आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमशेदजी टाटांचा सार्थ गौरव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशाच्या प्रगतीला चालना देणाऱ्या भारतीय उद्योजकांमध्ये जमशेदजी टाटा अग्रणी होते. त्यामुळेच ते भारतीय उद्योग जगताचे पितामह म्हणून ओळखले जातात.
अव्वल इंग्रजी अमदानीत ज्या भारतीय उद्योजकांनी स्वदेशी उद्योगसमूहांचा पाया रचला व विस्तारला, त्यामध्ये टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा हे अग्रभागी होते. जमशेदजी टाटा यांच्या १७५ व्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदी सरकारने विशेष स्मृतिनाणी (कॉमेमरेटिव्ह कॉईन्स) काढण्याचे ठरवले आहे. मोदी सरकारने "मेक इन इंडिया' ही मोहीम हाती घेतली असून त्यामध्ये भारतीय उद्योजकांनी हिरिरीने सहभागी व्हावे यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जमशेदजी टाटा यांच्यावरील विशेष स्मृतिनाणी काढणे हा त्यातीलच एक भाग असून आज ६ जानेवारी रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानी एका छोटेखानी समारंभात मोदींच्या हस्ते ही नाणी जारी करण्यात येणार आहेत. भारतीय उद्योग जगताचे पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जमशेदजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी गुजरातमधील नवसारी येथे झाला. येत्या ३ मार्च रोजी त्यांची १७५ वी जयंती आहे. आपल्या व्यवसायानिमित्त जमशेदजी टाटा यांना अमेरिका, इंग्लंड तसेच अन्य युरोपीय देशांना भेटी द्याव्या लागत असत. या प्रगत देशांमध्ये औद्योगिक क्रांतीनंतर उद्योगधंद्यांची जशी भरभराट झाली, तसेच चित्र भारतामध्येही निर्माण करता येऊ शकते, असा विश्वास टाटा यांच्या मनात निर्माण झाला. मुंबईतील चिंचपोकळी येथे टाटा यांनी १८६९ मध्ये अलेक्झांड्रिया ही कॉटन मिल सुरू केली. त्यानंतर नागपूरच्या एम्प्रेस मिलसह अनेक िठकाणी कॉटन मिल चालवून त्यांनी या उद्योगाला नवा आयाम दिला. भारतात पोलाद व स्टील निर्मितीचा प्रकल्प सुरू करावा यासाठी अद्ययावत तांत्रिक ज्ञान मिळविण्याकरिता जमशेदजी टाटांनी विविध देशांचा दौराही केला होता. पण हे स्वप्न त्यांच्या हयातीत साकार होऊ शकले नाही. मात्र, जमशेदपूर येथे १९०७ मध्ये टाटा उद्योगसमूहाने असा प्रकल्प उभारून जमशेदजी यांची स्वप्नपूर्ती केली. मुंबईतले ताजमहाल हॉटेल, टाटा जलविद्युत प्रकल्प ही जमशेदजी टाटा यांची निर्मिती आहे. अशा या महनीय उद्योजकावर विशेष स्मृतिनाणी काढून त्याचा सार्थ गौरव करण्यात येत आहे.