आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Indian Woman Cricketers, Divya Marathi

भारतीय महिला क्रिकेटपटूंचा पराक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लंडच्या दौ-यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी सुमार पातळीची होत असल्याने क्रिकेटप्रेमी निराश झाले होते. मात्र, हे मळभ इंग्लंड व भारत यांच्या महिला क्रिकेट संघादरम्यान इंग्लंडमध्ये नुकत्याच खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाने विजय मिळवल्याने काहीसे दूर झाले आहे.
भारतीय महिला संघाने इंग्लंडचा सहा गडी राखून पराभव केला व एकमेव कसोटी सामन्याची मालिका जिंकली. या विजयाचे सर्वाधिक श्रेय भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिला द्यायला हवे. तिने नाबाद 50 धावा केल्या व आपल्या संघाच्या विजयाची पायाभरणी केली. त्याचमुळे भारतीय संघाला इंग्लंडच्या महिला संघाने विजयासाठी समोर ठेवलेले 189 धावांचे आव्हान पेलणे सोपे गेले. नीलांजना नागार्जन, झुलन गोस्वामी यांनी केलेली भेदक गोलंदाजी, त्याचप्रमाणे मिताली राज, स्मृती मंधाना, थिरुश कामिनी, शिखा पांडे यांची फलंदाजीही इंग्लंडच्या पराभवास कारणीभूत ठरली.
32 वर्षे वय असलेल्या कर्णधार मितालीला आता निवृत्तीचे वेध लागले आहेत. त्याआधी मितालीच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने पुन्हा क्रिकेट सामना जिंकला हा तिच्यासाठी सुखद क्षण आहे. 2006 मध्ये टाँटन येथे भारतीय महिला क्रिकेट संघाने कसोटी सामन्यात विजय मिळवला होता. त्यानंतर त्या पराक्रमाची पुनरावृत्ती व्हायला तब्बल आठ वर्षे जावी लागली. मिताली राजच्या क्रिकेट कारकीर्दीत ती 148 एकदिवसीय व 46 ट्वेंटी सामने खेळली असली, तरी तिला आतापर्यंत फक्त नऊ कसोटी सामने खेळण्याचीच संधी मिळाली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील इतर खेळाडूंची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. इंग्लंडमध्ये त्या देशाच्या महिला संघाविरुद्ध नुुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघातील अकरा जणांपैकी आठ जणींनी या निमित्ताने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुरुष चमूंच्या क्रिकेटच्या तुलनेत काहीसे दुर्लक्षित असलेले महिला क्रिकेट ‘कसोटी’चे क्षण अनुभवत असताना भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडच्या भूमीत कसोटी जिंकण्याच्या केलेल्या पराक्रमाचा आनंद अवर्णनीय असाच आहे.