आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेन टू जाफना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्तमान असे अनपेक्षित वळण घेते की त्यातून इतिहासाचे एक चक्र पूर्ण होते. दोन देशांमधील दुरावलेले राजकीय संबंध मैत्रीचे होतात. दोन भाषिक संस्कृतीमधील द्वेषाची जागा सौहार्द घेते. सोमवारपासून श्रीलंकेतील तामिळबहुल जाफना ते सिंहलीबहुल पल्लई या दोन शहरांमध्ये सुमारे २५ वर्षांनंतर याल देवी एक्स्प्रेस धावू लागली आणि या प्रदेशातील नागरिकांच्या चेह-यावरचा आनंद ओसंडून वाहू लागला. हा आनंद येणे साहजिकच होते. कारण १९९० ते २००९ पर्यंत या प्रदीर्घ काळात याल देवी एक्स्प्रेस तामिळ-सिंहली वांशिक संघर्षामुळे पूर्णपणे बंद झाली होती. दोन भाषिक संस्कृतींमध्ये दरी पडली होती.

या दोन शहरांना जोडणारे रूळ पूर्णपणे उखडले गेले होते. जाफना रेल्वेस्थानक बाँब, मशीनगनच्या मा-याने भग्न झाले होते. तामिळ बंडखोर एलटीटीई संघटनेने स्वतंत्र तामिळ इलमच्या लढ्यात जाफना शहराला आपली राजधानी घोषित केल्यानंतर या शहराचा उर्वरित श्रीलंकेशी संबंध तुटला होता. २००९मध्ये श्रीलंका सरकारने मोठ्या लष्करी कारवाईत प्रभाकरनला ठार मारून त्याचे तामिळ इलमचे स्वप्न उद्ध्वस्त केल्यानंतर उत्तर श्रीलंका व दक्षिण श्रीलंका जोडण्यासाठी प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून भारतीय रेल्वेच्या सुमारे चारशे तंत्रज्ञांची तुकडी जाफना ते पल्लई रेल्वेमार्गाचे नूतनीकरण करण्यासाठी श्रीलंका सरकारला मदत करत होती. या सर्वांच्या अथक प्रयत्नातून हा मार्ग सोमवारपासून खुला झाला.
वास्तविक १९५६ मध्ये या मार्गावर पहिली रेल्वे धावली होती. त्यामुळे उत्तर श्रीलंकेचा राजधानी कोलंबोशी संपर्क प्रस्थापित झाला होता. पण नव्वदच्या दशकात तामिळ-सिंहली वांशिक संघर्षामुळे हा मार्ग बंद करण्यात आला होता. हा मार्ग पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने श्रीलंका सरकारने भारतीय रेल्वेची मदत मागितली होती. भारतीय रेल्वेने आपल्या कुशल तंत्रज्ञांचे एक पथक पाठवून हा मार्ग पूर्ण केला. आता हा मार्ग सुरू झाल्याने जाफना शहराचे व्यापारी महत्त्वही वाढले आहे. भारताच्या मदतीने कनकेसनथुराई हे उत्तरेकडील बंदर विकसित केले जात आहे. हे बंदर आता जाफनाशी रेल्वेने जोडले जाईल व व्यापाराला गती मिळेल.