आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Love Jihad And Other Facts By Sagar Bhalerao, Divya Marathi

यांचं लव्ह आणि त्यांचा जिहाद... (विशेष लेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदी सरकार आता सत्तेत ब-यापैकी स्थिरावलंय. १०० दिवस या नवख्या सरकारने पूर्ण केली. आंतरराष्ट्रीय राजकारणात दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी पहिल्याच दिवसापासून सुरू केला. "सबका साथ, सबका विकास' हा नारा देऊन सरकार सत्तेत आले. पण हळूहळू भाजपतील उत्साही लोक मात्र पक्षाला अडचणीत आणण्याचं काम करत आहेत. एकीकडे पंतप्रधान जपान, चीनबरोबर विकासाच्या मुद्द्यांवर वाटाघाटी करत आहेत, तर दुसरीकडे धर्माच्या फुटपट्टीवर प्रेमाला तपासलं जात आहे. मुळात प्रेम ही भावना नितांत सुंदर आणि रेखीव अशी आहे. मानवी भावभावना जेथे एकमेकांमध्ये गुंतल्या जातात, तेथे प्रेमाची सुरुवात होत असते. परंतु एक वेळेस दगडाला पाझर फुटेल, पण धर्मांधांना प्रेम ही संकल्पना जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन मानवी विश्वाचा सिद्धांत मांडत असते, हे कळणार नाही. टोकाची धर्मनिष्ठा ही कधीही घातकच. चिकित्सकपणे विचार केला की एक गोष्ट लक्षात येते, जगात आतापर्यंत जेवढ्या काही समाजविघातक घटना घडल्या आहेत, त्या धर्माच्या नावावरच घडल्या आहेत. धर्माच्या नावावरच जिहाद पुकारून ओसामा बिन लादेनने अमेरिकेवर हल्ला केला. धर्माच्या नावावरच बाबरी मशीद पाडली गेली. धर्माच्या नावावर मालेगाव, धुळे आणि इतर दंगली घडल्या. धर्माच्याच नावावर तालिबान्यांनी अहिंसावादी बुद्धाच्या मूर्ती तोफेने उडवल्या. आता लव्ह जिहादसुद्धा घडवला जातोय धर्माच्याच नावावर...

प्रेम या संकल्पनेला मात्र जात, धर्म, देश, वंश या कशाचंच बंधन नसतं. म्हणूनच तर काळ्यासावळ्या भारत पाटणकर यांच्याशी गोरीगोमटी गेल ऑमवेट लग्न करायला तयार होते आणि सातासमुद्रापार संसार करायला भारतात येते. विचार जुळले की बाकीच्या गोष्टी पाहायच्या नसतात. हे विश्वचि माझे घर म्हणणारे संत ज्ञानेश्वर आपल्याला विश्वव्यापी विचार देऊन गेलेत. आपण मात्र अजूनही हरिपाठाचा गजर करत बसलोय. मानवी समृद्धीचा आणि बंधुत्वाचा विचार करताना धर्मवादळाला रोखणे गरजेचे आहे.

आपल्या देशाला जातीयतेची आणि त्याचबरोबर प्रबोधनाची जुनी परंपरा आहे. मुळात, जगात कुठल्याही देशात नसतील इतके जातिसमूह आपल्या देशात अनादी काळापासून नांदत आहेत. कधी यांच्यात धार्मिक संघर्ष झाले, तर कधी कधी धर्मचर्चा, धम्मसंगिनी घडल्या. याचाच परिपाक म्हणून, चार्वाकांनी वेदांच्या संदर्भात नवीन सिद्धांताची मांडणी केली. पुढे राजा राममोहन रॉय यांनी प्रबोधनाला सुरुवात केली आणि महात्मा फुल्यांनी त्याला तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्याहीपुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने आधुनिक भारतात हे काम अखंडितपणे सुरू राहिले. जोपर्यंत समाजात आपापसात रोटीबेटी व्यवहार होणार नाहीत तोपर्यंत जातिनिर्मूलन होणार नाही, अशी भूमिका सगळेच प्रबोधनकार मांडत आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तर "अनहिलेशन ऑफ कास्ट' या आपल्या शोधनिबंधात आंतरजातीय विवाहाचे जोरदार समर्थनही केले आहे. ज्याप्रमाणे तत्त्वज्ञानाचा आधार घेऊन धर्माची निर्मिती झाली, तशाच तत्त्वज्ञानाचा आधार घेऊनच धर्मसंकल्पना पुन्हा नव्याने मांडता यायला हवी, धर्मचिकित्सा व्हायला हवी. अगदी मुस्लिम धर्माचीसुद्धा.

मुलगा वेगळ्या धर्माचा आणि मुलगी वेगळ्या धर्माची, अशी जर परिस्थिती असेल तर त्यातून दोन जिवांचे मिलन तर होतच असते; परंतु त्याचबरोबर दोन संस्कृती, दोन परंपरा आणि विभिन्न पार्श्वभूमी असलेली दोन कुटुंबे एकरूप होत असतात. त्यांच्या पुढच्या पिढीला मग दोन्ही धर्माची शिकवण मिळते, आणि सहिष्णूतेचे संस्कार होतात. एकूणच अशा विवाहातून व्यापक विचारांची पिढी घडत असते, असे डॉ. आंबेडकर म्हणतात. महात्मा गांधीसुद्धा आंतरजातीय विवाहांना, मिश्र विवाहांना पाठिंबा देतात. १९ जुलै १९३७ रोजी बेळगावातील हुदली गावी महात्माजींच्या उपस्थितीत मिश्रविवाह झाल्याची नोंद आहे. आपल्याला अशा विचारांची परंपरा आहे, हे सध्या आपण विसरत चाललो आहोत. महासत्ता बनण्याचे स्वप्न बघणारा आपला देश अशा "लव्ह जिहादी' गृहीतकांमध्ये जर अडकून पडणार असेल तर एकंदर परिस्थिती अवघड आहे.

नुकत्याच देशात तीन राज्यांमध्ये पोटनिवडणुका झाल्या. या निवडणुकीत उत्तर प्रदेश हिंदूंच्या मुळावर उठला आहे, असे भासविण्यात आले. हिंदू मुलींना मुस्लिम मुले हिंदू असल्याचे भासवतात आणि त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचा गैरफायदा घेणे आणि धर्मांतराच्या घटना घडत असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात महंत आदित्यनाथ यांची वाचाळ आक्रमकता आणि साक्षी महाराज यांची या जिहादच्या बाबतीत असलेली मांडणी, राष्ट्रीय आपत्ती असल्यासारखा चर्चिली गेली. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी तर या विषयाचा चावून चावून चोथा केला. तोंडाला फेस येईपर्यंत तथाकथित योगीमहाराज बडबडत राहिले. परंतु तपासाअंती त्यातून निष्पन्न काहीच झाले नाही. विषयातील हवाच निघून गेल्यावर एका खासदार बाईंनी गरबा कार्यक्रमात मुसलमानांना प्रवेश दिला जाऊ नये, असे फर्मान सोडले. परिणामअखेर उत्तर प्रदेशच्या जनतेने या प्रकरणाकडे साफ कानाडोळा करत समाजवादी पक्षाच्या बाजूने आपला कौल दिला.

आधुनिकतेच्या काळात जगणा-या आपल्या सर्वांनाच काळाबरोबर चालावे लागणार आहे. आपल्या भारतीयांचा हाच प्रॉब्लेम आहे, काळासोबत चालणे आपल्याला अवघड जाते, म्हणून एचएमटीच्या घड्याळ कंपनीला आपलं बस्तान बांधावं लागलं. हेच उदाहरण आपल्या समाजव्यवस्थेलाही चपखलपणे लागू होतं. मानवी समुदायाला मार्गदर्शक तत्त्वे म्हणून धर्माची निर्मिती झाली. ती एक आचारसंहिता होती. कालानुरूप त्या संहितेला अपडेट करणे गरजेचे होते. ते काम इथल्या हिंदूंनी केलेच नाही आणि मुस्लिमांनी तर धर्मचिकित्सा पाप मानली. रामजन्मभूमीचा मुद्दा बॅकफूटवर गेल्यानंतर सांप्रदायिक शक्तींना दुसरा मुद्दा नव्हता. गोरक्षा मुद्दा जर घेतला तर दलित-आदिवासींचा पाठिंबा मिळणे साशंक होते, परंतु "स्त्री' प्रतिमा वापरली की मुस्लिमेतर सगळे धर्म आपल्याला पाठिंबा देतील, असा कयास यामागे दिसून येतो. पण आज कितीतरी मुस्लिम युवकांसोबत लग्न करून हिंदू मुली गुण्यागोविंदाने नांदताना दिसतात.
विद्यमान काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांची पत्नी ब्राह्मण आहे, भाजप नेते मुख्तार अब्बास नकवी आणि शाहनवाज हुसेन यांच्या पत्नीही हिंदू आहेत. अशी असंख्य उदाहरणे देता येतील. मग काय, यालासुद्धा आपण जिहादी स्वरूप देणार का? मुघल राजा अकबरानेसुद्धा राजपूत असलेल्या जोधाबाईशी लग्न केलं होतं, परंतु तिला तिचा धर्म अनुसरण्याची मोकळीकसुद्धा दिली गेली होती, हा इतिहास विसरता कामा नये. आजची स्त्री ही काही महाभारतातील द्रौपदी राहिली नाही. तिला लाडीगोडी लावून सहज वश करता येते, असे समजण्याचे कारण नाही. आता ती अबला नाही. परिस्थितीचा अंदाज घेऊन काय निर्णय घ्यावेत, हे ती अगदी अचूक जाणते. त्यामुळे तिचे भांडवल न केलेलेच बरे. बाजीराव मस्तानीच्या प्रेमाला "प्रेमसौंदर्य' आणि मुस्लिम युवक आणि हिंदू युवतीच्या प्रेमाला जर "लव्ह जिहाद' हे विशेषण आपण लावत असू तर आपल्यासारखे करंटे आपणच ठरणार आहोत.
आपली मुले-मुली काय करतात, कुठे जातात, याची विचारपूस पालकांनीही करायला हवी. पालकांमध्ये आणि मुलांमध्ये निकोप मैत्रीचे संबंध असणे गरजेचे आहे.
प्रेमात कधी कधी अपयश येतं, ते पचवायचं कसं, हे पालकांच्या समुपदेशनाने ठरवता यायला हवे. मान्य की, आपण एवढ्या प्रगत विचारांचे झालो नाहीत तरी या प्रकरणावरून आपण योग्य पावले उचलायला हवी. म्हणजे, प्रत्येक अपयशी प्रेमाला लव्ह जिहादचा शिक्का मारताना सांप्रदायिक शक्ती दहा वेळा विचार करतील. स्व. अप्पा रेडीज यांच्यासारख्या अनेक समाजसेवकांनी आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहांचे महत्त्व ओळखून मिश्र विवाह चळवळीची प्रेरणा महाराष्ट्राला दिली आहे. या चळवळीच्या माध्यमातून एकत्र आलेल्या जोडप्यांचा संसार पाहा, म्हणजे वाचाळ आणि तर्कशून्य लोकांच्या बुरसट "जिहादी' कल्पना गलितगात्र होतील. प्रेम करायचं, टिकवायचं ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे. ज्यांना हृदयच नाही त्यांनी या भानगडीत पडू नये.
sagobhal@gmail.com