आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On India Japan Relation By Dr.Shailendra Deolankar

जपानशी सामरिक युती उपकारक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त या वर्षी जपानचे पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. जपानच्या पंतप्रधानांची प्रजासत्ताक दिनानिमित्तची उपस्थिती भारत व जपान यांच्यातील संबंधाचे बदलते संदर्भ प्रतिबिंबित करणारी होती. गेल्या एक दशकात भारत व जपान यांच्यातील आर्थिक व सामरिक पातळीवरील संबंध घनिष्ठ होत आहेत. त्यांच्यातील वाढत्या भागीदारीला आशिया खंडातील उगवत्या सत्ता संतुलनाच्या राजकारणाची पार्श्वभूमी आहे. गेल्या एक दशकापासून चीनची वाढती आक्रमकता आणि विस्तारवाद अनेक राष्‍ट्रांना असुरक्षित बनवणारा आहे. भारत व जपान त्यापैकीच आहेत. चीनचा संरक्षणावरचा खर्च वाढण्याबरोबरच सीमावादाच्या प्रश्नावरून चीनने आक्रमक धोरण स्वीकारत अनेक राष्‍ट्रांना धमकावले आहे. सेनकाकू बेटावरून चीन आणि जपानमधील संबंध अतिशय तणावपूर्ण बनले आहेत.
दक्षिणपूर्व आशिया व उत्तरपूर्व आशियातील अनेक राष्‍ट्रे चीनच्या वाढत्या आक्रमकतेला आणि विस्तारवादाला आळा घालण्यासाठी अमेरिकेच्या सक्रिय हस्तक्षेपाची मागणी करीत आहेत. भारत व जपान यांच्यातील गेल्या एक दशकात घनिष्ठ होणा-या संबंधांना आशिया खंडातील सत्ता समतोलाच्या या बदलत्या समीकरणांची पार्श्वभूमी आहे. चीनच्या वाढत्या संरक्षण खर्चामुळे, चीनकडून विकसित केल्या जाणा-या मध्यम व दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांमुळे भारत व जपानची असुरक्षितता वाढली आहे. चीनच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी एक नवीन युती पूर्व आशियामध्ये आकाराला येते आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली विकसित होणा-या या युतीमध्ये जपान, दक्षिण कोरिया, फिलिपाइन्स, इंडोनेशिया, व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. या युतीचा मुख्य उद्देश हा चीनच्या विस्तारवादाचे व्यवस्थापन करण्याचा आहे. ही सर्व राष्‍ट्रे कोणत्या न कोणत्या पद्धतीने चीनकडून दुखावली गेली आहेत. भारतदेखील या युतीचा भाग बनावा, अशी अमेरिका आणि जपानची इच्छा आहे. चीन हा भारताचा मोठा शेजारी देश असून सीमावादाच्या प्रश्नामुळे उभय देशांचे संबंध सातत्याने तणावपूर्ण आहेत.
चीनच्या आव्हानाचा सामना एकट्याने करणे भारतासाठी अवघड आहे. त्यासाठी भारताला अमेरिकेसारख्या राष्‍ट्राची मदत आवश्यक आहे. गेल्या एक दशकापासून भारत व अमेरिका यांच्यातील संबंध एकीकडे दृढ होत आहेत, तर दुसरीकडे भारत व जपान यांच्यातही नवीन भागीदारी विकसित होते आहे. याचा परिणाम म्हणून भारत, अमेरिका व जपान यांची एक नवीन युती आकाराला येते आहे. अशी युती या तिन्ही राष्‍ट्रांसाठी उपकारक आहे. भविष्यात ही युती घनिष्ठ होण्यासाठी या तिन्ही राष्‍ट्रांकडून प्रयत्न चालू आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणूनच काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान मनमोहनसिंग जपानच्या भेटीवर जाऊन आले. जपानचे पंतप्रधान अ‍ॅबे यांची भारत भेट हादेखील या प्रयत्नांचाच एक भाग होती. अमेरिकेने 2012 मध्ये आपले नवीन आशिया धोरण घोषित केले. त्यानुसार अमेरिकेचा भविष्यातील भर हा पश्चिम आशियापेक्षा पूर्व आशियावर अधिक आहे. अमेरिका आपल्या एकूण नौदल सामर्थ्यापैकी 20% फौजफाटा पूर्व आशियात ठेवणारा आहे. या धोरणाचा एक भाग म्हणूनच अमेरिका भारत व जपान बरोबर एक सामरिक युती विकसित करण्याच्या प्रयत्नात आहेत. भारत, अमेरिका व जपानने मिळून अनेक संयुक्त संरक्षण कवायतींचे आयोजन केले आहे. या कवायतींमागचा मुख्य उद्देश हादेखील दक्षिण व उत्तर पूर्व चीन समुद्रात चीनच्या नौदल हस्तक्षेपाचे प्रतिरोधन करणे हा आहे. भारतात मूलभूत साधनसंपत्तीच्या विकासात जपान मोठी आर्थिक गुंतवणूक करत आहे. भारत व जपानमधील व्यापारदेखील गेल्या एक दशकात अनेक पटींनी वाढला आहे.
दिल्ली-मुंबई औद्योगिक परिक्षेत्र विकासात, तसेच चेन्नई-बंगलोर जलदगती रेल्वे विकास प्रकल्पात जपानने 92 अब्ज अमेरिकन डॉलर्स गुंतवण्याची तयारी दर्शवली आहे. 2001 नंतर जपानकडून भारताला मिळणारी आर्थिक मदत प्रचंड वाढली आहे. चीनच्या आव्हानाचा सामना करण्याबरोबरच तेल वाहतूक करणा-या महत्त्वाच्या सागरी मार्गाचे संरक्षण करणे, हादेखील भारत-जपान मैत्रीचा महत्त्वाचा उद्देश आहे. या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था तेलाच्या आयातीवर अवलंबून आहेत. 1998 मध्ये भारताने अणुपरीक्षण केल्यानंतर व स्वत:ला अण्वस्त्रधारी राष्‍ट्र म्हणून घोषित केल्यानंतर भारत व जपान यांच्यातील संबंध दुरावले होते. जपानने भारतावर आर्थिक बहिष्कार टाकला होता. तथापि पुढे जसे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध सुधारत गेले, तसा जपानचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. भारत व अमेरिका यांच्यात नागरी अणुकरार झाल्यानंतर जपानने भारताला अणुइंधन पुरवण्याचेदेखील मान्य केले. भारत व जपान यांच्यातील भविष्यातील संबंधांचे भवितव्य भारताकडून जपानला कसा प्रतिसाद दिला जातो, यावर अवलंबून आहे.
kdeolankar@gmail.com