भारतातील खेळाडूंना योग्य प्रशिक्षण, वातावरण व संधी मिळाली तर ते अत्यंत नेत्रदीपक कामगिरी करू शकतात हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. बिकट परिस्थितीतूनही मार्ग काढून जेव्हा भारतीय खेळाडू निर्भेळ यश मिळवितात तेव्हा त्यांच्याविषयी वाटणारा अभिमान आणखी वृद्धिंगत होतो. सतराव्या एशियन गेम्सच्या आठव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी अशीच देदीप्यमान कामगिरी करीत सुमारे ११ पदकांची कमाई केली. त्यामध्ये दोन सुवर्ण, तीन रौप्य व सहा कांस्यपदकांचा समावेश होता.
भारताच्या तिरंदाजांची कामगिरी गेल्या काही वर्षांपासून उंचावताना दिसते आहे. तेच चित्र तिरंदाजीमध्ये कम्पाऊंड टीम स्पर्धेत पुरुष गटात रजत चौहान, संदीपकुमार, अभिषेक वर्मा या भारतीय तिरंदाजांच्या त्रिकुटाने दक्षिण कोरियाच्या तिरंदाजांना अवघ्या दोन गुणांनी पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. स्क्वॅश या खेळामध्ये भारतीय खेळाडूंनी जागतिक स्तरावर सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे असे चित्र फारसे दिसत नाही. भारतात स्क्वॅश खेळले जात असले तरी क्रिकेटइतकी लोकप्रियता या खेळाला कधीच लाभलेली नाही. त्यामुळे या खेळाकडे आकृष्ट होणा-या खेळाडूंचा प्रवाहही कमी आहे. अशा स्थितीतही नाउमेद न होता हरिंदरपाल सिंग संधू, सौरभ घोषाल, महेश मनगावकर यांचा समावेश असलेल्या भारतीय पुरुष स्क्वॅश संघाने मलेशियाला २-०ने पराभूत करून सुवर्णपदक जिंकले, तर मलेशियाकडून अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागल्याने भारतीय महिला स्क्वॅश संघाला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.
कभी खुशी कभी गम असा हा मामला होता. अॅथलेटिक्समध्ये याच दिवशी ललिता बाबरने रौप्य व सुधा सिंगने कांस्यपदक भारताला मिळवून दिले. एशियन गेम्समध्ये विविध क्रीडाप्रकारांमध्ये भारतीय खेळाडू करीत असलेल्या उत्तम कामगिरीवर केंद्रीय क्रीडा खात्याने बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे. एशियन गेम्स संपले की, त्यातील भारताचे यश केंद्र सरकारने सोयीस्करपणे न विसरता यशस्वी खेळाडूंची कामगिरी भविष्यात आणखी कशी उंचावेल यासाठी त्यांना योग्य क्रीडाविषयक सोयीसुविधा पुरविल्या गेल्या पाहिजेत. नव्हे ते सरकारचे कर्तव्यच आहे!