आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवेदनशीलतेची फुंकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अवर्षण, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट अशा कुठल्या ना कुठल्या नैसर्गिक आपत्तीत भरडून निघणा-या शेतक-याला एरवी या अस्मानीबरोबरच सुलतानीचाही सामना करावा लागतो असा सर्वसाधारण अनुभव आहे. मात्र, नाशिक आणि परिसरात नुकत्याच झालेल्या गारपीटग्रस्त भागाचा दौरा तत्परतेने करतानाच शेतक-यांना आश्वस्त करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कृती म्हणजे वेदनेवरची हळुवार फुंकरच म्हटली पाहिजे. अशा प्रसंगी झालेल्या प्रचंड नुकसानीच्या तुलनेत सरकारी मदत कधीच पुरेशी असू शकत नाही. तरी मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने नुकसानग्रस्त शेतक-यांना दिलासा दिला तो नक्कीच मोलाचा आहे. दुष्काळ अथवा पाणीटंचाई या समस्या तशा आपल्याकडे आता अंगवळणी पडल्या आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून तुफानी गारपीट ही नवीच समस्या शेतक-यांसमोर आ वासून उभी ठाकली आहे. तसे पाहता, नाशिक हा शेतसंपन्न जिल्हा. कांद्याचे आगर असलेल्या या जिल्ह्यात भाजी पाल्याचीही मोठी रेलचेल. त्याशिवाय द्राक्षं, डाळिंबासारखी फळ पिकेदेखील परिसरात विपुलतेने घेतली जातात. या दोन्ही नगदी पिकांसाठी तुलनेने बराच खर्च येतो. द्राक्षासारख्या नाजूक व नखरेल पिकाची काळजी तर अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे घ्यावी लागते. तशात आता जवळपास ही सारी पिके काढणीला आली असतानाच्या हंगामातच गारपिट झाल्याने नुकसानीचा पाया चांगलाच रुंदावला आहे. दोन दिवस झालेल्या गारपिटीत जवळपास ३५ ते ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हातातोंडाशी आलेला घास अशापद्धतीने डोळ्यादेखत मातीत गेल्याने आर्थिक आणि मानसिकदृष्ट्याही शेतकरी पार कोलमडून गेला आहे.
अशा परिस्थितीत सर्वाधिक गरज असते ती चार धीराचे शब्द बोलून मानसिक आधार देण्याची. नेमकी हीच बाब हेरून मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या धांदलीतही नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला आणि वीज बिल तसेच कर्ज वसुलीसाठी आता तगादा लावला जाणार नाही असे सांगत शेतक-यांना दिलासा दिला. त्याचप्रमाणे सरकारी पातळीवरून सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देखील दिली. मुख्यमंत्र्यांनी या कृतीतून सरकारच्या संवेदनशीलतेचा प्रत्यय देताना टीकाकारांची तोंडेही परस्पर बंद करून टाकली आहेत.