आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता दूषित रक्त बदलावेच लागेल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी म्हणजे परवा 22 ऑगस्टला मालेगावचे उद्योजक पुरुषोत्तम काबरा यांचा सकाळी सकाळी फोन आला आणि सध्याच्या आर्थिक परिस्थितीविषयी चिंता व्यक्त करून रुपया सावरण्यासाठी जनतेने काय करायला हवे, असा प्रश्न त्यांनी मला विचारला. अर्थात केवळ प्रश्न विचारणे हा त्यांचा हेतू नव्हता. पुढे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि काही तरी केले पाहिजे आणि ते करण्यात आपण काही जण पुढाकार घेऊ, असेही ते म्हणाले. आपण म्हणजे सामान्य माणसाने काय केले पाहिजे, याची चर्चा करण्यासाठी ते पुढील आठवड्यात पुण्याला येणार असून त्यांच्याशी ती चर्चा होणार आहे. या महाकाय देशाला भेडसावणारा हा गहन प्रश्न सोडवणारे आपण खरोखरच आहोत काय, या प्रश्नाचे उत्तर आज देता येत नाही, मात्र तो सोडवण्यासाठी एक भारतीय म्हणून प्रयत्न करण्याची किंवा त्याला चालना जबाबदारी प्रत्येकाची आहे, हे विसरून चालत नाही.

मुद्दा असा आहे की, रुपयाच्या अवमूल्यनाचा विषय हा आपला राष्ट्रीय विषय झाला, याची ही पावती आहे. गेल्या वर्र्षी महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता आणि त्याचे चटके बसल्याने पाण्याचे महत्त्व कळून प्रचंड कामे या काळात झाली. म्हणून दुष्काळ ही इष्टापत्ती ठरली, असे आपण म्हणतो. मला वाटते, रुपयाचे अवमूल्यन हीसुद्धा इष्टापत्तीच आहे. याचा अर्थ असा की, आपण डॉक्टरांकडे काही किरकोळ आजार घेऊन उपचारासाठी गेलो आणि पहिल्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान झाले, ही जशी इष्टापत्ती ठरू शकते, तशीच ही इष्टापत्ती आहे, असे माझे मत झाले आहे. म्हणजे आपल्या शरीरातील रक्त (पैसा) आता इतके दूषित झाले आहे की शरीरातील पूर्ण रक्तच (दूषित म्हणजे काळा पैसा) बदलण्याची वेळ आली आहे. पूर्ण रक्त बदलायला म्हणजे अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल करायला आपण घाबरत आहोत, मात्र आता वेळच अशी आली आहे की ते रक्त न बदलल्यास म्हणजे बदल न केल्यास मृत्यू अटळ आहे. त्या भीतीने तरी आपण आमूलाग्र बदलास तयार होऊ, ही इष्टापत्ती होय. रुपयाच्या अवमूल्यनाची मूळ कारणे शोधली तर आपल्याला नेमके काय करायला हवे, हे लक्षात येते. केवळ सरकारला दोष देऊन हा प्रश्न सुटणारा नाही. या प्रकारच्या पडझडीने ज्यांची परवड होते, त्यांनाही आता अर्थसाक्षरतेसाठी सक्रिय व्हावे लागणार आहे. रुपयाचे अवमूल्यन थांबवण्यासाठी मुळातून काय करायला हवे, असा प्रश्न आजच्या व्यवस्थेला विचारून पाहिल्यावर पुढील अकरा बाबी समोर आल्या.

1. भारतीय अर्थव्यवस्थेत काळ्या व पांढ-या पैशांचे प्रमाण अतिशय व्यस्त झाले असून तेथून हे दुष्टचक्र सुरू झाले आहे. त्यासाठी देशाचे आर्थिक चारित्र्य शुद्ध करण्याची मोहीम म्हणजे देशातील बँकमनी म्हणजे शुद्ध पांढरा पैसा वाढेल, यासाठी 100 टक्के भारतीयांना आर्थिक साक्षरतेच्या मार्गाने बँकिंगकडे वेगाने न्यावे लागेल.

2. सर्व भारतीयांनी बँकिंगकडे जाण्यासाठी रोखीच्या व्यवहारांवर निर्बंध आणावे लागतील. म्हणजे 1000, 500 आणि जरूर पडल्यास 100 रुपयांच्याही नोटा व्यवहारातून काढून टाकाव्या लागतील. आज देशात मोठ्या नोटांचे प्रमाण ९2 टक्के इतके प्रचंड आहे!

3. राजकारण स्वच्छ आणि सरकार सक्षम होण्यासाठी निवडणुकीच्या खर्चासाठी सरकारी निधीची तरतूद करावी लागेल.

4. सेवा क्षेत्राचा विकास केल्यावर परकीय चलन मिळते आणि विशिष्ट प्रमाणात ते मिळालेच पाहिजे, मात्र उत्पादन क्षेत्राचे महत्त्व अबाधित ठेवले पाहिजे. कारण त्यातूनच अधिक रोजगार व संपत्तीचे निर्माण होते तसेच निर्यातही वाढते.

5. अर्थव्यवस्था ज्या 122 कोटी जनतेच्या क्रयशक्तीवर उभी आहे, ती क्रयशक्ती वाढण्यासाठी ६0 कोटी जनता अजूनही शेतीवर अवलंबून आहे, याचे भान ठेवून शेतीवरील भांडवली गुंतवणूक वाढवावी लागेल.


6. सध्या परकीय चलनाचा साठा आपल्याला पुरत नाही, याचे महत्त्वाचे कारण सोन्याची आणि तेलाची आयात. सोन्याच्या गुंतवणुकीला चांगला पर्याय द्यावा लागेल आणि खासगी गाड्या वापरावर काही निर्बंध लावावे लागतील. अर्थातच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करावी लागेल. दीर्घकालीन मार्ग म्हणजे देशातील रेल्वे सेवेसाठी जास्त भांडवल गुंतवणूक करून ती सक्षम करावी लागेल.

7. सर्व काळ्या पैशांचे मूळ असलेली करपद्धती आमूलाग्र बदलावी लागेल. सध्याची करपद्धती आपल्याला इंग्रजांनी दिलेली असून ती अतिशय गुंतागुंतीची तसेच अन्यायकारक आहे. ती अर्थक्रांतीने (www.arthakranti.org) सुचवल्यानुसार बँक व्यवहार करासारखी सोपी, भेदाभेद न करणारी व नागरिक आनंदाने देतील तरीही कर पुरेसा जमा होईल, अशी करावी लागेल.

8. व्यवस्थेवर सर्वसामान्य माणसाचा विश्वास वाढवण्यासाठी त्याला सार्वजनिक व्यवस्था आपल्या वाटल्या पाहिजेत. त्यामुळे अन्न, आरोग्य, शिक्षण, घरबांधणी अशा पायाभूत सुविधांवरील तरतूद वाढवावी लागेल.

9. शेअर बाजारासारख्या मार्गाने परकीय गुंतवणूकदार आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेशी खेळून संपत्ती बाहेर नेत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त भारतीय नागरिकांनी शेअर बाजारात भाग घ्यावा, यासाठी जोमाने प्रयत्न करावे लागतील.

10. सोन्याचा साठा आणि चलन छापण्याचा संबंध आता राहिलेला नाही आणि जगातील सर्व चलनांचा दर डॉलरशी जोडला गेला. आयात कमी करून, निर्यात वाढवून, अनिवासी भारतीयांना विश्वासात घेऊन आणि शक्य तेथे तो वाचवून भारताच्या तिजोरीतील डॉलरचा साठा वाढवावा लागेल.

11. आर्थिक प्रश्नांनी इतके व्यापक रूप धारण केले आहे की त्याचा मुकाबला आता देश म्हणूनच करावा लागेल. त्यासाठी राजकीय, राज्य, भाषा, जातधर्माचे भेद बाजूला ठेवून भारतीय आणि केवळ भारतीय नागरिक म्हणूनच अभिमानाने जगता येईल, अशी व्यवस्था निर्माण करण्याचे स्वप्न पाहावे लागेल.


तुमच्या-माझ्या अर्थपूर्ण जगण्यासाठी एक भारतीय म्हणून प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र्याच्या या चळवळीत भाग घ्यावाच लागेल. आपल्यापैकी प्रत्येकाला वाटणारी चिंताच पुरुषोत्तम काबरा यांनी व्यक्त केली आहे.