आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Khushwant Singh By Rekha Deshpande, Divya Marathi

विजेच्या बल्बातला कलंदर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकाहत्तर-बहात्तरमध्ये टाइम्स समूहात ट्रेनी जर्नलिस्ट म्हणून निवड झाली तेव्हा आपण जग जिंकलं की काय, असं वाटत होतं. चौथ्या मजल्यावर ‘माधुरी’-‘धर्मयुग’च्या संपादकीय विभागात बसल्या बसल्या समोरून तरंगत तरंगत जाता-येताना दिसायला लागले डॉ. धर्मवीर भारती आणि खुशवंतसिंग आणि आपण जग जिंकलंय याची खात्री झाली.


दोघांची तरंगत जायची रीत वेगवेगळी असे. भारतीजी शिडशिडीत, साध्या पँट-बुशशर्ट किंवा करड्या सफारीत, चिरूट ओढत, आत्ममग्न. ते कवी. केबिनमध्ये ते करड्या शिस्तीचे संपादक झालेले असायचे. खुशवंतसिंग ऐसपैस. सकाळी घरी आरामखुर्चीत पहुडून पेपर वाचता वाचताच उठून तसेच ऑफिसमध्ये आलेत की काय, असा त्यांचा साधा पांढरा टी-शर्ट पोटावरून पुढे ओढलेला. जाता-येताना हातात पुस्तकांचा आणि नियतकालिकांचा भला मोठा भारा. ‘वीकली’च्या सहायक संपादक फातिमा झकेरिया बरोबर असायच्या. त्या बोलत असायच्या आणि हे मवाळ नजर सर्वत्र फिरवत चाललेत; पण या करड्या आणि मवाळ व्यक्तिमत्त्वांविषयी कुतूहल सारखंच असायचं, दरारा सारखाच वाटायचा आणि यांच्या छायेत कुठे तरी येऊन बसण्यासाठी आपली निवड झाली आहे त्या अर्थी आपण जग जिंकलंय अशी खात्री झालेली असायची. भारतीजींच्या छत्रछायेत प्रत्यक्ष काम करायला-शिकायला मिळालं. खुशवंतसिंग यांचा संबंध दूरचं कुतूहल, त्यांच्या लिखाणाचं वाचन, त्यांचे विनोद, त्यांच्याविषयीच्या कथा यांची चर्चा करणं एवढ्या परिघात सीमित राहिला. तरीही हा संपादक-पत्रकार-लेखक आणि कलंदर माणूस कायम तेवढाच भला मोठा, तेवढाच ताजा, तेवढाच वर्तमान वाटत आला तो आत्ता या क्षणापर्यंत.


वर्षानुवर्षं असं कुतूहल जागतं ठेवणं हे तथाकथित थोर माणसांनाही ते जमत नाही. थोरपणाला न मोजणारा कलंदरपणा असला तरच ते जमत असावं. औपचारिकपणाला त्यांनी कायम फाट्यावर मारलं.
‘मॅलिस’ हा इंग्रजीतला शब्द बहुधा त्यांच्यामुळेच माझ्या परिचयाचा झाला. गंमत म्हणजे त्यांचं ‘विथ मॅलिस टुवर्ड्स वन अँड ऑल’ हे अजिबातच मॅलिस नसलेलं - दुष्टपणा नसलेलं - असायचं. हा असला विरोधाभास हेही त्यांचं वैशिष्ट्य. विजेच्या बल्बमध्ये कागदांचा पसारा मांडून व्हिस्की आणि लेखणी घेऊन बसलेला सरदारजी ही मारिओ मिरांडाची त्यांच्याविषयीची कल्पना आणि ते स्वत: याच्यात फार फरक वाटायचाच नाही. गांभीर्य आणि विनोद एकाच कुडीत - एकाच विजेच्या बल्बमध्ये वसत होते.


शाळेची, परीक्षेची भीती वाटत राहिली. खुशवंतसिंग चमकू लागले ते कॉलेजात शिस्तीचे दोर सैलावल्यावर. थर्ड क्लासात बी. ए. पास झाल्यावर वडिलांनी लंडनमध्ये शिकायला पाठवलं- हा गब्बर पित्याला नाही, पण सामान्यांना विरोधाभासच वाटेल. तिथे कवल मलिक नावाच्या टॉम बॉय मुलीवर प्रेम बसलं, तर तिचा बाप पीडब्ल्यूडी खात्यातला वरिष्ठ इंजिनिअर आणि यांचे वडील बिल्डर. म्हणजे यांच्या वडिलांच्या नाड्या तिच्या वडिलांच्या हातात! तरी लग्न झालं. वकिली नाही, पण लेखणी चालू लागली. कादंबरी लिहायला घेतली की वडील पैसे पुरवायचे. ‘मनो माजरा’ म्हणजेच ‘ट्रेन टू पाकिस्तान’ भोपाळच्या घरात अशीच जन्माला आली.


भारतीय परराष्‍ट्र खात्यात, ऑल इंडिया रेडिओ, युनेस्कोत नोक-यांचा बहुरंगी अनुभव घेता घेताच लेखनावरच जगायचं ठरवलं. शिखांचा इतिहास लिहिला.. न्यूयॉर्क टाइम्सनं बोलावलं आणि तिथून बोलावणं आलं ते ‘इलेस्ट्रेटेड वीकली’चं संपादक पद सांभाळण्यासाठी. ‘वीकली’चा खप पन्नास हजारांवरून चार लाखांवर गेला. कारण खुशवंतसिंगांच्या ‘वीकली’नं उच्चभ्रूपणाची इस्त्री झुगारून देऊन सामान्यांचे विषय सामान्यांच्या भाषेत मांडले. देशातल्या असंख्य जाती-पोटजातींचं सुरस वास्तव ‘वीकली’त मांडून राष्‍ट्रीय एकात्मता साधण्याची विरोधाभासी किमया केली ती खुशवंतसिंग याच संपादकानं. आणीबाणीत जेव्हा इंदिरा गांधी आणि संजय गांधींविषयी व्यापक प्रमाणावर राग खदखदत होता त्या वेळी ते संजय आणि इंंदिरा गांधींची बाजू घ्यायचे. पुढे संसदेचं सदस्यत्व मिळालं. तर तिथे शिखांची बाजू घेऊन त्यांनी इंदिरा गांधींना नाराज केलं... एकदा एका समारंभात पुढच्या मान्यवरांच्या रांगेत बसले असताना शेजारच्या देखण्या महिलेला म्हणाले, ‘तुम्ही सिनेमात का नाही काम करत?’ महिला हळूच हसली. नंतर मान्यवरांना व्यासपीठावर पाचारण करण्यात आलं तर ती निघाली मीनाकुमारी! आपण मीनाकुमारीलाच सिनेमात काम करण्याविषयी सुचवल्याचं आपल्या लक्षात आल्याचं स्वत:च खुशवंतसिंगांनी आपल्या वाचकांना सांगून टाकलं. आपुलीच फजिती आपुल्याच तोंडी; पण ही फजिती साक्षात खुशवंतसिंगांची असल्यानं तिचं छान मिथक तयार झालं. खुशवंतसिंग यांच्याभोवती अशी मिथकं असंख्य तयार झाली.
त्याला कारण त्यांचं आयुष्य आणि त्या आयुष्याला लीलया ओंजळीत झेलायची, होळीच्या गुलालासारखं उधळून द्यायची त्यांची वृत्ती. एकदा त्यांच्या सोळा वर्षांच्या नातीनं आईच्या आणि आजीच्या उपस्थितीतच त्यांना प्रश्न विचारला, की ‘आजोबा, तुम्ही खरंच वूमनायझर आहात का ?’ कारण तिच्या शिक्षिकेनं त्यांचा ‘पोर्ट्रेट ऑफ अ लेडी’ हा त्यांच्या आजीवर लिहिलेला धडा शिकवताना लेखकाविषयी अशीच माहिती दिली होती. दुस-या दिवशी ही खुशवंतसिंगांचीच नात असल्याचं कळल्यावर बाई लेखकाच्या संवेदनशील शैलीचं कौतुक करू लागल्या. एवढं सांगून खुशवंतसिंग म्हणतात की, दोष बार्इंचा नव्हता, दोष माझाच. मीच अशी स्वत:ची इमेज बनवलीय. पण खरं तर मी कधी दारू पिऊन झिंगलो नाहीय की कुणा स्त्रीशी वाईट वागलो नाहीय. मला रूप नसलं तरी स्त्रियाच मला शोधत येतात, त्यामुळे अशी ही इमेज झालीय.


वाटतं, गालिबनंच विसाव्या शतकात खुशवंतसिंग म्हणून जन्म घेतला होता की काय? फक्त काव्य लिहायच्या ऐवजी थोडं वेगळेपण म्हणून या वेळी गद्य निवडलं. गालिब जसा आपल्या कलंदरपणात मग्न, लोकांची टोपी उडवता उडवता स्वत:चीही उडवण्यात माहीर, तसंच खुशवंतसिंगांचं. तो भाषेच्या पलीकडे जाऊन सगळ्यांचा झाला.
इथे इंग्रजीतून लिहिणा-या ज्या लेखकाला भारतातला सामान्य माणूसही ओळखायचा तो चेहरा होता खुशवंतसिंग यांचा. अभारतीय किंवा इंग्रजाळलेल्या भारतीय वाचकांसाठी भारतीय माणसांच्या-ठिकाणांच्या कथा इंग्रजीतून लिहिणा-या भारतीय (किंवा अनिवासी भारतीय) लेखकांचा काळ सध्या बहरलेला आहे. परंतु खुशवंतसिंग जे इंग्रजीत लिहीत त्या संवेदना भारतीय वाचकाला जणू थेट त्याच्या त्याच्या भाषेतच जाणवत.
खुशवंतसिंग अख्खं एक शतक अनुभवून गेलेत. शेवटापर्यंत हात लिहिता असावा, ग्लास भरलेला असावा, अशा अर्थाची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. ती पुरी झालीय. नाही म्हणायला अशा माणसाचं शतक एकाच वर्षांनं हुकवणं हे जगन्नियंत्याचं मॅलिससुद्धा मिश्किलच म्हटलं पाहिजे.


deshrekha@yahoo.com