आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रोचे आणखी एक यश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताच्या अवकाश संशोधनाचा गेल्या काही वर्षांतील प्रवास चित्तथरारक आहे. त्यामध्ये संघर्ष जसा आहे तसा महत्त्वाकांक्षीपणाही आहे. उदारीकरण धोरणाचा जसा भारतीय अर्थव्यवस्थेने फायदा उचलला तसा तो अवकाश संशोधनात काम करणा-या शास्त्रज्ञांनीही. काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या दबावाला झुकून रशियाने क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञान देण्यास भारतास नकार दिला होता तेव्हा त्याचे पडसाद राजकारणात पडले होते. त्यामुळे भारतीय अवकाश संशोधकही दुखावले गेले होते. याचा परिणाम असा झाला की, भारतीय अवकाश संस्थेने (इस्रो) काळाची पावले ओळखत स्वदेशी बनावटीच्या अवकाश उपकरणांच्या निर्मितीवर भर दिला. गुरुवारी इस्रोने सुमारे चार टन वजन अवकाश नेऊ शकणा-या जीएसएलव्ही मार्क-३ या प्रक्षेपकाची यशस्वी चाचणी घेत आपल्या बौद्धिक कौशल्याचे आणखी एक उदाहरण जगापुढे ठेवले. इस्रोच्या देदीप्यमान कारकीर्दीतला जसा हा एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे, तसे या यशाने एक महत्त्वाची कोंडीही फोडली आहे. ही कोंडी अशी होती की, इस्रोने या आधीच पीएसएलव्ही व जीएसएलव्ही प्रक्षेपकांच्या साहाय्याने अवकाशात कमी वजनाचे उपग्रह पाठवण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले होते व त्याचा व्यावसायिक स्तरावर उपयोगही सुरू केला होता; पण तीन किंवा चार टन वजनाचे उपग्रह अवकाशात सोडण्याचे तंत्रज्ञान इस्रोकडे नव्हते. हे तंत्रज्ञान इस्रोने आता आत्मसात केले आहे. गुरुवारी इस्रोने केलेल्या चाचणीत स्वदेशी बनावटीचा जीएसएलव्ही मार्क-३ हा प्रक्षेपक व त्याच्या सोबत तीन टनांहून अधिक वजनाची एक कुपी पृथ्वीपासून १२८ किमी अंतरावर अवकाशात सोडली. ही कुपी अवकाशात प्रक्षेपकापासून विलग झाली व नंतर ती पॅराशूटच्या साहाय्याने पृथ्वीच्या वातावरणाचा सामना करत बंगालच्या उपसागरात विसावली. अवकाशातून पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताना वातावरणाशी घर्षण होऊन प्रचंड तापमान निर्माण होते. हे तापमान एक हजाराहून अधिक अंश सेल्सियसपर्यंत असू शकते. इस्रोने तयार केलेली अवकाशवीरांची कुपी सुमारे १६०० अंश सेल्सियस इतक्या तापमानाचा सामना करू शकते व ती पृथ्वीवर सुखरूप परतू शकते. आता या यशामुळे इस्रो व्यावसायिकरीत्या आपले व अन्य देशांचे अंतराळवीर अवकाशात संशोधनासाठी पाठवू शकतो. हेच यश आहे.