आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Indian Cricket Team By Vinayak Dalvi, Divya Marathi

गावसकरांच्या कानपिचक्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंड, ऑस्‍ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंडपाठोपाठ आता भारतीय संघ आशिया खंडातील खेळपट्ट्यांवरही पराभूत व्हायला लागला आहे. कालपरवा भारतीय संघांचे बांगलादेशातील आशिया कप क्रिकेट स्पर्धेतही पानिपत झाले. भारतीय संघ भारतातील खेळपट्ट्यांवरच वाघ असतो. परदेशात अन् आता तर बांगलादेशातही या वाघाची शेळी झाली. याचे प्रमुख कारण म्हणजे भारतात परदेशी संघांना फिरकी गोलंदाजी खेळता येत नसली की आखाडे खेळपट्टी बनवण्याची प्रथाच पडली आहे. एन. श्रीनिवासन यांचा वरदहस्त असल्यापासून धोनीने तर अशा खेळपट्ट्या सक्तीने बनवून घेतल्या. वेगवान खेळपट्टीवर खेळणा-या दक्षिण आफ्रिका, ऑस्‍ट्रेलिया यांच्यासारख्या संघांना खेळपट्ट्या अधिक कोरड्या ठेवल्या, अधिक संथ केल्या की खेळणे अवघड होऊन जाते. त्याचा अचूक लाभ धोनी आणि कंपनीने अलीकडे उचलला.

मात्र, त्यामुळे परदेशात याच संघाची उलट परिस्थिती झाली. अश्विन, ओझा, जाडेजा हे फिरकी गोलंदाज विदेशी खेळपट्ट्यांवर बळी घेताना धापा टाकायला लागले. तीच गोष्ट फलंदाजांच्या बाबतीत घडली. संथ खेळपट्ट्यांवर आरामात खेळणा-या या शतकवीरांची अर्धशतकी मजल मारतानाही दमछाक झाली. कोणतेही मैदान, खेळपट्टी असो; क्षेत्ररक्षकांसाठी फरक पडायला नको होता. असे असूनही भारतीय संघाने हवेतील झेलही सोडण्याचा नवा पायंडा पाडला. लक्ष्मण, द्रविड हे स्लीपमधील स्पेशालिस्ट निवृत्त झाल्यामुळे त्या जागेलाही खिंडार पडले आहे. भारतीय संघाचे तथाकथित स्पेशालिस्ट प्रशिक्षक, ज्यांनी त्या जागांवर अश्विन किंवा अन्य गोलंदाजांना उभे केले. त्या जागेवर नवा क्षेत्ररक्षक तयार करणे आवश्यक होते. त्याऐवजी खेळाडूंना वारंवार बदलण्याची संगीत खुर्ची सुरू झाली. त्यामुळे कोणताही क्षेत्ररक्षक स्लीपमध्ये अद्याप स्थिरावू शकला नाही.


प्रत्येक दौ-यामध्ये याच गोष्टी वारंवार घडत आहेत. बांगलादेश दौराही त्या गोष्टीला अपवाद ठरला नाही. बांगलादेशात त्यापेक्षाही वेगळी घडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे, संघातील खेळाडूंनी स्वत:च आपण थकलो आहोत, असे ठरवून सामन्याच्या आदल्या दिवशी सरावाला सुटी दिली. भारतीय संघासोबत क्षेत्ररक्षण, गोलंदाजी, फलंदाजी यासाठी स्वतंत्र प्रशिक्षक आहेत. त्याशिवाय सर्वांवर नियंत्रण ठेवणारा प्रमुख प्रशिक्षक आहे. कप्तान, उपकप्तान, मानसोपचारतज्ज्ञ अशी संघ व्यवस्थापनाची प्रचंड फौज आहे. बीसीसीआय त्यांच्यावर करोडो रुपये खर्च करते. या सा-या फौजेला या अपयशासाठी कधीही जबाबदार धरण्यात येत नाही. त्यांच्या योगदानाचे कुणीही कधीही मोजमाप केल्याचे ऐकिवात नाही. यापैकी कुणाची जबाबदारी काय होती, हेही स्पष्ट व्हायला पाहिजे. संघ सतत पराभूत होत असतानाही सरावाला सुटी देण्याचा निर्णय कुणाचा होता, याचीही चौकशी व्हायला हवी. सुनील गावसकर यांनी सरावाला सुटी देण्याच्या निर्णयावर टीका केल्यानंतर, सराव न करण्याच्या कृतीचे अंबाती रायडू या खेळाडूमार्फत समर्थन करण्याच्या कृतीला तर निर्लज्जपणाचा कळसच म्हणावे लागेल. गावसकर यांनी भारतीय संघाची देहबोली स्वत: पाहिली. त्या वेळी त्यांच्यासारख्या दोन दशकांहून अधिक वर्षे भारतीय क्रिकेटची सेवा करणा-या क्रिकेटपटूला विद्यमान संघाची कृती निश्चितच खटकली असावी. पराभूत होणा-या संघाने खरं तर अधिक गंभीर होणे गरजेचे होते. त्याऐवजी आपला संघ थकण्याचे कारण पुढे करून हॉटेलात आराम व अन्य उद्योग(?) करत होता. खेळाडूंची ती अवस्था पाहिल्यानंतर सुनील गावसकरांनी म्हटले होते की, हा संघ खेळायला आला आहे की पिकनिकला?


गावसकरांनी राखीव खेळाडूंना अखेरपर्यंत संधी न देण्याच्या संघ व्यवस्थापनाच्या धोरणावर कडाडून टीका केली आहे. अफगाणिस्तानविरुद्ध निरर्थक सामन्यातही तोच संघ कायम ठेवण्याचे कारण काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. गावसकर यांनीच त्यावर पुढे म्हटले आहे की, राखीव खेळाडूंपैकी कुणी जर चांगली कामगिरी केली तर नियमित खेळाडूंना आपली जागा कायमसाठी जाईल, अशी भीती वाटत असावी. परवेझ रसूल यासारख्या नवोदित खेळाडूलाही या आधी झिम्बाब्वे दौ-यात कायम राखीव खेळाडूंमध्येच ठेवण्यात आले होते. जर नवोदित खेळाडूंना आता आजमावायचे नसेल तर जडणघडणीच्या प्रक्रियेतून जाणारा संघ तयार होणार कसा? बीसीसीआयने लायक नसलेल्या, गुणवत्ता बेताचीच असणा-या खेळाडूंना त्यांच्या योग्यतेपेक्षा मोठे केले आहे. क्रिकेटपटूंच्या खिशात करोडो रुपये कोंबून त्यांनी त्या पैशाचे मोल किती आहे, याची जाणीव कधीही होऊ दिली नाही. त्यामुळे ‘ट्वेन्टी-20’च्या क्रिकेटचे औटघटकेचे हे सम्राट स्वत:ला दिग्गज क्रिकेटपटू समजायला लागले आहेत. एक, दोन शतके काढली; 5-6 विकेट घेतल्या की, त्यांचे पाय जमिनीवर नसतात. क्रिकेट हा खेळ अशा खेळाडूंना तत्काळ जमिनीवर आणतो, हे या वेळीही सिद्ध झाले आहे.

vinayakdalvi41@gmail.com