आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगविद्येचा उचित गौरव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जागतिकीकरणामुळे आपली आहारशैली एवढी बदलून गेली की आपल्या आहारात देशीबरोबर विदेशीही पदार्थ येऊ लागले. पास्ता, पिझ्झा, बर्गर, नूडल्स, चायनीज, काँटिनेंटल, भारतीय, मेक्सिकन असे पदार्थ जगभरात हॉटेलांमध्ये दिसू लागले. कारण त्यांनी संस्कृती-परंपरा, गैरसमजाच्या मर्यादा उलटवून जिभेचा ताबा घेतला व थेट पोटात ठाण मांडले.
तसेच योगविद्येचे झाले. गुरुवारी संयुक्त राष्ट्र आमसभेने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित करण्यामागचे कारण म्हणजे या विद्येला जगभरात मिळत असणारा प्रतिसाद होय. हा प्रतिसाद किती स्पष्ट आहे याचे चित्र आमसभेत दिसून आले. १९३ सदस्यांपैकी १७५ देशांनी दरवर्षी "आंतरराष्ट्रीय योग दिवस' घोषित व्हावा या बाजूने मतदान केले. आरोग्याचा व्यापक
विचार करणारी योग ही एक विद्या आहे यावर सर्वच देशांचे एकमत झाले. पूर्वी योग स्वीकारणे हे फॅड असल्याचा प्रचार केला जात होता. पण ही टीका अनाठायी आहे. कारण या विद्येच्या जगभरात प्रसारामागे आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या सामाजिक-राजकीय चळवळींचा आशय आहे. १९६० च्या दशकात अमेरिका व फ्रान्समध्ये सुरू झालेली "काउंटर कल्चर
मूव्हमेंट' ही प्रस्थापित व्यवस्थेला प्रतिप्रश्न करणारी चळवळ होती.
स्वातंत्र्य आणि मुक्तीची घोषणा करणारी गीते, कम्युनिझमपासून ते भारतीय अध्यात्मापर्यंत अनेक वैचारिक प्रवाहांचा स्वीकार, महेश योगींचे ‘ट्रान्सेनडेंटल मेडिटेशन’ हे सारे या दशकामध्ये पसरत गेले. याच दशकामध्ये मन विशुद्धी, चित्तसाधना, एकाग्रता यावर बरेच मंथन झाले. भारतीय अध्यात्म व भारतीय संगीत जगाने ऐकण्यास सुरुवात केली ती याच काउंटर कल्चरच्या काळात. रविशंकर यांची सतार व बिटल्सची गाणी यांचे फ्यूजन याच काळातले. यंत्रयुगात माणसाच्या श्रमाची जागा यंत्राने घेतली तसे त्याचे जगणे यंत्रवत होऊन त्याची मानसिक शांती भंग पावली. तीन महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले होते की योग हे व्यक्तीचे मन व शरीर, विचार व कृती, नियंत्रण व समाधान यामध्ये बंध तयार करते. जगाच्या आरोग्य कल्याण कार्यक्रमांमध्ये योगविद्येला स्थान दिल्यास जग हवामान बदलापासून बदलत्या जीवनशैलीपर्यंत निर्माण होणा-या समस्यांवर मात करेल. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय योग दिन घोषित करून मोदींच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले ही फार महत्त्वाची बाब आहे.