आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधी विचाराचे पाईक : कमलनयन बजाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यावहारिकदृष्ट्या कोणतंही शिक्षण झालेलं नसतानाही ‘बजाज उद्योगसमूहा'ची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम कमलनयनजींनी केली. १९४२ ते १९७२ या तीस वर्षांच्या काळात भारतातील पहिल्या २० उद्योजक घराण्यांमध्ये ‘बजाज'चे नाव पोहोचवण्याची अभूतपूर्व कामगिरी त्यांनी केली. कमलनयनजींची विचारशक्ती आणि जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन अचंबित करणाराच होता. असे घडले होते कमलनयनजी!

कमलनयनजी दूरदृष्टिकोन असलेले व्यावसायिक, उद्योजक होतेच, पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण महात्मा गांधी - विनोबा यांच्या विचारांनी झालेली होती. किंबहुना या विचारांवरच त्यांनी व्यवसायाचा पाया रचला होता, असे मला आजही वाटते. त्यांनी अद्ययावत तंत्रज्ञान अवगत केले होते, त्या काळातील प्रगत देशांशी करारमदार केले, मात्र त्यांनी स्पर्धकांनाही सोबत घेऊन व्यवसाय वाढवला. आज महत्प्रयासाने शिकवल्या जाणा-या गोष्टी त्या काळात त्यांनी सहज शिकून घेतल्या. त्यामागे त्यांची कुशल बुद्धिमत्ता, आकलनक्षमता होतीच, पण त्याला गांधी विचारधारेची जोड होती व आमच्या यशामध्ये या विचारधारेला महत्त्वाचे स्थान आहे.

तसे पाहू जाता, त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारचा खोडकरपणा होता. मनाला न रुचणारी एखादी गोष्ट करत नसत. ते स्पष्टवक्ते होते. वादविवादही करत. महात्मा गांधींशीही त्यांचे मतभेद झाले होते. त्यांच्या कुमारवयातील एक घटना आहे. गांधीजींच्या आश्रमात राहणा-यांना सर्व प्रकारची कामे करावी लागत. झाडलोट करण्यापासून शौचालये साफ करण्याचीही कामे करावी लागत होती. गांधीजींच्या आश्रमात श्रमाला महत्त्व होते. एकदा कमलनयनजींवर शौचालय साफ करण्याची पाळी आली. त्यास त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. हा वाद अखेर गांधीजींपर्यंत गेला. गांधीजींनी कारण विचारल्यानंतर कमलनयनजी त्यांना म्हणाले, 'मला दुसरं कोणतंही काम द्या, पण असलं घाणेरडं काम मी करणार नाही.’ गांधींजींनी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि कमलनयनजींची तक्रार करणा-या स्वयंसेवकाला ते म्हणाले की, ठीक आहे. त्यांना दुसरं काम द्या. जोपर्यंत ते स्वतःहून शौचालय साफ करायला येणार नाही तोवर त्यांना हे काम सांगू नका. जाता-जाता गांधीजींनी कमलनयनजींना इतकाच प्रश्न केला, 'शौच करणारा घाणेरडा की ते साफ करणारा घाणेरडा?’ समजावून सांगण्याची गांधींजींची वेगळी पद्धत होती.
कमलनयनजींना जे समजावून सांगायचे होते तसे त्यांनी सांगितले. आठ-पंधरा दिवसांनंतर शौचालय स्वच्छ करण्याची पाळी त्यांच्यावर आली तेव्हा त्यांनी ते काम कुरकुर न करता केले.
ख-या अर्थाने कमलनयनजींचे बालपण पवनार सेवाग्राममध्ये गेले. गांधी, विनोबा भावे आणि जमनालाल (काकाजी) यांचे संस्कार त्यांच्यावर झालेले होते. या तिघांच्या सहवासात ते लहानाचे मोठे झाले. 'बापू, विनोबा आणि काकाजी यांनीच माझं आयुष्य घडवलं,’ असे कमलनयनजी आवर्जून सांगायचे. खरे तर गांधी-विनोबांनी त्यांना उद्योगाकडे वळवले नसते तर कमलनयनजींचे आयुष्य समाजकारण-राजकारणातच व्यतीत झाले असते. कमलनयनजी स्वतंत्रता सेनानी होते. त्यांनी कारावासही भोगला होता. विनोबाजी त्यांच्या गुरुस्थानी होते.

गांधी-विनोबांच्या विचारांने प्रेरित झालेल्या कमलनयनजींनी उद्योग जगतात पाऊल टाकले. पवनार-सेवाग्राममध्येच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले होते. लौकिक अर्थाने त्यांचे शिक्षण फारसे नव्हतेच; पण विचार करण्याची त्यांची क्षमता अफाट होती. माझे स्वतःचे माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झाले. नंतर लॉ कॉलेजमध्ये शिकलो. पुढे ‘हॉर्वर्ड'मध्ये जाऊन एमबीए केले; पण या सगळ्या शिक्षणप्रवासात मी ते सगळे काही शिकू शकलो नाही, जे शिक्षण मला कमलनयनजींबरोबर राहून मिळाले. उद्योग-व्यवसायासाठीची आवश्यक नीतिमूल्ये जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला कमलनयनजींच्या सहवासात राहूनच प्राप्त झाला. कमलनयनजी रोज उठून कधीच कारखान्यात किंवा कार्यालयात जात नसत; पण लोकांना पारखण्याची त्यांची क्षमता जबरदस्त होती. माणसे ओळखण्याचे कसब त्यांच्यात होते. त्यामुळे चांगली माणसे शोधून ते त्यांच्यावर योग्य ती जबाबदारी टाकू शकले.

जे करायचे ते सर्वोत्तम, सर्वसाधारण कामात गुंतून पडायचे नाही अशी त्यांची आम्हाला शिकवण होती. माझी टेनिस खेळण्याची आवड बघितल्यानंतर ते म्हणत असत, टेनिस खेळायचे तर विम्बल्डनमध्येच खेळायला हवे. गिर्यारोहणाची आवड असेल तर एव्हरेस्टच पार करायला हवे, असे त्यांचे मत होते. साहजिकच उद्योग-व्यवसायातसुद्धा जागतिक दर्जाची कामगिरी करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले होते. युरोपातील बहुराष्ट्रीय कंपन्यांशी चाळीस-पन्नासच्या दशकात जवळीक साधण्याचे प्रयत्न त्यांनी केले होते. ‘गरिबातल्या गरिबाची सेवा' आणि ‘ग्राहकदेवो भव' ही दोन सूत्रे कमलनयनजींनी गांधीजींकडून शिकली होती. या दोन्हीवरच बजाज उद्योगसमूहाची नीती ठरली आहे. समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचे तर जास्तीत जास्त रोजगारनिर्मिती हेच उद्दिष्ट असायला हवे.
‘सबसिडी'वर आधारलेल्या व्यवस्थेतून गरिबांचा उद्धार कसा होणार? त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यातूनच गरिबी दूर होणार आहे. साहजिकच कोणत्याही औद्योगिक धोरणाचा फायदा गरिबांना काय होणार, उद्योगांतून निर्माण होणा-या रोजगारांमुळे सर्वंकष विकास शक्य आहे का, या सर्व बाबींची रचना त्यांच्या डोक्यात पहिल्यांदा तयार होत असे. गांधीजी तंत्रज्ञान किंवा आधुनिकतेच्या विरोधात नव्हते. साहजिकच कमलनयनजींच्या औद्योगिक प्रगतीचे वावडे नव्हते.
कमलनयनजींबद्दल आज विचार करताना असे वाटते की, गांधी-विनोबांच्या सहवासातील आश्रमीय वातावरण आणि त्यांची स्वतःची विलक्षण बुद्धिमत्ता यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडलेले होते. उद्योगातील त्यांच्या दूरदृष्टीला गांधी-विनोबांच्या विचारांचा पाया होता व त्या पायावरच बजाज उद्योगसमूहाची भव्य इमारत पुढे उभी राहणार आहे. माझ्या उच्च शिक्षणाबरोबरच कमलनयनजींनी स्वकर्तृत्वातून कमावलेल्या व्यावहारिक शिक्षणाची जोड मिळाली. त्याला नैतिक पाठबळ मिळाले. व्यवस्थापनशास्त्रातील उच्च शिक्षणाचा मला नक्की फायदा झाला; पण त्याहून अधिक फायदा झाला तो कमलनयनजींबरोबर अनेकदा होणा-या चर्चांचा. बहुधा रात्रीच्या जेवणानंतर या चर्चा होत व अनेकदा मतभेदही होत. ते जसे स्पष्टवक्ते होते तसाच मीही होतो; पण या गप्पातून त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन स्पष्ट होत असे. व्यावसायिक निर्णय घेताना मला या दृष्टिकोनाचा फार उपयोग होत असे. हे माझे खरे स्कूलिंग होते, असेही म्हणता येईल. गांधी विचारांची चौकट व त्याला व्यावहारिकतेचा स्पर्श हे कमलनयनजींचे वैशिष्ट्य होते व बजाज उद्योगसमूहही त्याच वैशिष्ट्यावर उभा आहे, असे मला वाटते.