आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सच्चा पत्रकार हरपला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या बातमीने व्यवस्थेला धक्का दिला तरी पत्रकारांनी आपण स्वत: क्रांतिकारक असल्याचा ग्रह करून घेऊ नये. बातमीदारी ही निरंतर प्रक्रिया आहे. बातमीदाराने एकच बातमी नव्हे, तर अनेक समाजहितैषी बातम्या द्याव्यात. तिच्यात सातत्य राखणाराच सच्चा पत्रकार असतो, असे बजावणारे जे काही बुजुर्ग पत्रकार होते, त्यात माधव विठ्ठल ऊर्फ एम. व्ही. कामथ यांचा समावेश होता. आज ते नाहीत. गुरुवारी सकाळी त्यांचे कर्नाटकातील मणिपाल येथे हृदयविकाराने वयाच्या ९३ वर्षी निधन झाले. पण त्यांच्या जाण्याने जुन्या आणि नव्या पत्रकारितेचा एक दुवा निखळला आहे, हे नक्की. कामथ हे ५० च्या दशकात पत्रकारितेत आले. मुंबईतील फ्री प्रेसमधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली. पुढे त्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ व ‘द संडे टाइम्स’मधून पत्रकारिता केली.
१९६८ ते १९७८ अशी दहा वर्षे ते वॉशिंग्टनमधून बातमीदारी करत होते. त्यानंतर तीन वर्षे ते प्रतिष्ठित अशा ‘इलेस्ट्रेड विकली’चे संपादक होते. त्यानंतर ते निवृत्त झाले. पण या सर्व काळात त्यांनी नवी दिल्ली, वॉशिंग्टन, पॅरिस, जिनिव्हा, न्यूयॉर्क व देशातील विविध ठिकाणांहून बातमीदारी करताना भारतीय वाचकांना जगाचे भान दिले. पत्रकारितेतील त्यांची कामगिरी व अनुभव इतका दांडगा होता की, निवृत्तीनंतर त्यांच्याकडे प्रसारभारतीचे संचालकपद देण्यात आले. २००४ मध्ये त्यांचा भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानही केला. अत्यंत निगर्वी व संयमी असलेले कामथ सच्चाईने बातमीदारी करावी याबाबत आग्रही होते. व्यवस्थेत परिवर्तन आणण्याचे काम क्रांतिकारकांचे असते. ते काम पत्रकाराने करू नये, असा व्यावहारिक सल्ला देताना बातमीदाराने बातमीत अधिक सच्चेपणा आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणत.
लोकांचा पत्रकारितेवर विश्वास असतो. बातमीत जे सांगितले आहे ते सत्य आहे, अशी वाचकांची धारणा असते. त्यामुळे त्यांच्या विश्वासाला, धारणेला धक्का न देण्याची जबाबदारी ही पत्रकाराचीच असते, असे ते ठामपणे सांगत. एकाच बातमीने कोणी पत्रकार मोठा होत नाही. त्याने सातत्याने बातम्या दिल्या तरच त्याच्यामधील पत्रकार जिवंत राहतो, असे ते सांगत.