आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On King Shivaji By D.R.Shelke, Divya Marathi, Birthdate

शिवजन्म तिथीचा वाद मिटायला हवा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी जेधे शकावलीनुसार फाल्गुन कृष्ण तृतीया शके 1551 आहे. 2002 पर्यंत शासन स्तरावर दरवर्षी याच तिथीवर (समकक्ष इंग्रजी तारखेला) शिवजयंती साजरी होत असे. गजानन भास्कर मेहेंदळे व अन्य इतिहासतज्ज्ञांनी पुराव्यानिशी शिवाजी महाराजांची जन्मतारीख इंग्रजी कॅलेंडरनुसार 19 फेब्रुवारी 1630 असल्याचे सिद्ध केले. लो. टिळक, म. गांधी, पं. नेहरू, डॉ. आंबेडकर इत्यादी सर्व महापुरुषांची जयंती इंग्रजी तारखेलाच साजरी होते. भारताचा स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन इंग्रजी तारखांना 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला साजरे होतात. एवढेच नव्हे, तर सर्व नागरिक स्वत:चे व मुलांचे वाढदिवस इंग्रजी तारखांनाच साजरे करतात.


याला अपवाद हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांचा होता. त्यांची जयंती पंचांगातील तिथीवर साजरी होत असे. दरवर्षी या तिथीची समकक्ष इंग्रजी तारीख बदलत असे. कधी ती मार्च महिन्यात येई, तर कधी एप्रिल-मेमध्ये. त्यामुळे सामान्य जनतेत शिवजयंती नेमकी कोणत्या तारखेला याबद्दल संभ्रम असे. शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांनासुद्धा शिवजयंती कोणत्या तारखेला हे सांगता येत नसे. हा घोळ संपवण्यासाठी आणि शिवजयंती 19 फेब्रुवारीलाच सर्व स्तरांवर साजरी व्हावी या दृष्टीने मराठा सेवा संघाने (मराठा महासंघ नव्हे) पुढाकार घेतला. महाराष्‍ट्र शासनाने शिवजयंतीची तारीख 19 फेब्रुवारी घोषित करावी म्हणून डिसेंबर 1998 मध्ये सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, आमदार रेखा खेडेकर यांनी 24 आमदारांच्या सह्यांचे निवेदन, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना दिले; परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा त्यास विरोध असल्याने मनोहर जोशींनी या मागणीकडे दुर्लक्ष केले.

ऑक्टोबर 1999 मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यावर या मागणीचा त्यांच्यासमोर पाठपुरावा करण्यात आला. साधारणत: 2000च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये महाराष्‍ट्र मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबाद येथे झाली. प्रस्तुत लेखक तेव्हा मराठा सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी असल्याने त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तत्कालीन सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री रामकृष्ण मोरे यांना शिवजयंतीची तारीख 19 फेब्रुवारी शासनमान्य होण्याबाबत निवेदन दिले आणि त्या पुष्ट्यर्थ युक्तिवादही केला. रामकृष्ण मोरेंना ही मागणी पूर्णत: पटली व पुढील कॅबिनेट मीटिंगमध्ये हा विषय ठेवतो व मंजूर करून घेतो, असे खात्रीपूर्वक आश्वासन त्यांनी दिले व तसे त्यांनी करून दाखवले. साधारणत: जानेवारी 2001 मध्ये राज्य कॅबिनेटने शिवजयंती दरवर्षी 19 फेब्रुवारी तारखेला साजरी होईल, असा ऐतिहासिक निर्णय घेतला व त्याप्रमाणे अध्यादेश काढला. तेव्हापासून सर्व शासकीय विभाग, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठ, विविध सामाजिक, राजकीय संघटना (अपवाद शिवसेना) दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती अत्यंत उत्साहाने साजरी करतात.


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शासनाच्या निर्णयाला विरोध करताना अशी भूमिका घेतली की, छत्रपती शिवाजी महाराज लोकोत्तर युगपुरुष होते, शककर्ते होते. त्यांची तुलना इतर राष्ट्रीय नेत्यांशी होऊ शकत नाही. त्यांची जयंती पंचांगातील तिथीनुसार दरवर्षी फाल्गुन कृष्ण तृतीयेलाच साजरी होईल व तसा आदेश त्यांनी शिवसैनिकांना दिला. त्यावर विलासराव देशमुखांनी असे भाष्य केले की, युगपुरुष छत्रपती शिवरायांची जयंती दररोज साजरी केली तरी त्याला आमची हरकत नाही. परंतु असे भाष्य करण्याऐवजी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन शिवजयंतीच्या 19 फेब्रुवारी तारखेबाबत त्यांचे मन वळवले असते, तर कदाचित त्यांनी त्यास स्वीकृती दिली असती.
खुद्द शिवाजी महाराजांनी पंचांग बघून, मुहूर्त पाहून एखाद्या ज्योतिष्याला विचारून कधीही युद्ध मोहिमा आखल्या नाहीत. अंधा-या रात्री गनिमी काव्याने त्यांनी शत्रूंच्या छावण्यांवर, किल्ल्यांवर हल्ले केले आणि विजय मिळवला. पंचांगात सुधारणा करण्यासाठी योग्य कालगणना करण्यासाठी त्यांनी करण नामक तज्ज्ञाला ग्रंथ लिहिण्यास सांगितले आणि त्याने ‘करण कौस्तुभ’ ग्रंथ रचला.

ज्यात कालगणना सूर्य सिद्धांतानुसार केलेली आढळते. छत्रपती शिवरायांनी हा ग्रंथ प्रमाण मानल्यामुळे त्यांनीसुद्धा कालगणनेसाठी सूर्यसिद्धांताचा पुरस्कार केला हे स्पष्ट आहे. (आधार भारतीय संस्कृती कोश खंड 5 पृ. 300) इंग्रजी कालगणनेने सूर्यसिद्धांताचा पुरस्कार केला असल्याने हे साम्यस्थळ बघता हिंदुत्ववाद्यांनी इंग्रजी कालगणना मानण्यास आक्षेप नसावा. दृक्प्रत्यय, गणिती हिशेब आणि उपयुक्ततेमुळे जगाच्या पाठीवर बहुसंख्य देशांत आणि धर्मांत इंग्रजी कालगणनेचा प्रत्यक्ष वापर सुरू आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन शासनाने शिवजयंतीची तारीख इंग्रजी कालगणनेनुसार 19 फेब्रुवारी जाहीर केली. त्यावर संशोधक, इतिहासकार, विचारवंत, सामाजिक-राजकीय संघटनांचे नेते, कार्यकर्ते सर्वांनीच शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले.


आपल्या भूमिकेनुसार शिवसेना केवळ महाराष्‍ट्रात नव्हे, तर इतर प्रांतांतसुद्धा त्यांच्या शाखांमार्फत पंचांग तिथीप्रमाणे येत्या 19 मार्चला शिवजयंती साजरी करत आहे; परंतु यामुळे इतर प्रांतांत चुकीचे संदेश जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा वाद तेवत ठेवून विभिन्न तारखांना त्यांची जयंती साजरी करणे महाराष्‍ट्राला भूषणावह नाही. शिवसेना व सत्तारूढ पक्षाच्या नेत्यांनी समन्वय व चर्चेने शिवजयंतीच्या तारखेचा वाद कायमचा संपुष्टात आणावा, ही समस्त शिवप्रेमींची अपेक्षा.