आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Inactive Government And Sports By V.V.Karmarkar

क्रीडा- मागासलेपण : व्यथा की भांडवल?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रीय क्रीडा-रसिकवर्गाचे मन आज कोणत्या गोष्टीत रमते? त्याला कोणत्या गोष्टी जिव्हाळ्याच्या वाटतात? कोणत्या गोष्टींवर हिरीरीने, तावातावाने बोलावेसे वाटते? कोणत्या गोष्टी त्याला सुखदु:ख देतात?
पूर्वीइतक्या तीव्रतेने नव्हे, तरी कैक पिढ्यांनी जोपासलेल्या आत्मीयतेच्या सवयीतून आजही मराठी मन क्रिकेटमध्ये काहीसे रमते, पण आता आनंदाचा उन्माद किंवा दारुण वैफल्य अशा पराकोटीच्या भावनांतून, ते तूर्त तरी क्रिकेटमुक्त झालं आहे. दर चार वर्षांतून एकेक पंधरवडा मराठी मनाला एशियाड व ऑलिंपिक स्पर्शून जातं. मागासलेपणाच्या जाणिवांचे चटके रेखून जातं. मग येते पलायनवादी बधिरता, गुंगी व
अल्पसंतुष्टतेत सुख शोधण्याची जन्मजात सवय, मग बेशरमपणे सुरू होतो सुमार दर्जाचा कर्कश जयजयकार! वर्षातून अकरा महिने तीच गुंगी!
छत्रपती पुरस्काराचे, दादोजी कोंडदेव वा उत्कृष्ट मार्गदर्शकाचे व अन्य पुरस्कारांचे आणि धन्य धन्य ते जीवन गौरव पुरस्कारांचे मानकरी. त्या दोन हजार माननीय महोदयांच्या पलटणी...आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पंधरा-वीस कोटी रुपयांचे मानकरी ठरणारे पाचशेएक खेळाडू व त्यांचे कागदोपत्रीचे प्रशिक्षक.... याच गोष्टी बनतात, अल्पसंतुष्टांच्या क्रीडाविश्वाचे केंद्रबिंदू!
सुमार दर्जाच्या जयजयकारात, अल्पसंतुष्टतेत गुंगवून ठेवण्याचा खेळ, आझादीच्या ६७ वर्षांत अखंड खेळला गेला आहे. मागासलेपणाची कारणं असलेले मुद्दे, अमेरिका-युरोप-ऑस्ट्रेलिया-चीन-जपान-कोरिया-ब्राझील-क्युबा यांच्या स्पर्धेत कमअस्सल ठरण्याचे मुद्दे हे अजेंड्यावरच येऊ द्यायचे नाहीत आणि खुशाल भारत महासत्ता असल्याच्या दवंड्या पिटत राहायचे-अशा अफूच्या गुंगीच्या गोष्टी चघळत राहिलाय भारत अन् अर्थातच तुमचा-माझा महाराष्ट्र.
मागासलेपण कायमच?
साधी गोष्ट बघा : मराठवाडा, विदर्भ, कोकण, खान्देश या अविकसित महाराष्ट्राची व्होट बँक जोपासली, त्या भागातील, क्रीडा जगतातील पुढा-यांनी. आपल्या परिवारातील आप्तेष्टांना विविध शासकीय पुरस्कार, राज्य संघाचे प्रशिक्षक व व्यवस्थापन पद, राज्य संघटनांची पदाधिकारी पदे आणि निवड समिती सदस्य पदे यांची खिरापत वाटली; पण त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, कोकण यांचे मागासलेपण तसूभर तरी कमी झाले का? कबड्डीतील दत्ता पाथ्रीकर व किशोर पाटील आणि खो-खोतील चंद्रजित जाधव यांना हा सवाल! विकास केलात मागास भागातील मोजक्या व्यक्तींचाच ना?
कुंभकर्णाची झोप
हे मागासलेपण दूर करण्याची सुवर्णसंधी त्यांना मिळवून दिली होती, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक धोरण समितीने. २०१०च्या महाराष्ट्रदिनी तेव्हाचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळाने, या समितीच्या अहवालावर शिक्कामोर्तब केलं होतं. क्रीडा क्षेत्रातील अविकसित भागाच्या विकासाची योजना आखली जाईल व तिची तरतूद सरकार करील, असे त्यात स्पष्ट म्हटलेले होते! तो अहवाल वेबसाइटवर टाकला गेला, प्रसिद्ध झाला, त्यावर प्रसारमाध्यमातून पंधरवडाभर टीकाटिपण्णी झाली या गोष्टींना आता पावणेपाच वर्षे होत आहेत . दत्ता पाथ्रीकर, किशोर पाटील, चंद्रजित जाधव व इतर सा-या खेळांतील क्रीडा संघटक व पुढारी यांनी त्या अहवालाचा काय फायदा मागास समाजाला मिळवून दिला? बोलायला- सांगायला लाज-शरम वाटते की, असा हा अहवाल प्रसिद्ध झालाय, ही गोष्टच त्यांच्या ध्यानी नव्हती! तब्बल चार वर्षे या कुंभकर्णांना जाग आली नव्हती!
याबाबत मी या कुंभकर्णांना छेडलं, तेव्हा त्यांची शहामत बघा! त्यांनी मला प्रतिप्रश्न केला : ही गोष्ट तुम्ही आमच्याकडे याआधी का बोलला नाहीत ?
हे सारे पदवीधर व सुशिक्षित व सुस्थितीत. गाडी-घोडा, पैसा-अडका शेती, व्यवसाय उत्तम चाललेला. त्यांना प्रसारमाध्यमातील चर्चेची, वेबसाइटवरील अहवालाची काडीचीही माहिती नसावी, हेच खरे मागासलेल्या महाराष्ट्राचे मागासलेपण
आता तरी योजना आखा!
मागास महाराष्ट्रात क्रीडा स्पर्धा, क्रीडा शिबिरे घेण्याची योजना आखली जाणं गरजेचं. क्रिकेट, टेनिस, गोल्फ, बिलियर्ड््स आदी खेळ सोडून काही निवडक खेळ सजवण्याची, जोपासण्याची दीर्घकालीन योजना या कुंभकर्णांनी आखली पाहिजे. त्या भागातील काही जिल्ह्यांत, काही तालुक्यांत काही विशिष्ट खेळांचे संघ-संस्था-मंडळे कधी काळी थोडीफार प्रभावी होती. त्याचा आधार घेऊन तिथे नव्याने त्या त्या खेळांची बांधणी करता येईल.
राज्य सांस्कृतिक समितीच्या अहवालाने, कबड्डी-खो-खो-मल्लखांब आदी मराठमोळ्या खेळांचे नियमितपणे परदेशी प्रचार दौरे काढण्यास हिरवा कंदील २०१० मध्येच दाखवलेला आहे; पण त्याबाबत कबड्डी -खो-खो- मल्लखांब संघटनांतील कुंभकर्णांनी पावणेपाच वर्षांत कोणतीही हालचाल केलेली नाही. केवढी ही निष्क्रियता, केवढी गुंगी !
याबाबत या संघटकांशी बोलून-सुचवून झालं. सरकारी खर्चातून परदेशी प्रसार-प्रचार दौरे नियमित आखावेत; पण सर्वप्रथम काही निवडक देशांत (उदाहरणार्थ आठ टक्के भारतीय वस्ती असलेला मलेशिया, रमेश भोंडीगिरींसारख्या कबड्डी-प्रशिक्षकास गेली काही वर्षे नेमणारा थायलंड इ.) प्रथम दोन सदस्यांचे पाहणी पथक पाठवावे. त्या देशात प्रदर्शनीय सामने कुठल्या शहरात, कुठल्या खुल्या मैदानात होणार ते बघावे. आगाऊ व दौ-यात प्रसिद्धी, संघाची राहण्या-जेवण्याची आजमावून बघावी. त्यांच्या अहवालाच्या आधारे प्रचार दौ-याची आखणी करणं सोपं जाईल.
मल्लखांब हा कबड्डी-खो-खोपेक्षा असंघटित खेळ. जिम्नॅस्टिक्सच्या तुलनेत सोपा व कमी प्रेक्षणीय, त्याची प्रेक्षणीयता कशी वाढवावी, याचे प्रयोग प्रथम महाराष्ट्रात व्हावेत. त्यातून काही सुधारणा तज्ज्ञांनी सर्वसंमत केल्यास, सुधारित मल्लखांबाचे पथक प्रचार दौ-यावर जावे. ‘मनोरे’ उभारण्यासारख्या हास्यापद कसरती त्यात कटाक्षाने टाळल्या जाव्यात!
जिम्नॅस्टिक्सच्या तुलनेत मल्लखांब कमी प्रेक्षणीय कशामुळे? भीष्माचार्य मोरेश्वर गुर्जर यांची चिकित्सा अशी : “जिम्नॅस्टिक्स कसरतीतील सौंदर्य, जमिनीशी संबंध तोडून पूर्णपणे हवेत झोकून दिलेल्या शरीराच्या कसरतीत असते. मल्लखांबाची गोष्ट वेगळी. त्यात शरीराचा काही भाग सतत मल्लखांबास चिकटलेला असतो. त्यामुळे कसरतींवर खूपच मर्यादा पडते.” यावर उपाय काय? एकाऐवजी शेजारी-शेजारी दोन मल्लखांब पुरले तर? त्यांच्या उंचीत थोडे कमी-जास्त केले तर?
गुर्जर सर म्हणतात की, खेळाडूंना दुखापत होणार नाही, याची दक्षता घेऊन आधी काही प्रयोग करून बघूया. त्यातून काही तरी चांगलेच निष्पन्न होईल, असे प्रयोग करण्याची अपेक्षा समर्थ व्यायाम मंदिरचे उदय देशपांडे यांच्याकडून धरणेच चुकीचं; पण विश्वतेज मोहिते, दत्ताराम दुदम, महेंद्र चेंबूरकर पुढाकार घेऊ शकतील. सांताक्रूझमधील साने गुरुजी विद्यालयाचे शाहीर लीलाधर हेगडे यांनी अशा प्रयोगासाठी आपल्या शाळेतील सुविधा केव्हाच उपलब्ध करून दिल्या होत्या!

पाठपुरावाच झाला नाही!
सुमार दर्जाच्या जयजयकारातून महाराष्ट्राला प्रगत देशांच्या पंगतीत बसवण्यासाठी सरकारी अहवालाचा फायदा केव्हा समाजासाठी उठवला जाणार? नवनवे राज्यकर्ते व नवनवे विरोधी पक्ष यांची उदासीनता भयानक आहे; पण त्यापेक्षा भीषण आहे राज्यातील सर्वच खेळांच्या राज्य संघटनांची निष्क्रियता. या संघटनाच आज प्रगतीच्या मार्गातील अडथळा बनल्या आहेत. त्यांच्यात चैतन्य आणण्याचं काम माजी क्रीडामंत्री अजय माकन व नोकरशहा जिजी थॉमसन यांच्याप्रमाणे महाराष्ट्रात क्रीडामंत्री विनोद तावडे करतील का?