे उदाहरण (मॉडेल) भारतात विकसित झाले.


काळासंबंधी आपण कसा विचार करतो त्याचा आपल्या जीवनशैलीवरही परिणाम होतो. आज सारे विश्व पर्यावरणाच्या समस्यांनी ग्रासले गेले आहे. आपण जर या समस्येच्या मुळाशी जाऊन पाहिले तर असे दिसून येईल की, याची मूळ कारणे पाश्चिमात्य विचारांत आहेत. ती मंडळी काळाला एकरेषीय समजतात. त्यामुळे जीवन केवळ मर्यादित वेळेपर्यंतच मानले जाते. यामुळे जेवढे अधिक भोगता येईल तेवढे भोगण्याची वृत्ती निर्माण होते. परिणामी सृष्टीचे शोषण होते. केवळ सशक्तालाच जिवंत राहण्याचा अधिकार (सर्व्हायव्हल आॅफ दि फिटेस्ट) हा विचारही काळासंबंधी असलेल्या अशास्त्रीय विचारधारेतूनच आलेला आहे. याचा परिणाम जीवन जगण्याच्या पद्धतीवर झाला. स्पर्धात्मक भोगवादामुळे सारे विश्व आज विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहे. केवळ विज्ञानच नाही तर अर्थशास्त्र, राजकारण, उपासना, सामाजिक व्यवहार या सा-यावर या विचारधारेचा परिणाम झाला. मानवताच संकुचित झाली.
नववर्ष साजरे करण्याच्या पद्धतीतही आपल्याला हा फरक जाणवू शकतो. पाश्चिमात्य सभ्यतेत नववर्ष साजरा करण्यात अधिकांश भोगवादी विचार असतो. नशेला आनंद मानण्यात येतो. यामुळे रात्रीच्या वेळी जल्लोष करण्यात येतो. दुस-या बाजूस भारतीय नववर्ष आपण सकाळच्या पवित्र वातावरणात अत्यंत शालीनतेने साजरे करतो. हा विचारधारेतला फरक आहे. धार्मिक अनुष्ठान, परस्पर प्रेमाच्या अभिव्यक्तीसाठी कलात्मक अनुरंजन, सृष्टीचे स्वागत, आरोग्यवर्धक पदार्थ अशा वैज्ञानिक परंपरा या पर्वासाठी भारतात निर्माण झाल्या. ऋतुपरिवर्तन ध्यानात घेऊन कर्मकांड विकसित झाले. भोगाला नव्हे तर त्यागाला आनंदाचे स्थायी माध्यम बनवण्यात आले. काळाच्या वैज्ञानिक आकलनामुळेच आपण वर्षप्रतिपदेला वर्षभरातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानतो. हा पूर्ण मुहूर्त आहे. या दिवशी शुभकार्यासाठी वेगळ्याने मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते. संपूर्ण सृष्टीच आपल्या शुभसंकल्पाला साथ देण्यासाठी सज्ज असते. प्राणप्रवाह असा काही असतो की, जे मनात शिवसंकल्प कराल ते अवश्य पूर्ण होईल.


स्वदेशाभिमानाच्या कमतरतेमुळेच आपण या पूर्णपणे शास्त्रीय असलेल्या कालगणनेला सोडून अपूर्ण, अशास्त्रीय आणि शोषणाला प्रोत्साहन देणा-या व्यवस्थेच्या अधीन गेलो. त्यामुळे आपल्या संस्कृतीत घुसलेल्या कालबाह्य गोष्टी दूर सारून, सण-परंपरांना कालसुसंगत गोष्टींची जोड दिली पाहिजे. लाखो वर्षांच्या या परंपरेनेच आपल्याला जिवंत ठेवले आहे. समृद्ध विचारधारा विकसित झाली आहे. आपण आपल्या संस्कृतीचे, धर्माचे रक्षण करू तर संस्कृतीही आपले रक्षण करेल, हे निश्चित.