आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Health By Ashok Zunzunwala, Divya Marathi

कर्करोग, अल्सर, यकृत आजाराची ती सुरुवात?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पृथ्वीच्या अस्तित्वापासूनच अन्न मिळविण्यासाठी जगणे आणि जगण्यासाठी अन्न मिळविणे ही प्रक्रिया मानवासाठी अविरत चालू आहे. अन्न हे निसर्गात सर्वत्र मिळते, ते फळे, मुळे, कंद इत्यादी स्वरूपात असतात. आपण प्रत्येक पदार्थांची चव ही जिभेद्वारे घेत असतो. एकदा अन्न पोटात गेले की चरबी, प्रथीने कर्बोदके यामध्ये त्याचे रूपांतर होते. यातील हवे असेल तेच शरीर स्वत:साठी ठेवून घेते व उर्वरित निरुपयोगी मल शौचावाटे शरीराबाहेर टाकला जातो.

अन्न पचनाचे काम हे अन्न खाण्यापूर्वीच चालू होते. आपल्या आवडीच्या पदार्थाने तोंडाला पाणी सुटते. अन्न पाहून किंवा अन्नाच्या सुगंधानेच हे होते. त्यामुळे तोंडामध्ये लाळयुक्त पदार्थ तयार होतो आणि हिच लाळ पचनासाठी मदत करते. त्याबाबत सविस्तर पुढे बघू.

अन्ननलिका : तोंडात घातलेला घास चावल्यानंतर तो जलदगतीने जठरामध्ये पोहोचवण्याचे कार्य हे अन्ननलिका करते. हे कार्य इतके सफाईदारपणे होत असते की अन्न श्वासनलिकेत न जाता सरळ अन्ननलिकेतून जठरामध्ये जाते. अन्ननलिकेचा आतील थर हा विविध पेशीपासून बनलेला असतो. त्यामुळे उष्ण, अतिथंड किंवा आम्लता सहन करण्याची ताकत असते.

जठर : अन्न काही कालावधीसाठी पोटात साठवून त्यावर प्रक्रिया करण्याचे कार्य हे जठरामध्ये होते. जठरामध्ये हायड्रोलिक आम्ल, पेटसीन व म्युकल यांचा स्राव होतो अन्नावाटे शरीरात जाणार्‍या अनेक जंतूपासून या स्रावामुळे संरक्षण मिळते. अन्नाद्वारे जठरामध्ये गेलेल्या प्रथिनांचे पचन येथेच सुरू होते. येथूनच हे अन्न पुढे लहान आतड्यात जाते.

लहान आतडी : या आतडीची लांबी 15 ते 18 फूट असते. याची विभागणी साधारणत: तीन भागांत होते. डिओडिनम, जेजुनम व इलेएम. जठरातील अन्न डिओडिनममध्ये आल्यानंतर तेथे त्यात यकृताकडून आलेल्या पित्त व स्वादुपिंडातील स्वादुरस मिसळतो. स्वादुरसातील ट्रिप्सीन व केमोट्रिप्सीन ही रसायने प्रथिनांवर प्रक्रिया करतात. त्याचे अमायनो अ‍ॅसिडमध्ये रूपांतर करतात. तर अमायलेस (स्वादूपिंडातील पाचक रस) कर्बोदकांवर प्रक्रिया करून त्याचे वेगवेगळ्या साखरेमध्ये रूपांतर करतात. पित्त हे अन्नातील चरबी प्रक्रिया करतात. जेणेकरून पचनास मदत होते.

अन्न गिळण्यास त्रास होणे : वय वाढल्यामुळे किंवा अन्ननलिकेतील जंतूसंसर्ग, कॅन्सरची गाठ तयार झाल्यामुळे अन्न गिळण्यास त्रास होतो. जठराचा काही भाग जर श्वासपटलाच्या वर ढकलला गेला तर त्याला हायरसहर्निया म्हणतात. यामध्ये जठरातील अ‍ॅसिड अन्ननलिकेत गेल्याने अन्ननलिकेच्या शेवटच्या भागाला जखमा होऊन अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. यामध्ये एन्डोस्कोपी(तोंडातून दुर्बीण टाकून तपासणी) करून निदान करणे अवश्यक असते.

आम्लपित्त : आज घराघरांमध्ये या आजाराचे रुग्ण बघावयास मिळतात. पोटात किंवा छातीत जळजळ होणे, करपट ढेकर येणे, अन्न किंवा आंबटपाणी घशामध्ये येणे, आंबट कडू उलटी होणे, अशी लक्षणे दिसल्यास आपण अ‍ॅसिडिटी वाढली असे सहज बोलून जातो. असा त्रास नेहमी चालू असल्यास पोटामध्ये अल्सर होऊ शकतो. अल्सर हा आधुनिक जीवन पद्धतीतील hurry, worry, curry या तीन शब्दांनी दिलेली देणगी आहे. आजच्या या धकाधकीच्या जीवनात अ‍ॅसिडिटीचा त्रास न झालेली व्यक्ती अगदी दुर्मिळच म्हणावी लागेल. यामध्येसुद्धा निदान करण्यासाठी एन्डोस्कोपी करणे खूप महत्त्वाचे असते. त्यानंतरच योग्य निदान होऊन उपचार सोपा जातो. यामध्ये घरच्या घरी औषधोपचार करणे धोक्याचे होऊ शकते. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे असते.

मळमळ, उलट्या होणे : मळमळ, उलट्या होणे, हे फक्त पचनक्रियेत बिघाड असल्यामुळेच होऊ शकते, हे चुकीचे आहे. ताप माईग्रेन, मधुमेह, हृदयरोग, मेंदूतील गाठ, मूत्रविकार व गर्भधारणेतसुद्धा होऊ शकते. आपण पचन संस्थेचाच विचार केला तर अ‍ॅसिडिटी, पित्ताशयाचे विकार, अल्सर, कर्करोग, कावीळ हिपॅटायटीस व इतर काही आजारामध्ये मळमळ उलटी होते. फक्त मळमळ किंवा उलटी होणे प्रथमदर्शनी जरी साधे व सोपे वाटत असतील, परंतु तसे नसते. काही घातक आजारांची ती सुरुवात असू शकते. म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नये. ती कर्करोग, अल्सर किंवा यकृताच्या आजाराची सुरुवात असू शकते. अशा प्रकारच्या आजारात लवकर निदान होणे खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी एन्डोस्कोपी व सोनोग्राफी तसेच काही रक्ताच्या तपासण्या करणे गरजेचे असते. त्यानंतरच योग्य निदान होऊन उपचार सोपा होतो.

हायटस हर्निया : हायटस हर्नियामुळे अन्न घशामध्ये येणे, उलट्या होणे, अशा तक्रारी असतात. जठरातील अन्न व आम्ल नेहमी वर आल्याने अन्ननलिकेच्या आतील स्थराला जखमा होतात. सूज येणे, कधी कधी घशासी आलेले अन्न श्वासनलिकेत गेल्यामुळे अनेकदा रुग्णांना खोकला येतो. दम लागल्यासारखे होते. परंतु यामध्ये चुकीच्या निदानामुळे रुग्णावर दम्याचा रुग्ण म्हणून औषधोपचार केला जातो. म्हणूनच या आजारात एन्डास्कोपी करणे खूप महत्त्वाचे असते. यामुळे लवकरात लवकर निदान होऊन योग्य तो उपचार सुरू करता येतो.

रक्ताच्या उलट्या होणे : जठरामध्ये झालेल्या अल्सरमुळे किंवा अन्ननलिकेत, जठरामध्ये झालेल्या कर्करोगाच्या गाठीमुळे रक्ताच्या उलट्या होऊ शकतात. यामध्ये रक्तस्राव हळूहळू होत असेल तर या रुग्णांना दम लागणे, पायावर सूज येणे. छातीमध्ये धडधड होणे तसेच अ‍ॅनिमियामुळेसुद्धा असा त्रास होऊ शकतो. अशा त्रासाबाबत निष्काळजीपणा चालत नाही. त्यासाठी एन्डोस्कोपी तपासणी करून अवश्यकतेनुसार त्यात असलेल्या गाठीचा छोटा तुकडा (biopsy) घेऊन तपासणीअंती योग्य निदान होते व उपचार सोपा होतो.

त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी पाळणे महत्त्वाचे असते. जसे आहारामध्ये तळलेले मसाल्याचे पदार्थ घेऊ नये. पाणी निर्जंतूक करूनच पिण्यासाठी वापरावे. दारू-तंबाखू, धूम्रपान आणि काही वेदनाशामक औषधी घेत असल्यास ताबडतोब बंद करावी.

मोठे आतडे (large intestine): लहान आड्यातून पचन झालेले पातळ स्वरूपाचे अन्न मोठ्या आतड्यात येते. येथे पाण्याचे शोषण होऊन मलाला घट्टपणा येऊ लागतो. जेणेकरून दिवसातून एक किंवा दोन वेळा शौचास होते.

जुलाब होणे : जुलाब होणे किंवा शौचास वारंवार जावे लागणे व शौच पातळ स्वरूपाची होणे, ही पचनसंस्थेसंदर्भात आढळणारी प्रमुख तक्रार आहे. दूषित पाणी व दूषित अन्न यातून जाणारे साल्मोनेला, शिगेला, स्ट्रेप्टोकेकाय, स्टिफेलोकोका इत्यादी जिवाणू, विविध विषाणू, वेगवेगळ्या कृमी (जंत) इन्फेकशन ही जुलाब होण्याची मुख्य कारणे आहेत. दुधाच्या पदार्थांमुळे होणारे अपचन, थॉयराइड किंवा मानसिक तणावामुळे पण जुलाब होऊ शकतात. यासाठी घरगुती औषधोपचार केव्हाही धोक्याचा असतो. कारण यामध्ये कधी कधी टिबी, कर्करोग किंवा जीवघेण्या एड्सची कारणे ही असू शकतो. यामध्ये रुग्णाची कोलोनोस्कोपी (colonoscopy)मोठ्या आतड्याची तपासणी करणे आवश्यक असते. त्यामुळे निदान होऊन उपचार करता येतो.

बद्धकोष्टता (constipation) : आजकाल खाण्याबाबत प्रत्येकाचे वेळापत्रक कोलमडलेले दिसते. उदा. जंक फूड खाणे, मांसाहार अतिप्रमाणात करणे, शौचास वेळेवर न जाणे यामुळे बद्धकोष्टता सुरू होते. तसेच पोटदुखीवरील काही औषधी सेवनानेसुद्धा हा त्रास होतो. तसेच मोठया आतड्याचा कर्करोग अथवा मानसिक आजारात पण बद्धकोष्टतेचे परिणाम दिसतात. यासाठीसुद्धा कोलोनोस्कोपीची तपासणी फायद्याची ठरते. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणेसुद्धा महत्त्वाचे असते.

पोटदुखी : ही तक्रार अगदी नेहमीचीच आहे, थोडक्यात माहिती अवघड आहे, तरीही थोडक्यात पाहू. पोटदुखी तीव्र स्वरूपाची असली तरी पोटाचा विकार तीव्र स्वरुरूााचा असतो. उदा. अपेंडीसायटीस, पित्ताशयात खडे असणे, आतड्याला छिद्र पडणे, इत्यादी यामध्ये शस्त्रक्रिया हाच एकमेव पर्याय असतो. काही तपासण्याअंती यांचे निदान होते.

पोटदुखी ही जेंव्हा मध्यम स्वरूपाची असते. आणि हळूहळू वाढत असेल व त्याचबरोबर वजन कमी होणे, भूक मंदावणे, शौचाच्या वेळा बदलणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, असे असेल तर ती कर्क रोगाची, टी.बीच्या आजाराची सुरुवात असू शकते. म्हणूनच अशा आजारात नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन विविध तपासण्या करून उपचार करणे फायद्याचे ठरते.