आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On India Afganistan Relation, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अफगाणिस्तानातील पेच संपुष्टात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरकार स्थापन करण्यावरून गेले चार महिने अफगाणिस्तानात सुरू असलेला राजकीय पेच रविवारी संपुष्टात आला. अफगाणिस्तानात निवडणुका होऊनही अध्यक्ष नेमण्यावरून अब्दुल्ला अब्दुल्ला व अशरफ घनी अहमदाजाई यांच्या गटांमध्ये संघर्ष सुरू होता. अब्दुल्ला हे ताजिक वंशाचे असून घनी हे पख्तुन आहेत. या दोघांनी एकमेकांवर अफगाणिस्तानच्या निवडणुकीत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे गेले चार महिने अफगाणिस्तानमध्ये सरकार अस्तित्वात नव्हते.
अखेर अमेरिकेच्या दबावामुळे या दोघांमध्ये अधिकारांच्या वाटपाबाबत करार झाला. या करारानुसार घनी हे अफगाणिस्तानच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील तर अब्दुल्ला सीईओ म्हणून कारभार पाहतील. हा पेच सुटावा म्हणून अमेरिका प्रयत्नशील होती. कारण अफगाणिस्तानमध्ये पुढील वर्षाअखेर आपले सुमारे १० हजार सैनिक तैनात राहावेत अशी अमेरिकेची इच्छा होती. हे सैन्य राहिल्यामुळे तालिबान बंडखोरांच्या कारवायांना आळा बसेल, अशी अमेरिकेची भूमिका होती. पण अमेरिकेच्या या दबावाला माजी अध्यक्ष करझाई यांचा जोरदार विरोध होता. भारतानेही हा पेच सुटावा म्हणून शर्थीचे प्रयत्न केले होते. काही दिवसांपूर्वी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अफगाणिस्तानचा दौरा केला होता. या दौ-यात त्यांनी अफगाणिस्तानमधील लोकशाही पुनर्रचना कार्यक्रमासाठी तेथील राजकीय मतभेद लवकर संपुष्टात यावेत, अशी भूमिका मांडली होती.
अफगाणिस्तानच्या पायाभूत संरचनेत भारत मोठ्या प्रमाणावर मदत करत असल्याने शांतता प्रस्थापित राहण्यासाठी भारताला अमेरिकेच्या फौजांची मदत हवी होती. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांत पाकिस्तानने वझिरीस्तानमध्ये सुमारे ४० हजार सैनिकांमार्फत तालिबान, हक्कानी व अल-कायदाच्या बंडखोरांना पिटाळून लावण्यास सुरुवात केली होती. या तीनही गटांना भारत व अमेरिकेचा अफगाणिस्तानातील राजकारणातील हस्तक्षेप नको आहे. पण सरकार अस्तित्वात नसल्याने अफगाणिस्तानमध्ये आर्थिक प्रश्न अधिक उग्र झाले होते. महागाईने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले होते व परकीय गुंतवणूक रोडावल्याने देशाचा आर्थिक विकासदरही खालावत चालला होता. हा पेच सुटल्याचा भारताला अधिक फायदा आहे.