आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळिशीतील ‘सात सक्कं त्रेचाळीस’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्यांच्या नाव व आडनावात अस्सल मराठीपण झिरपते आहे, अशा किरण नगरकरांची बहुतांश साहित्यनिर्मिती इंग्रजीतून झाली. याचे कारण त्या भाषेचे अवकाश त्यांना अधिक व्यापक वाटले असावे. ‘रावण अँड एडी’, ‘ककल्ड, गॉड्स लिटिल सोल्जर’,‘द एक्स्ट्रॉज’ या नगरकरांच्या एकाहून एक सरस इंग्रजी कादंबऱ्यांनी वाचकांचे कल्पना व अनुभवविश्व आणखी समृद्ध केले. किरण नगरकर हे केवळ कादंबरीकार नाहीत, तर ते नाटककार व पटकथाकारही आहेत.
‘कबीराचे काय करायचे?’ व ‘बेडटाइम स्टोरी’ या दोन नाट्यकृती किरण नगरकरांच्या नावावर आहेत. ‘स्प्लिट वाइड ओपन’ या चित्रपटातून त्यांनी अभनियही केलेला आहे. किरण नगरकर यांनी लिहिलेल्या ‘सात सक्कं त्रेचाळीस’ या कादंबरीला ४० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने शब्द पब्लिकेशनतर्फे ‘सात सक्कं त्रेचाळीस’ची क्लासिक आवृत्ती आज, सोमवारी प्रसिद्ध होत आहे. डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेल्या ‘कोसला’ या कादंबरीला पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्या वेळी रामदास भटकळ यांच्या पॉप्युलर प्रकाशनाने ‘कोसला’ची सुवर्णमहोत्सवी आवृत्ती प्रसिद्ध केली होती. ‘कोसला’प्रमाणेच दर्जेदार असलेल्या ‘सात सक्कं त्रेचाळीस’ या कादंबरीचा प्रत्यक्ष खप पहिल्या आवृत्तीच्या वेळी कमी झाला असला तरी िकरण नगरकरांच्या लेखनकृतीचे जाणकारांनी तोंडभरून कौतुक केले होते. ‘रावण अँड एडी’ ही त्यांची कादंबरीदेखील नंतर मराठीत अवतरली. माणसाचे जगणे हा केंद्रबिंदू व त्या जगण्यातील असहायता, नश्वरता याचे दर्शन घडवणे हा ‘सात सक्कं त्रेचाळीस’ या कादंबरीच्या कथानकाचा गाभा. जीवनातील प्रत्येक रूप, अरूप, विरूपाचा शोध या कादंबरीतून घेण्यात आला आहे. ‘सात सक्कं त्रेचाळीस’च्या क्लासिक आवृत्तीला किरण नगरकर यांनी लिहिलेल्या विशेष मनोगतातून त्यांनी या कादंबरीबद्दल तसेच स्वत:च्या साहित्यप्रवासाबद्दलही थोडेसे विस्ताराने सांगितले आहे. हे मनोगत साहित्यशास्त्राचे अभ्यासक तसेच सजग वाचनप्रेमींसाठी एक आकर्षण ठरणार आहे हे नक्की.