आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेज फंड : श्रीमंतांचा म्युच्युअल फंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेज फंड पुढील उदाहरणावरून समजून घेऊया. गेली कित्येक वर्षे दुबईत काम करत असलेले जिग्नेशभाई पटेल नुकतेच भारतात आले. त्यांनी दहा कोटींची बचत केली. आपल्या पैशांचा आकर्षक परतावा मिळावा, अशी त्यांची इच्छा होती. बचतीतील ४ कोटींची गुंतवणूक करून उर्वरित रकमेतून सुरतमध्ये एक कारखाना सुरू करावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यांचे मित्र योगेश दवे यांनी त्यांना हेज फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. िजग्नेशभाईंनी म्युच्युअल फंडाविषयी ऐकले होते; पण त्यात गुंतवणूक करण्यास ते इच्छुक नव्हते. म्युच्युअल फंडात गुंतवलेल्या पैशातून तुम्हाला नफ्यातून काही कमिशन द्यावे लागते. अनेकदा शेअर बाजार कोसळल्यावर परताव्यात घट येते. यावर योगेश यांनी, हेज फंडही काहीसा असाच असल्याचे सांगितले, पण यात श्रीमंत व्यक्तीच गुंतवणूक करू शकतात. यात जोखीम अधिक असली तरी परतावाही घसघशीत आहे. यातील ट्रेडिंगच्या पद्धती म्युच्युअल फंडापेक्षा वेगळ्या आहेत. शेअर बाजार कोसळत असला तरी त्यातून पैसा उभारून हेज फंड तुम्हाला परतावा देऊ शकतो.
अर्थ आणि इतिहास
हेज हा इंग्रजी शब्द आहे. याचा अर्थ मैदानात रांगेत झाडे लावणे असा होतो. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या जोखमीपासून वाचण्यासाठी सीमा आखून घ्यावी. पूर्वोत्तर देशातील बाजारात साधारणत: होणा-या तेजी-मंदीच्या तडाख्यातून आपले पैसे सुरक्षित राहण्यासाठी हेज फंडचा वापर होतो. याचमुळे याला हेज फंड म्हटले जाते. १९२० मध्ये अमेरिका शेअर बाजारात तेजी होती. श्रीमंतांना गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध होते. ग्राहम न्यूमॅन पार्टनरशिप हे त्या वेळचे एक नाव आजही लक्षात आहे. बेंजामिन ग्राहम आणि जेरी न्यूमॅन यांनी त्याची स्थापना केली होती. २००६ मध्ये म्युझियम आॅफ अमेरिकन फायनान्सला लिहिलेल्या एका पत्रात वाॅरेन बफे यांनीही याचा उल्लेख केला होता. समाजवादी आल्फ्रेड डब्ल्यू. जोन्स यांनी सर्वप्रथम हेज्ड फंड शब्दाचा वापर केला होता. पहिला हेज फंड १९४९ मध्ये स्थापन करण्यात आला. त्यावर बरेच वादंगही झाले होते.
हेज फंडची कार्यपद्धती
वर उल्लेख केलेल्या उदाहरणावरून जिग्नेशभाई पटेल एका कंपनीचे शेअर १०० रुपयांत खरेदी करतात असे समजू या. कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत नेहमीच तेजी-मंदी येत राहते हे आपल्याला माहीतच आहे. एकतर महिनाभरात १५० रुपयांचा भाव मिळेल, नाही तर एकदम अर्ध्यावर म्हणजे ५० रुपयांवर येतील. जितका जास्त परतावा तितकी जास्त जोखीम, ही बाजाराची मानसिकता आहे. पण जिग्नेशभाई अधिक जोखीम घेऊ इच्छित नाहीत. त्यासाठी ते एक करार करतात. त्यानुसार १०० रुपयांत घेतलेला शेअर महिनाभरानंतर निश्चित तारखेला ९५ रुपयांत विकायचा. त्यासाठी ते २ रुपयांचा प्रीमियम देण्यासही तयार आहे. याला पूट आॅप्शन असे म्हणतात. ज्या तारखेचा शेअर विकायचा होता, त्या दिवशी त्याचे भाव १४० रुपये झाले. अशात करारात दिलेल्या ९५ रुपये किमतीत शेअर विक्री करणे त्यांना बंधनकारक नाही. ते आपला शेअर १४० रुपयांतच विकून ३८ रुपये नफा मिळवतील. जर शेअरची किंमत ५० रुपये असेल तर करारानुसार ते शेअर ९५ रुपयांत विकू शकतात. त्यात नुकसान झाले तरी पाच रुपयांचे होईल. अशा प्रकारे जिग्नेश यांनी आपला शेअर हेज्ड केला. त्यात त्यांनी पूट आॅप्शनचा उपयोग केला. याचमुळे कोणत्याही खात्यातील जोखीम कमी करता येऊ शकते, अशी हेजिंग ही पद्धती आहे. काही हेज फंड मॅनेजर्सना हर्डल रेटचे अनुपालन करायचे असते. हर्डल रेट मिळेपर्यंत गुंतवणूकदाराला पूर्ण नफा मिळू शकत नाही. बहुतांश हेज फंड २ आणि २० च्या नियमानुसार काम करतात. बाजारात वातावरण चांगले असो वा वाईट, गुंतवणुकीच्या दोन टक्के तर त्यांना मिळतेच. २० टक्के नफाही मिळतो.
हेज फंडाचे दोन प्रकार
अॅब्सोल्यूट रिटर्न फंड : अनेकदा याला नाॅन डिरेक्शनल फंडही म्हटले जाते. बाजार कोणत्या दिशेने जात आहे, यावर याचा काहीच फरक पडत नाही. एक ठरावीक परतावा तुम्हाला मिळत राहतो. याला प्युअर अल्फा फंडही म्हणतात. बाजाराचा परिणाम त्यावर होऊ नये म्हणून यात फंड मॅनेजर बाजारातील संपूर्ण जोखीम दूर करून फंड तयार करतो. मॅनेजर संपूर्ण जोखीम दूर करत असेल, तर फंडचे सादरीकरण मॅनेजरमुळे असते. म्हणून याला अकॅडमिक स्वरूपात अल्फा म्हटले जाते. यात जोखीम कमी असल्याने परंपरागत गुंतवणूकदारांसाठी हाच फंड योग्य आहे. गुंतवणूकदार काही रिटर्न एक्स्चेंजही द्यायला तयार असतो. हा फंडही म्युच्युअल फंडासारखाच असतो असे काही लोकांचे म्हणणे आहे. यात परतावा ८ ते १० टक्क्यांच्या जवळपास राहतो.
डिरेक्शनल फंड : पूर्णपणे नसले तरी हेही हेज फंड असतात. अपेक्षेपेक्षा अधिक परतावा मिळवण्याच्या प्रयत्नात याचे फंड मॅनेजर बाजारात काही खरेदी करतात. यात काही पैसा शेअर बाजारात गुंतवला जातो, हे यामागचे कारण आहे. यात परतावा स्थिर राहात नाही. याला बिटा फंडही म्हटले जाते. वास्तविक, अनेकदा हा फंड अॅब्साेल्यूट रिटर्न फंडापेक्षा अधिक परतावा देतो. एक वर्ष खूप परतावा दिला आणि दुस-या वर्षी संपले, असेही यात होते.
भारतात हेज फंड्स
सध्या भारतात कार्वी कॅपिटल, मोतीलाल ओसवाल, आयआयएफएल आणि एडिविलिस आदी १५ फंड सेबीमध्ये पंजीकृत आहेत. केवळ मोठे गुंतवणूकदार, ज्यांना एचएन १ मानले जाते, तेच यात येऊ शकतात. यात प्रविष्ट होण्यासाठी कमीत कमी १ कोटी रुपये गुंतवणूक करावयास हवी, असा नियमच सेबीने तयार केला आहे.
लेख‍िका या इन्स्टिस्ट्यूट आॅफ इनोव्हेशन इन टेक अँड मॅनेजमेंट, नवी दिल्ली येथे सहयोगी प्राध्यापिका आहेत.