आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत नावाची महाबाजारपेठ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौ-याहून परतल्यानंतर त्या दौ-यातून नेमके काय साधले याची उलटसुलट चर्चा भारतात झाली. अमेरिकेत नरेंद्र मोदी यांचे जे स्वागत झाले, त्याचा एक वेगळा पैलू स्वत: मोदी प्रचारसभांत मांडत आहेत. तो असा की हा जो सन्मान आहे, तो ‘नरेंद्र मोदी’ यांचा नसून तो १२५ कोटी भारतीयांचा आहे आणि तेच जास्त खरे आहे. चीन, अमेरिका आणि सा-या जगाला आता चांगली बाजारपेठ हवी आहे आणि भारतातील ३० कोटी म्हणजे अमेरिकेच्या लोकसंख्येएवढा मध्यमवर्ग; ही ती बाजारपेठ आहे. त्यामुळेच सा-या जगाचे लक्ष आज भारताच्या या ग्राहकांकडे लागले आहे.

भारतात स्थिर सरकार आल्यामुळे आणि भारत हा जगात एक विश्वासार्ह देश मानला जात असल्याने साहजिकच भारतीय बाजारपेठेने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेझाॅनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस, मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला आणि आता फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकेरबर्ग यांचा भारतदौरा ही बाजारपेठ काबीज करण्यासाठी आहे. ही मंडळी भारतात आज गुंतवणूक करायला तयार आहेत. कारण त्या गुंतवणुकीला भारतात चांगली फळे लागू शकतात, हे त्यांना पक्के माहीत आहे. भारताकडे आपण चांगली बाजारपेठ म्हणून पाहतो, असे त्यांनी केलेले विधान एकेकाळी भारतीयांना अपमानास्पद वाटत असे. मात्र परदेशी गुंतवणुकीशिवाय आपले प्रश्न सुटत नाहीत, हे लक्षात आल्यावर राजकीय नेत्यांनीही त्यांना खास आमंत्रित करून गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आणि भारतीयांनीही ही वस्तुस्थिती आता स्वीकारायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच राष्ट्रप्रमुखांचेही होत नाही, असे स्वागत अशा उद्योजकांचे होऊ लागले आहे. हा बदल चांगला की वाईट, याची चर्चा होत राहील. मात्र जोपर्यंत भारतीय समाज राक्षसी काळ्या अर्थव्यवस्थेतून बाहेर पडत नाही, तोपर्यंत हा बदल स्वीकारावा लागणार आहे. झुकेरबर्गसारखे उद्योजक डिजिटल इंडिया मोहिमेचा फायदा घेऊ इच्छितात, हे जेवढे खरे आहे, तेवढेच त्या मोहिमेसाठीचे शुद्ध भांडवल भारतीयांकडे नाही, हेही खरे आहे. फेसबुक वापरणा-या भारतीयांची संख्या आजच ११ कोटी इतकी म्हणजे जगात दुस-या क्रमांकावर आहे. आज त्यातून पाहिजे तेवढा फायदा फेसबुकला मिळत नसला तरी भविष्यात भरघोस फायदा देणारा देश आहे, हे त्यांनी जाणले आहे!