आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉकी प्रशिक्षक : बळीचे बकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय संघाचे वारंवार व नियमितपणे होणारे पराभव असह्य वाटावेत, हे समजू शकते; पण या पराभवांना देशी-विदेशी प्रशिक्षक तेवढे जबाबदार असतात का? भारतीय हॉकी संघटनेतील गिल-बात्रा यांसारख्या दादांना हात झटकून मोकळे जाऊ देणे योग्य ठरते का? गिल-बात्रा यांच्या एकाधिकारशाहीतील हॉकी यंत्रणेस त्याबाबत जबाबदार का धरले जात नाही?
१९२८ ते १९७५ दरम्यानच्या दहा ऑलिम्पिकमध्ये, भारतीय हॉकी संघ कधीही रिकाम्या हातांनी मायदेशी परतला नव्हता. दोन सलग सोनेरी हॅट््ट्रिकसह सात सुवर्ण, एक रौप्य अन् दोन ब्राँझ आणि त्यास पूरक अशा तीन विश्वचषकांतही एक सुवर्ण, एक रौप्य व एक ब्राँझ अशीच होती भारताची देदीप्यमान कर्तबगारी! १९७६ ते २०१५ या गेल्या चाळीस वर्षांत (मॉस्को ऑलिम्पिक वगळल्यास) ऑलिम्पिक, विश्वचषक वा चॅम्पियन्स करंडक स्पर्धांत पदकांनी भारताला हुलकावण्याच दिलेल्या आहेत. त्यापैकी गेल्या एकवीस वर्षांत, केपीएस गिल
यांची राजवट १४ वर्षांची, तर नरिंदर बात्रांची हुकूमशाही गेल्या पाच वर्षांतली. गिल यांच्या कारकीर्दीत अक्षरश: सतरादा प्रशिक्षकांची उचलबांगडी झाली आणि बात्राही काही कमी नाहीत! नाबाद पाच वर्षांच्या राजवटीत त्यांनी पाच गुरूंना फाशी दिली व सहा वेळा नवनवे गुरू हुडकून काढले! गंमत तर बघा : सेड्रिक डिसौझांसारख्या अभ्यासू मार्गदर्शकाला मिळाले फक्त तेरा महिने! ऑलिम्पियन जोकीम कारव्हालोला मुदत दिली गेली अवघ्या दहाच महिन्यांची. ऑलिम्पिक कर्णधार भास्करन अन् धाकटा राजिंदर यांना वाव दिला गेला केवळ तेरा-तेरा महिने! बात्राजींच्या राज्यात निदान मायकल नॉब्सना टिकू दिले दोन वर्षे, पण स्पेनचे जोस ब्रासा व ऑस्ट्रेलियाचे जगप्रसिद्ध टेरी वॉल्श यांना बाहेर फेकले गेले, दीड व एक वर्षात! आणि
आता पॉल व्हॅन अॅस यांना हॉलंडमध्ये परत धाडले गेलेय केवळ पाच महिन्यांत! एक वेगळा न्याय प्रशिक्षकांना मिळतोय तो म्हणजे त्यांना बनवलं जातंय बळीचे बकरे. दुसरा न्याय भारतीय हॉकीतील सर्वेसर्वा गिल व बात्रा प्रभृतींना-त्यांना मोकाट सोडलं जातंय!
बळी क्रमांक बावीस!
नेदरलँड्स ऊर्फ हॉलंडचे पॉल व्हॅन अॅस, हे गिल-बात्रा यांच्या एकाधिकारशाहीतील बळी क्रमांक बावीस. त्यांच्या
कामगिरीचे मूल्यमापन करण्यास बात्राजींना पाच महिने पुरेसे ठरले! यात खूपच अधिक खटकणारी बाब म्हणजे, बात्राजींच्या ‘हॉकी इंडिया’ संघटनेतील माजी नामवंत हॉकीपटूंची हुजरेगिरी, होयबागिरी. तडफदार सेंटर-फॉरवर्ड हरबिंदर सिंग यांच्या अध्यक्षतेखालील विशेष समितीत होते गोविंदा, भास्करन, सुबय्या, थोएबा सिंग, असुंना लकरा, आरपी सिंग व जसजित कौर. या सा-यांचा होता मोठा नावलौकिक; पण क्रिकेटमध्ये गावसकर, शास्त्री,
विश्वनाथ, कपिलदेव, वेंगसरकर, द्रविड, गांगुली जसे सत्ताधीशांचे उघडउघड वा मौनी समर्थक बनतात अगदी तसेच हरबिंदरची समिती बात्रांचा रबरस्टॅम्प बनली. हॉलंडला ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून देणा-या प्रशिक्षक अॅस यांची केवळ दीडशे दिवसांत हकालपट्टी करण्यास, बात्रांच्या सुरात सूर मिसळवण्यास, हाँ-जी-हाँ-जी करण्यास सरसावली! भारतीय हॉकीचीच नव्हे, तर भारतीय क्रीडा क्षेत्राची यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती? अॅस यांची नियुक्ती सर्व सुविधांसह दरमहा साडेसात लाख रु. मानधनावर तीस जानेवारी रोजी झाली. जोस ब्रासा
व मायकल नॉब्स या त्यांच्याआधीच्या प्रशिक्षकांच्या सात लाख व साडेसहा लाख रु. मानधनापेक्षा जास्त, पण टेरी वॉल्श यांच्या दहा लाखांपेक्षा बरेच कमी तरीही आकर्षक, असे अॅस यांचे मानधन होते. आता पाच महिन्यांत हकालपट्टी व्हावी, असा त्यांनी कोणता अपराध केला होता? अझलन शहा स्पर्धेत त्यांनी भारतीय संघाला ब-याच वर्षांनंतर ब्राँझ पदक मिळवून दिले. ही कामगिरी एप्रिलच्या पूर्वार्धातली. मग मेच्या पूर्वार्धात भारताने जपानविरुद्धची मालिका अपेक्षेनुसार ३-० जिंकली. या गोष्टी हरबिंदरसिंगच्या समितीस अपराधात्मक वाटल्या काय? ठिणगी पडली ती जून-जुलैमध्ये अँटवर्पला झालेल्या वर्ल्ड लीग हॉकीत. उपांत्यपूर्व फेरीत भारताने मलेशियावर ३ -२ असा मिळमिळीत जय संपादला. बात्राजी मग मैदानात घुसले. त्यांनी चक्क खेळाडूंचे प्रवचन घेतले.‘पाकिस्तानला आपण ब-यापैकी नियमितपणे हरवत आलोय, मग इथे बरोबरीची लढत का झाली?’ असा सवाल करून ते म्हणाले, ‘पुरस्कर्त्यांना हवा असतो विजयी संघ. तुम्ही असे हरत राहिलात, तर पुरस्कर्ते मिळणार
नाहीत.’ त्याच वेळी राष्ट्रीय प्रशिक्षक या नात्याने अॅस यांनी हस्तक्षेप केला. तुम्हाला खेळाडूंना काय सांगायचे ते तुम्हीच नेमलेल्या राष्ट्रीय प्रशिक्षकांमार्फत सांगा, असे त्यांनी बजावले. सरंजामी वा नवाबी संस्कृतीत मुरलेल्या बात्राजींना असे शब्द ऐकण्याची सवय कशी असणार? मीही बघून घेईन, असे त्यांनी राष्ट्रीय प्रशिक्षकांना धमकावले. आपल्याला नोटीस दिली जात आहे, याची जाणीव राष्ट्रीय प्रशिक्षकांना झाली. येथे मुद्दाम सांगावेसे वाटते की, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षकपद भूषवले ऑस्ट्रेलियाला माजी संघनायक रिकी पाँटिंगने,
तिथे त्याच्या कामात ना सचिन तेंडुलकर, ना अनिल कुंबळे, ना नीता अंबानी ढवळाढवळ करायच्या. हे सारं महाभारत झाल्यानंतर बात्राजींनी ठेवणीतली माहिती सोयीस्करपणे बाहेर काढली. नेदरलँड्समध्ये राष्ट्रीय संघाला ऑलिम्पिक विजेते बनवणा-या अॅस यांच्या दिमतीला असत पाच-पाच खास प्रशिक्षक. आघाडी फळी, मधली फळी, गोलरक्षण यातले तज्ज्ञ. डावपेचातील तज्ज्ञ आणि व्हिडिओ विश्लेषक. भारतात असे कुणीच
मदतनीस नसल्याने ते उघडे पडले! ‘उघडे पडले’, म्हणजे अझलन शहा हॉकीत तिसरे आले. सुमार दर्जाच्या जपानविरुद्ध विजयाची हॅट््ट्रिक रचू शकले. वर्ल्ड हॉकी लीगमध्ये आठ देशांत चौथे आले; पण बेल्जियम, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांच्याकडून चार-चार गोलच्या जबरदस्त पराभवाचे धनी झाले, हेही खरे. पाच महिन्यांत राष्ट्रीय प्रशिक्षक बदलून दाखवण्याने बात्राजींचा
अहंगंड सुखावला असेल. हरबिंदर, गोविंदा, सुबय्या यांसारखे भारतीय हॉकीचे नायकही बात्राजींचा जयजयकार करत आहेत. नरेंद्र मोदीजींनी स्वप्न दाखवलेले ‘अच्छे दिन’ हेच काय?