आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरण बेदींचे जंतरमंतर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचे भाजपमधील आगमन हे काही त्यांना नरेंद्र मोदींमधील कणखर नेतृत्वाचा साक्षात्कार झाल्यामुळे झालेले नाही, तर ती दोघांची राजकीय सोय आहे. दिल्लीत येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मुख्यमंत्रिपदासाठी योग्य उमेदवार सापडत नसल्याने त्यांना किरण बेदींमधील देशप्रेमी पोलिस आढळला, तर बेदींना दिल्लीचे मुख्यमंत्रिपद खुणावू लागले आहे. त्यामुळे बेदींना भाजप हा एक पवित्र, शुचिर्भूतांचा पक्ष वाटू लागणे साहजिकच आहे. चार वर्षांपूर्वी यूपीए-२ सरकारच्या विरोधात भ्रष्टाचारावरून नारा देताना बेदी व केजरीवाल यांनी एकमेकांची साथ दिली होती, पण या आंदोलनाचा फुगा फुटल्यामुळे या दोघांमध्ये फाटले. किरण बेदी या देशाच्या राजकीय पटलावर ख-या अर्थाने आल्या त्या अण्णा हजारेप्रणीत भ्रष्टाचारविरोधी आंदोलनामुळे. या आंदोलनादरम्यान त्यांनी देशातल्या सर्वच राजकीय पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. दिल्लीतील रामलीला व जंतरमंतर मैदानावरील त्यांच्या अनेक मुक्ताफळांनी जनतेचे मनोरंजन झाले होते. राजकारणात न येताही समाजपरिवर्तन करता येते, घराणेशाही, नेतेबाजी, भ्रष्टाचार, जातीयवाद व सत्तासंघर्षामुळे राजकारणाचे दलदलीकरण झाले असून आपण राजकारणात कधीही पाय ठेवणार नाही, भ्रष्टाचार निर्मूलन व देशात लोकपालची नियुक्ती हे आपले जीवनध्येय असल्याची भूमिका त्यांनी याअगोदर वेळोवेळी घेतली होती. त्यांनी गुजरात दंगलीला नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचे ट्विटही केले होते. शिवाय भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावरही आरोप केले होते. पोलिस सेवेत असताना बेदींचे काही वादग्रस्त निर्णय, व्यवस्थेविरोधातील त्यांचा लढा व तिहार कारागृहातील बंदिवानांच्या पुनर्वसनाच्या त्यांच्या कार्यामुळे समाजात बेदींबद्दल आदर होता; पण त्यांच्या एकंदरीत भूमिकेविषयी संभ्रम निर्माण होऊ लागला. एकेदिवशी भाजपने बेदी चालवत असलेल्या एका संस्थेच्या विमान तिकिटांचा मुद्दा मीडियाला पुरवल्याने बेदींच्या प्रामाणिकपणाच्या फुग्याला टाचणी लागली होती. या आरोपामुळे बेदींची पंचाईत झाली होती; पण त्याच भाजपने त्यांना पक्षप्रवेश दिला आहे व त्या आता नरेंद्र मोदी यांच्या विश्वासू झाल्या आहेत.